१०० मैल

0
78

भार्गवचं बालपण मजेशीर आणि खोड्या करत गेलं.  ज्या शाळेत भार्गवने इतक्या करामती केलेल्या ती राष्ट्रीय शाळा दापोलीच्या राष्ट्रीय शाळेत जाणाऱ्या मुलांना पुढे नोकऱ्या मिळणार नाहीत; या अफवेमुळे बंद पडली. अभ्यासाची फारशी आवड नसलेल्या भार्गवपुढे आता काय? असा प्रश्न उभा राहिला होता. एक पर्याय होता, तो म्हणजे  सरकारी
शाळा! पण भार्गवने सरकारी शाळेत जाणं हे उभ्या आयुष्यात शक्य नव्हतं. टाळसुऱ्याला भार्गवचं आजोळ होतं. अंगमेहनत करायला मागे न हटणाऱ्या भार्गवने मामाकडे जाऊन शेती करायचा विचार केला. भार्गवचा हा मामा म्हणजे अनंतामामा. अनंतामामा हा अतिशय धाडसी आणि चळवळी होता त्यामुळे मामा भाच्याची जोडी जमणं सहाजिकंच होतं. भार्गव मामाकडे गेला आणि तिथे रमला, तिथे त्याने शेती करून पैसे कमवले. सगळं मनासारखं झालेलं असलं तरी भार्गवचं मन आता टाळसुऱ्याला रमत नव्हतं. अनंतामामा त्याला बऱ्याच गोष्टी सांगायचा आणि केसरीतून येणाऱ्या बातम्या त्या गोष्टींना पोषक ठरत गेल्या. भार्गवचं मन हे देश चळवळींकडे दिवसेंदिवस ओढ खात होतं. त्याचवेळी मुळशीच्या सत्याग्रह सुरु झाला. देशप्रेमी भार्गवने अखेर निर्णय घेतला, की आपणही पुण्याला जायचं आणि सत्याग्रहात सामील होऊन पराक्रम गाजवायचा. भार्गवला एखाद्या आश्रमात जायचं होतं, विद्याभ्यास करून देशसेवा करायची होती. पण सगळेच प्रयत्न फसत होते. असं असताना देखील शांत बसेल तो भार्गव कसला? त्याला वाईच्या आपल्या मोरूकाकांची आठवण झाली. मोरूकाका शिकण्यासाठी वाईला प्राज्ञपाठ शाळेत राहिले आणि शिकून तिथेच मोठे झाले होते. भार्गवचा विचार पक्का झाला. काही झालं तरी आपण वाईला जायचं आणि खूप शिकायचं, चळवळीत भाग घ्यायचा आणि देशसेवा करायची.

कोणालाही न सांगता एका पहाटे भार्गव आपली सायकल घेऊन वाईला निघाला. दापोली आणि वाई म्हणजे तब्बल १०० मैलांचं अंतर! भरपूर ऊन, कठीण चढणं, त्यात पंक्चर झालेली सायकल  अश्या बऱ्याच अडथळ्यांना त्याला सामोरं जावं लागलं आणि अखेर तो वाईला प्राज्ञपाठ शाळेत पोहोचला. वडिलांची चिट्ठी नाही म्हंटल्यावर तिथले व्यवस्थापक, तात्यासाहेब आपटे यांनी भार्गवला निघून जाण्यास सांगितलं. भार्गव अतिशय निराश झाला आणि तो कृष्णानदीच्या काठावर जाऊन बसला. एका क्षणाला त्याच्या मनात जीव द्यायचा विचार सुद्धा आला.  पण कृष्णामाईच्या थंड पाण्याचा स्पर्श होताच त्याचं गरम झालेलं डोकं शांत झालं. पण आता करावं तरी काय? असा विचार करताना त्याच्या डोक्यात एक व्यक्ती आली. ती म्हणजे, प्राज्ञपाठ शाळेतले नारायणशास्त्री. ज्यांना भेटायला आलो त्यांची भेट झालीच नाही असं त्याच्या लक्षात आलं. भार्गवने दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ठरवल्या प्रमाणे भार्गव शाळेत गेला आणि नारायणशास्त्रींना भेटला पण, त्यांनीहि चिट्ठी जवळ नसल्याने त्याला प्रवेश देण्यास नकार दिला. भार्गवने त्यांना आपल्या मोरूकाकांची आठवण देऊ केली. इतकंच न्हवे तर प्रेवेश दिला नाहीत तर महाबळेश्वरला जाईन आणि स्वतःला सायकलला बांधून जीव देईन असं हि म्हणाला. नारायणशास्त्री हळवे होते. त्यांनी  भार्गवला एका अटी वर प्रवेश देण्याचं मान्य केलं.

ती अट म्हणजे भार्गवने त्यांच्याच सोबत राहायचं आणि ते सांगतील ते करायचं. भार्गवला ही अट मान्य होती, नारायणशास्त्रींना महात्मा गांधीजींचं सत्याग्रह आंदोलन आणि स्वच्छता मोहिम सुरु करायची होती पण, त्यासाठी हवे असणारे विद्यार्थी त्यांना मिळत नव्हते. भार्गवकडे बघताच त्यांना तो या कामासाठी योग्य वाटला आणि भार्गवला
सोबत घेऊन ही  कामं सुरु करायचा विचार पक्का केला.

भार्गव अतिशय खुष होता. कारण त्याला नुसताच प्रवेश मिळाला नव्हता तर नारायणशास्त्रीं सोबत राहायला मिळणार होतं. लहानपणापासून पाहत आलेल्या स्वप्नाच्या दिशेने भार्गव आता वाटचाल सुरु करणार होता. गांधीजींच्या मोहीमा आणि आंदोलनांचा तो भाग होणार होता आणि देशसेवेचा ठाम विचार आता कृतीतून लोकांपर्यंत पोहोचवणार होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here