गोरखचिंच ( बाओबाब )

1
5651

गोरखचिंच. जगातील दुर्मिळ वृक्षांमध्ये या झाडाची गणना होते. मूलतः आफ्रिका खंड, अरबी व्दिकल्प, मादागास्कर या भागात आढळणारी ही वृक्षप्रजाती अरब आणि आफ्रिकन लोकांनी भारतात आणली. बाँबेकेसी कुळ असल्यामुळे या वृक्षाला बाओबाब, तर माकडांना याची फळे आवडत असल्यामुळे ‘मंकी ब्रेड ट्री’ असे या झाडाला म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव आहे, ‘ॲडॅन्सोनिया डिजीटाटा’. अठराव्या शतकात फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञ मायकेल ॲडन्सने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ शास्त्रीय नावातील वंशाचे नाव ‘ॲडॅन्सोनिया’ आणि हाताच्या बोटासारख्या खंडावरून जागतिक नाव ‘डिजीटाटा’ असे देण्यात आले. भारतात या झाडाला गोरख इमली , गोरख आमली, रुखडो, ब्रम्हलीका असे संबोधले जाते. महाराष्ट्रात हा वृक्ष गोरख चिंच नावाने ओळखला जातो . यातील गोरख हा शब्द ‘गोरक्षी’ शब्दाचा अपभ्रंश दिसतो, तर फळ चिंचेप्रमाणे आंबूस म्हणून ‘चिंच’ ही उपाधी दिलेली आढळते. या झाडाची उंची ५० फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. झाडाचा बुंधा फारच मोठा असून खोडाचा परीघ १०० फुटापर्यंतही असतो. झाडाची साल गुळगुळीत व करडी असते. पाने हस्ताकृती संयुक्त , लांब देठाची आणि मोठी दले असलेली असतात. याचे फूल साधारणतः १५ सेमी व्यासाचे, रंगाने पांढरे कक्षस्थ व लोंबते असते. त्यांना मंद सुहास असतो. फुल गळून तेथे जे फळ येते ते आकाराने दुधी-भोपळ्यासारखे किंवा नारळासारखे असते. फळाची साल मखमली, लवदार असून वजन साधारणतः दिड किलोपर्यंत असते. फळातला गर चवीला चिंचेसारखा असतो आणि त्यात व्हिटामिन ‘सी’ ची मात्रा भरपूर असते. गराचं सरबत अतिशय शितल असून शरीरातला दह आणि तृष्णा कमी करतं. दमा, अतिसार आणि आव पडणे इत्यादी विकारांवर ते गुणकारी आहे. फळाप्रमाणे झाडाची साल व लाकुड अत्यंत उपयोगी आहे. खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. आंतरसाल उत्तम टिकावू असल्यामुळे त्याचा वापर ब्राउन पेपर तयार करण्यासाठी होतो. झाडाचे लाकूड हलके असल्यामुळे गुजरातमध्ये मासेमारीसाठी याच्या लाकडापासून होड्या तयार केल्या जातात .
अत्यंत उपयोगी असा हा वृक्ष भारतभर सर्वत्र आढळतो; पण दुर्मिळरीत्या. आनंदाची बाब म्हणजे दापोलीतील बुरोंडीमध्ये गोरखचिंचेचे एकून सहा वृक्ष आढळले. त्यापैकी चार महामाईनगरमध्ये (कलमवाडी) एकाच ठिकाणी आहेत, तर एक महामाईनगरपासून थोडेसे दूर हुसेनपूरा मोहल्ल्यात. हे वृक्ष जर प्रत्यक्ष पाहायचे असतील तर या स्थळाला नक्की भेट द्या आणि आमचे फेसबुक पेज लाईक करून दापोलीतील नवनवीन अपडेट मिळवीत रहा.

1 COMMENT

Leave a Reply to Vishal Ravindra Bhambid Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here