करामती भार्गव लघुकथा (भाग २)

0
81

एकला चलो रे…

भार्गवच्या मनात इंग्रजांच्या विरुद्ध लहानपणापासूनच राग निर्माण झालेला, शाळेत गेल्यावर तर तो आणखीनच वाढला आणि त्याला कारणंही तशीच होती. भार्गवने आपल्या आयुष्यातला पहिला पराक्रम केला तो शाळेतच.राष्ट्रीय शाळेसमोरच मिशनचं  हायस्कूल होतं. राष्ट्रीय शाळा उघडली आणि मिशनच्या  हायस्कूल मधली मुले तिथून राष्ट्रीय शाळेत जाऊ लागली. अल्फ्रेड गॅडने  हा तेथील सोसायटी ऑफ दि प्रोपगेशन ऑफ गौस्पेल याचा प्रमुख. आल्फ्रेड गॅडने हा कोण कुठला कोणालाच माहित नव्हतं . गोरा पान, उंच आणि घाऱ्या डोळ्यांचा असा इंग्रज तरुण. शाळेच्या वेळेत तो मिशनच्या  हायस्कूल मध्ये इंग्रजी शिकवायचा आणि बाकी वेळेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा. गॅडने हा क्रूर होता. गरिबांना सक्तीने वागवायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा, धर्म बदलण्यासाठी नाही म्हटलं कि त्या लोकांना चर्चच्या शेजारच्या कोठडीत उपाशी ठेवायचा.  हे सगळे किस्से भार्गवच्या कानी पडत होते आणि त्याच्या मनात गॅडनेबद्दलचा राग वाढत होता.

गणपती जवळ आले होते. मिशन हायस्कूल मध्ये गोगटे नावाचे शिक्षक होते. त्यांनी शाळेत गणपती बसवायची इच्छा गॅडनेकडे व्यक्त केली. गॅडनेने त्यांना गणपतीचं चित्र दाखवायला सांगितलं, तसं गोगटेंनी चित्र काढून त्याला दाखवलं, त्यावर गॅडने हसला हा हा हा! हे काय हत्तीच्या तोंडाचा देव? आणि ते चित्र फाडून पायाखाली तुडवलं. गोगटेंना राग अनावर झाला त्यांनीही एका कागदावर क्रॉस काढला, पायाखाली तुडवला आणि तडख राजीनामा दिला. संध्याकाळपर्यंत ही बातमी दापोलीत पसरली. लहान भार्गवही संतापला आणि या बाबतीत काही तरी करायचं असं त्याने ठरवलं. भार्गव हा खोडकर होता, त्याच्या डोक्यात अनेक कल्पना येऊ लागल्या. त्याने एक युक्ती केली, एका कागदावर क्रॉस काढला आणि आपल्या बॅगेत ठेवला. शाळा सुटली आणि तो आपल्या मित्रांबरोबर घरी जाऊ लागला. मिशनची शाळा ही सुटली. त्यातला काही मुलांना भार्गवने जवळ बोलावलं, ती मूल आलीही आणि भार्गव काहीच बोलेना, कोणाला काही कळेपर्यंत त्याने बॅगेतून तो कागद काढला आणि त्यांच्या समोर फाडून पायाखाली तुडवला. हा सगळा प्रकार होताच मुलांमध्ये मारामारी सुरु झाली पण, भार्गव मागे हटेल तर ना. इतकं होऊनही भार्गवचं मन काही शांत झालं नाही. त्याला सरळ गॅडनेलाच धडा शिकवायचं ठरवलं होतं. त्यासाठीचा वेगळा आणि चांगलाच बेत त्याने आखला होता.

उन्हाळ्याचे दिवस होते, भार्गवच्या डोक्यातली कल्पना  त्याने आपल्या मित्राला म्हणजे अप्पा मंडलिकाला सांगितली. गॅडने साहेबाची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी उठून तो प्रार्थनेसाठी चर्च मध्ये जायचा आणि मग तिथून शाळेत. हे सगळं भार्गवने बघून  ठेवलेलं. त्याच प्रमाणे एक दिवस उजाडला आणि गॅडने साहेब उठून चर्चमध्ये जाऊन आला आणि शाळेच्या दिशेने चालू लागला. शाळा  भरायची वेळ होती म्हणून रस्त्याला मुलंही होती. भार्गव आणि अप्पा एका झाडामागे गुपचूप उभे होते, नुसते उभे  नव्हते, तर हातात शेणाचे  गोळे होते. गॅडने जवळ यायची वाट बघत होते. जसा जसा गॅडने पुढे आला तसे हे दोघे मनाची तयारी करत होते. अप्पा निघाला भित्रा! गॅडने जवळ येताच अप्पा शेणाचा गोळा तिथेच टाकून पळून गेला. पण भार्गव? तो कसला घाबरतोय! तो तिथेच वाट बघत उभा राहिला. गॅडने जवळ आला आणि ठाप्प…..! गॅडनेच्या  पांढऱ्या शुभ्र गणवेशावर शेणाचा गोळा जाऊन आदळला आणि भार्गव लगेच तिथून फरार झाला. गॅडनेला काही कळायला मार्ग नव्हता . लोकांमध्ये फजिती नको म्हणून तो चटकन घरी आला आणि कपडे बदलून शाळेत आला. गॅडनेने मात्र भार्गवला पाहिलेलं पण ओळखलं नव्हतं . शाळेत येताच त्याने भार्गवच्या शाळेला पत्र लिहिले कि तुमच्या शाळेतल्या कोणीतरी माझ्या अंगावर शेण फेकलं, याची चौकशी करा आणि शिक्षा द्या. शाळेत चौकशी झाली. भार्गव कितीही मस्तीखोर आणि चळवळी असला तरी खोटेपणा त्याच्या अंगी नव्हता.  त्याने आपला पराक्रम कबूल केला, गुरुजींनी त्याला प्रचंड मारलं पण भार्गवच हू कि चू नाही , गुरुजींनी आपला  राग शांत होईपर्यंत त्याला  बदडून काढलं.  असं का केलं ? विचारल्यावर भार्गव म्हणाला “तो गोरा साहेब आहे त्याला शेण मारलं तर काय बिघडलं?” आणि माफी मागायलाही नकार दिला त्यावर गुरुजींनी त्याला आणखी मारलं. अखेर ते ही वैतागून शांत बसले. हा  प्रकार दापोलीत पसरायला काही वेळ लागला नाही. काही लोकं खुश झाले तर काही त्याच्या विरोधात होती आणि घरी आई वडील हे आश्चर्यचकितच झाले. असा हा जिद्दी आणि देशप्रेमी  भार्गव!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here