दापोलीपुत्र एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण

    0
    5683

    १९९८ साली दापोलीतील बुरोंडी नाक्याजवळच्या चौकाला ‘एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक’ नाव देण्यात आलं,  हे सुरेंद्र चव्हाण म्हणजे कोण? तर महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती, पहिला मराठी माणूस जो एव्हरेस्ट शिखराच्या माथ्यावर गेला, ज्याने एव्हरेस्ट शिखर सर केला, आणि ही व्यक्ती आपल्या दापोलीची आहे, या आनंदाप्रीत्यर्थ, अभिमानाप्रीत्यर्थ दापोलीकरांनी त्यांचा मनापासून सत्कार केला व त्यांचं नाव या चौकाला देण्यात आलं. त्या दिवशी  जात, धर्म, पंथ, राजकारण सर्व गोष्टी मागे टाकून दापोली एकत्र झाली होती; एका दापोलीकरासाठी. जो विजयी पताका रोवून आला होता हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर. हे सुवर्ण क्षण दापोलीच्या इतिहासात खरोखर अविस्मरणीय आहेत.

    सुरेंद्र चव्हाण या दापोलीपुत्राच मूळ गाव पालगड; पण त्याचं प्राथमिक शिक्षण(चौथीपर्यंतचे) हे दापोलीत झालं. त्यांच्या वडिलांची इच्छा होती, की मुलाचं पुढचं शिक्षण सैनिकी शाळेत व्हावं, म्हणून त्यांना गुजरात जामनगर येथील सैनिकी शाळेत पाठवण्यात आलं. दहावीनंतर तिथून बाहेर पडल्यावर अकरावी-बारावी त्यांनी दापोलीत फुरूस गावच्या कॉलेजात केली. बारावीनंतर टेल्को कंपनीची अप्रेंटीसची परीक्षा दिली. ती पास झाल्यामुळे त्यांची निवड टेल्कोमधे झाली व पुढे त्यांना त्याच कंपनीत नोकरी मिळाली. टेल्कोमध्ये(पुण्यात) नोकरी करत असताना फर्ग्युसन कॉलेजातील अथलेटिक्स क्लबमध्ये प्रशिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. तिथून क्रॉस कंट्री रनिंग स्पर्धेमधे त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. त्यांना धावण्याची व फुटबॉलची आवड तर होतीच; पण मित्रांसोबत पहाड चढण्याची (rock climbing) आणि दुर्गम भागात भटकंतीची (trekking) आवड जडली. या आवडीमुळेच त्यांनी महाराष्ट्रातील अनेक उंच कड्यांवर, शिखरांवर मोहिमा आखल्या व यशस्वीपणे पार पाडल्या. ही आवड अतिशय बळावल्यामुळे त्यांनी पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेशी स्वतःला जोडून घेतलं. उत्तर काशीला जावून गिर्यारोहनाचा बेसिक कोर्स केला. मग त्यांना हिमालयाची ओढ लागली व गिरीप्रेमी संस्थेमार्फत त्यांनी हिमालयातील अनेक मोहिमा पार पाडल्या. पनवली द्वार, सतोपंथ या शिखरांवर जाणारे ते पहिले भारतीय होते.

