सुवर्णदुर्ग

1
48

ही कोकणची ७२० किमी लांबीची किनारपट्टी या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत.  त्या जलदुर्गापैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ला.

        हा किल्ला सोळाव्या शतकातील आदिलशाही राजवटीत बांधला गेला असे म्हणतात.१६६०मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्या अली आदिलशहाला  हरवून हा किल्ला मराठा  साम्राज्यास जोडला.  महाराजांनंतर १६८८ साली राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा अधिकारी म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे यांची नेमणूक केली.  महान सागर सेनानी आणि समुद्रातला शिवाजी म्हटल्या जाणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रेच्या  पराक्रमाचे सुवर्णदुर्ग हे मुख्य केंद्र होते.  कानोजीआंग्रे  पासून तुळाजीआंग्रे पर्यंत हा किल्ला आंग्रेंच्याच ताब्यात राहिला. १७५५साली हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला आणि १८१८ साली  ब्रिटिशांच्या.  पुढे स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांकडे होता.

हा किल्ला साधारण आठ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.  किल्ल्याच्या चारही बाजूस भक्कम तटबंदी आणि   अनेक बुरुज आहेत.तटबंदीवर१०-१२  फुटांची भिंत उभारलेली आहे.  सध्या किल्ला दुर्लक्षीत असल्यामुळे भरपूर झाडे आणि रान वाढलेले आहे, परंतु तटबंदीवरून  फिरून संपूर्ण किल्ला पाहता येतो.  किल्ल्याचे महाद्वार पूर्वेस आहे.  या  महाद्वारालगतच्या भिंतीवर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. पायरीवर कासव आहे.  दरवाजाच्या दोन्ही बाजूस रक्षक  खोल्या आहेत.  किल्ल्यात शेवाळांनी भरलेले तलाव,  पायऱ्या असलेली विहीर आणि काही पडके चौथरे आहेत.  किल्ल्याबाहेर दोन निकामी तोफा देखील  पडलेल्या आहेत.  या किल्ल्याचा  बाहेरील भाग काळ्या आणि जांभ्या या दोन्ही दगडांनी बांधलेला आहे.

हर्णै बंदरातून होडीत बसून सुवर्णदुर्ग कडे जाण्याची मजा काही औरच आहे. होडीतून उतरल्यावर किल्ल्याच्या भोवताली असलेले काळे खडक आणि पसरलेली पांढरी वाळू उन्हामुळे चमकताना दिसते.  निळाशार समुद्र पांढऱ्या लाटा घेऊन पायाशी येतो, वारा एखाद्या खट्याळ पोरासारखा समुद्रावरून खेळत राहतो. हे सगळं अनुभवण्यासाठी प्रत्येकाने दापोलीत येऊन या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे.

 

 

1 COMMENT

  1. सुवर्णदुर्ग किल्यावर जाण्यासाठी काही विशेष सुविधा उपलब्ध आहेत का? किंवा तेथील मासेमारीसाठी जाणारे लोक किल्ला फिरवण्यासाठी मदत करतात का.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here