दापोलीतील कीर्तनकार, देशमुख सर

    0
    2053

    ह. भ. प. अशोक वामन देशमुख उर्फ ‘देशमुख सर.’ हे आज संपूर्ण दापोली तालुक्याला परिचित आहेत. कदाचित तालुक्यात एखादचं गाव किंवा मंदिर असेल जिथे सरांचं कीर्तन झालेलं नाही. गेली चाळीसहून अधिक वर्षे त्यांची दापोलीत कीर्तन सेवा अविरत चालू आहे.

    त्याचं मूळ गाव रत्नागिरी जवळील पावस. त्याचं मॅट्रिक पर्यंतच शिक्षण झालं पावसमध्ये. मॅट्रिकला त्यांना ७६ टक्के गुण मिळालेले. त्यामुळे त्यांना पावसलाच शाळेमध्ये संस्कृत शिक्षकाची नोकरी मिळाली. ती करता-करता त्यांनी रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयातून संस्कृतची बी.ए. व मराठीची एम.ए.ची पदवी प्राप्त केली. एम.ए झाल्यामुळे त्यांना कृषि विद्यापीठात शिक्षकाची नोकरी मिळाली व ते कायमचे दापोलीकर झाले. पुढे त्यांनी पुन्हा एम.ए केले हिंदी भाषेतून. विद्यापीठात ते मराठी, हिंदी असे विषय शिकवीत होते. ‘एन.के.वराडकर-बेलोसे कॉलेज’ तिथे सुद्धा त्यांनी तीन वर्षे एम.ए.चे वर्ग घेतले. विद्यापीठात वीसहून अधिक वर्ष शिकवल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

    दापोलीमध्ये राहून त्यांनी शिक्षक धर्माबरोबर आपला कीर्तनधर्म जोपासला. मुळात सर कीर्तनकार झाले ते अगदी योगायोगाने. त्यांचे वडील कीर्तनकार होते. उत्तम तबला व पेटी वादक असल्यामुळे सर नेहमी वडिलांच्या साथीला बसायचे. एके दिवशी महाविष्णूच्या देवळात वडिलांचे कीर्तन होते; परंतु तेव्हा वडिलांची अचानक तब्येत बिघडली आणि त्या स्थितीत त्यांना कीर्तन करणे जमणारे नव्हते, शिवाय त्यावेळी अन्य कोणी कीर्तनकार मिळणेही अशक्य झालेले, शेवट घराची परंपरा अखंड राखण्यासाठी सरांनी कीर्तन करण्याची तयारी दर्शवली आणि महाविष्णूच्या देवळात पहिले कीर्तन केले. पुढे असेच प्रसंग दापोलीत असताना करजगाव आणि लाडघर येथे आले. तेही सरांनी तसेच निभावले. तेव्हापासून झालेली सुरुवात आजतागायत तशीच चालू आहे.  स्वामी स्वरूपानंदांचा आशीर्वाद, कुटुंबीयांच सहकार्य आणि दापोलीकरांच मिळालेलं प्रेम यामुळे कीर्तन सेवेचा मार्ग आणखीन सुकर झाला, असे ते प्रत्येक कीर्तनात आवर्जून सांगतात.

    देशमुख सरांना त्यांच्या कीर्तन सेवेबद्दल २००४ साली गिरगाव ब्राह्मण सभेने राज्यस्तरीय ब्रह्मानंद पुरस्काराने सन्मानित केले. सनातन संस्थेने देवर्षी नारद पुरस्काराने त्यांचा गौरव केला. परशुरामला काशी पीठाचे शंकराचार्य नरेंद्र सरस्वतींच्या हस्ते सरांचा सत्कार झाला. शिक्षण सेवेसाठी तर त्यांना अनेक सन्मान प्राप्त आहेत.

    दापोलीतील देशमुख सरांचे कीर्तन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here