    पुढे गिरीप्रेमीने एव्हरेस्टची मोहीम आखायचे ठरवले. मोहिमेला येणाऱ्या सदस्यांची संख्या बऱ्यापैकी असली तरी खर्चाचा आकडा मोठा होता. दोन कोटींपेक्षा जास्त खर्च येणार होता. संस्थेने आणि सदस्यांनी पैश्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. ते वर्ष होतं १९९७-१९९८. भारतीय इतिहासातील सुवर्ण महोत्सवी वर्ष. याच वर्षात भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षीच्या एव्हरेस्ट मोहिमेला देखील या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा एक भाग म्हणून घोषित करण्यात आले होते. गिरिप्रेमीचा तेरा जणांचा गट तयार झाला व मार्च महिन्यात तो एव्हरेस्टकडे रवाना झाला. हिमालयातील वातावरणाशी शरीर मिळतंजुळतं होण्यासाठी सुरुवातीला काही दिवस तेथे राहणं आवश्यक असतं व सराव करावा लागतो. त्या वातावरणात फुप्फुसात पाणी साचण्याची आणि इतर त्रासांची संभाव्यता असते. ते टाळण्यासाठी पुरेपूर काळजी घेत योग्य ठिकाणी बेस कॅम्प लावले जातात. एव्हरेस्ट शिखराकडे जाणारे मार्ग दोन आहेत, ‘एक नेपाळकडून आणि दुसरा चायना कडून.’ गिरीप्रेमीने नेपाळ कडून शेरपा आणून चायना मार्गे चढाई करण्याचे ठरवले.( शेरपा म्हणजे हिमालयाच्या जवळपास पारंपारिक वास्तव्य असलेल्या लोकांचा समुदाय. हे लोक मार्गदर्शक असतात.) खरतर नेपाळ मार्ग एव्हरेस्ट चढाईसाठी चायना मार्गापेक्षा सोपा होता; परंतु खर्चाची रक्कम कमी असल्याकारणाने गिरीप्रेमीने चायना मार्ग स्वीकारला. या मार्गावर अनंत अडचणी तर होत्याचं; पण मूळ अडचण होती ती वाट तयार करण्याची. कारण क्षणा-क्षणाला बदलणाऱ्या वातावरणामुळे नव्या वाटा शोधाव्या लागतात, तयार कराव्या लागतात. सुरेंद्र चव्हाणांनी शेरपाला मदतनीस म्हणून घेऊन त्या वाटा तयार केल्या आणि गिरीप्रेमीचा गट शिखराकडे सरकू लागला. एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ असताना गिरीप्रेमीशिवाय, यु.एस.ए.,चायना, रशिया, नेपाळ आणि अनेक युरोपियन देशाचे गट तेथे होते. त्या गटांच्या तुलनेत आपला भारतीय गिरिप्रेमीचा गट लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता; परंतु भारतीय हवामान खात्याचा निकाल मिळताच त्यांनी एव्हरेस्टच्या चढाईस सुरुवात केली. तेरा जणांपैकी सात जण एव्हरेस्टच्या टोकाकडे निघाले. गटप्रमुख ऋषिकेश यादव यांनी सुरेंद्र चव्हाण याचं शारीरिक व मानसिक धैर्यबल जाणून त्यांना पुढे राहण्यास सांगितलं व वाट तयार करण्यास सांगितली. चव्हाणांनी आज्ञेनुसार कर्तव्य केलं आणि एव्हरेस्टच्या माथ्यावर सगळ्यात प्रथम जावून भारताचा तिरंगा फडकवला. इतर देशांचे गट गिरीप्रेमींच्या मागून आले,  काही अमेरिकन हवामान खात्याच्या अंदाजावर अवलंबून राहिलेले, ते तर दोन दिवसांनंतर शिखरावर पोहचले.

    भारतात मात्र त्यानंतर सुरेंद्र चव्हाणांना व गिरीप्रेमीला प्रसारमाध्यमांनी उचलून धरले व त्यांचे ठिकठिकाणी कौतुक, सन्मान सोहळे होऊ लागले. सुरेंद्र चव्हाण यांचा त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते सत्कार झाला. शिवाय शिवछत्रपती व गोदावरी गौरव हे महाराष्ट्राचे अतिप्रतिष्ठीत पुरस्कारदेखील प्राप्त झाले. शरद पवारांनी गिरीप्रेमींना खास दिल्लीत बोलावून शंभर-सव्वाशे खासदारांसोबत जेवणाचा कार्यक्रम ठेवला. दापोलीत आल्यानंतर या दापोलीपुत्राचं दापोलीकरांनी जंगी स्वागत केलं व भरपूर शुभाशीर्वादही दिले.

    सध्या सुरेंद्र चव्हाण हे पुण्यात असतात; परंतु त्यांची वारंवार दापोलीत ये-जा असते. पुण्यातल्या एका प्रतिष्ठीत कंपनीत ते ट्रेनिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. गटबाजी न करता गटाने मिळून कार्य कसं करावं याची शिकवण ते खासकरून तेथे देतात. वयोमान आणि कामाची व्याप्ती अधिक असल्यामुळे ते आता ट्रेकिंग वगैरे करत नाहीत; परंतु नव्याने तयार होणाऱ्या गिर्यारोहकांना मार्गदर्शन जरूर करतात. त्यामुळे या दापोलीपुत्राचा निव्वळ दापोलीला नव्हे तर महाराष्ट्राला आणि देशाला कायम अभिमान राहील.

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here