दापोलीतील ‘श्री मानाचा गणपती’

0
3111

दापोली बाजारपेठेतील लोकमान्य टिळक चौकातील ‘हे गणराज’ या सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना सन १९२८ साली झाली. त्यावेळी या सार्वजनिक गणपती मंडळाचे नाव ‘उत्साही कार्यकारी सार्वजनिक उत्सव मंडळ’ असे होते.या मंडळात पी. पी. मेहता, बंडू काका, मुस्ताक देशमुख, अब्बास मण्यार, कांतिलाल जैन, बाबुभाई जैन, शांताराम टोपरे आणि इतर काही मंडळी असे सगळे सभासद होते. त्यावेळी या सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना ते ए.जी. हायस्कुल, प्रभुआळी, अशा अनेक ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार करत. दर पाच वर्षाला एक ठिकाण असा उपक्रम असायचा. या सार्वजनिक गणेशोत्सवाला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दापोलीतील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव आहे. १९६५ पासून हा सार्वजनिक गणेशोत्सव ‘श्री मुरुडकर’ यांच्या मालकीच्या जागेत पार पडतो आहे.

सन २०१२ पासून येथील टिळक चौक रिक्षा स्टॅन्डचे सभासद व अध्यक्ष श्री. संजय घाडगे, उपाध्यक्ष श्री. शंकर मायदेव, सचिव श्री संजय सावंत, खजिनदार महेंद्र शिंदे, सदस्य श्री. सचिन गायकवाड यांसारखे काही सक्रिय कार्यकर्ते एकत्र येऊन १९२८ साली सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाचे काम करीत आहेत.
या सार्वजनिक गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीची प्राणप्रतिष्ठा व पूजा झाल्या शिवाय इतर या भागातील घरातील गणेशांची प्राणप्रतिष्ठा व पूजा होत नसल्यामुळे या गणपतीला श्री मानाचा गणपती असे नावलौकिक आहे. या मंडळातर्फे दापोली मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येतात. या मध्ये शिवजयंती, मकर संक्रांत, दही हंडी, नारळ लढवणे इत्यादी. २०१५-१६ साली या मंडळाकडून महिला मंडळाची स्थापना करण्यात आली, तसेच अनेक लोकोपयोगी कामे करण्यासाठी ‘श्री मानाचा गणपती’ आपत्कालीन मंडळाची स्थपणा करण्यात आली. या अंतर्गत रुग्णवाहिका व शववाहिनी अत्यंत अल्पदरामध्ये लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरीब रुग्णांसाठी ही सुविधा मोफत दिली जाते व तातडीची मदत म्हणून रोख रु. २००० ची व्यवस्था केली आहे.
हे मंडळ फक्त गणपती उत्सवापर्यंत मर्यादित नसून बारा महिने लोकसेवा देत आहे. त्यामुळे दापोलीतला मानाचा गणपती हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गणपती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here