स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’

0
3147

 


देशभक्त चंद्रकांत खेमजी उर्फ चंदुभाई मेहता यांचे दापोलीतील माटवण हे गाव. माटवणच्या खेमजी दामोदर मेहता यांचे ते द्वितीय पुत्र. खेमजी मेहता हे भानघर गावचे वारसा हक्कानुसार असलेले खोत. पण भिडस्त स्वभावामुळे खऱ्या अर्थाने खोतकी त्यांना कधी गाजवताच आली नाही. त्यांना चार पुत्र झाले. मोठा भगवान नंतर महादेव, किसन आणि धाकटा मदन. द्वितीय चिरंजीव सोमवारी जन्माला आला म्हणून ‘महादेव’ नाव ठेवले गेले. मुलाच्या काकांच्या मुलाचे नाव ‘माधव’ असे साधर्म्य असलेले म्हणून मुलाच्या आत्येने ‘महादेव’ नाव बदलून ‘चंदू’ ठेवले. त्यावरून पुढे चंदुलाल, चंद्रकांत, चंदुभाई अशी नावे झाली.

सरकारी जन्म नोंदीप्रमाणे चंदुभाईंची जन्मतारीख १६-८-१९२६ अशी आहे. परंतु शाळेत मात्र १५-६-१९२६ अशी आहे. कदाचित शाळेतील तारीख ही त्यावेळच्या प्रचलित पद्धतीने अंदाजाने टाकली गेली असावी. १९३८ साली पहिलीची परिक्षा पास झाल्यानंतर महाडमध्ये आत्येकडे राहत असताना ‘किर्लोस्कर’ अंकात दापोलीच्या श्री. बाबा फाटकांवर साने गुरुजींनी लिहिलेला ‘कोकणस्थ ब्राम्हण चांभार’ हा लेख त्यांच्या वाचनात आला. तो लेख वाचून ‘देशासाठी काहीतरी करावे’ अशी इच्छा त्यांच्या मनात तयार झाली. सुट्टीत घरी आल्यावर त्यांनी बाबांशी भेटण्याचा प्रयत्न केला; पण त्यावेळेस भेट झाली नाही. एक दिवस अचानक शिवनेरीच्या बहिणीकडून माटवणला येत असताना त्यांची बाबांशी भेट झाली. १४ वर्षाचा नवा सहकारी मिळाला म्हणून बाबा आनंदले व त्यांनी चंदुभाईंना चळवळीत सहभागी करून घेतले. तेव्हा बाबा काँग्रेसची युद्धविरोधी भूमिका गावागावात जाऊन सांगत होते. माटवणात तर त्यांनी जाहीर सभाच घेतली. त्या सभेसाठी आणि सभेपर्यंतच्या वास्तव्यासाठी चंदुभाईंनी त्यांना जमेल तेवढी मदत केली. परंतु त्यानंतर काही दिवसातच बाबा फाटकांना अटक झाली व चंदुभाईंचा प्रत्यक्ष स्वतंत्र चळवळींशी दोन वर्षे संबंध तुटला. त्या दोन वर्षात महाडमधील राष्ट्रसेवादलच्या शाखेत जाणे, प्रभातफेरी काढणे असे कार्यक्रम मात्र चालू होते. ४३ ला बाबा फाटक पॅरोलवर सुटले तेव्हा त्यांनी पत्र पाठवून चंदुभाईंना बोलावून घेतले. ‘नोकरीला जातो’ असे आई वडिलांना खोटे सांगून चंदुभाई घरातून बाहेर पडले व दापोलीत जाऊन श्री. बाबा फाटक, विठ्ठल परांजपे व पुरुषोत्तम हरणे यांना जाऊन भेटले. तिथे ब्रिटिश सरकारचा नायनाट करण्याची योजना आखली गेली. त्यानुसार पोस्टाच्या तारा तोडल्या गेल्या, टपाल लुटण्यात आले, शस्त्र-अस्त्रांचा साठा करण्यात आला व ब्रिटिश सरकारचा ससेमिरा पाठीशी लागल्यामुळे भूमिगत होण्यात आले. चंदुभाई त्यावेळेस मुंबईतील श्री. बापू सुर्वे या इन्कमटॅक्स खात्यामध्ये नोकरीस असलेल्या मित्राकडे काही दिवस वस्ती करून होते. बाबा फाटकांना मात्र मुंबईतल्या ‘मूषक महाल’ येथे सानेगुरुजी, एच. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये यांसमवेत अटक झाली. चंदुभाईंवर देखील वॉरण्ट निघाल्यामुळे त्यांच्या माटवणच्या घरावर जप्ती आली.

पुढे १९४४ च्या गांधी सुटकेनंतर सर्व भूमिगताप्रमाणे ते आपल्या घरी परतले. पण माटवणला आल्यानंतर देखील त्यांनी थोडासाच काळ घरी घालवला व पुन्हा घर सोडून कणकवलीला पु. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरीत गेले. पुण्याचे श्यामराव जोशी, तोडणकर गुरुजी कृष्णादास शहा इ. समवेत ते अप्पासाहेबांच्या भंगीमुक्ती योजनेसाठी साधकाश्रमात दाखल झाले. तेथून निघाल्यावर काही काळ सानेगुरुजींच्या सहवासात राहिले. दापोलीत येऊन सेवादल, प्रभातफेरी, सरकार विरुद्ध बुलेटिन वाटणे इ. कार्य करीत असल्यामुळे रत्नागिरी-ठाणे-पुणे असा प्रवास करत त्यांची रवानगी हिंडलगा तुरुंगात झाली, तिथे त्यांना श्री. रंगराव दिवाकर, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, माधव लिमये, अण्णा गुरुजी इ. व्यक्तींचा सहवास लाभला. श्री केशव उर्फ बंडू गोरे हे समाजवादावर बौद्धिकं घेत असत. बौद्धिकातून व थोर व्यक्तींच्या सहवासातून ते समाजवादाकडे वळले.

सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या आदेशावरून ४६ साली त्यांची मुक्तता झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुन्हा ते गोपुरीत आप्पासाहेबांच्या आश्रमात दाखल झाले. भंगीमुक्तीचे, सफाईचे कार्य चालू ठेवले. भारताच्या स्वातंत्र्यदिनी ते गोपुरीत होते.
नाशिक अधिवेशनानंतर समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला तेव्हा चंदुभाईंनी आठल्ये गुरुजी, शिवाजी सावंत, लक्ष्मण तरे, दादा शिखरे, भाई बेर्डे, भाई शेट्ये, भाऊ तेंडुलकर इ. समवेत समाजवादी पक्षाचे कार्य सुरु केले. राष्ट्रसेवादल, ‘साधना’ साप्ताहिक व समाजवादी पक्ष हे त्यांच्या जीवनाचे अंग बनले. बाबा फाटक मात्र काँग्रेमध्येच होते. त्यांच्याकडून समाजवादयावर कधी-कधी कडाडून आरोप व्हायचे, त्या आरोपांवर चंदुभाईंकडून प्रतिआरोप केले जायचे. पण दोघांमधील वैयक्तिक जिव्हाळा शेवटपर्यंत टिकला. एकदा अशाच आरोपाच्या फैरी चालू असताना सानेगुरुजींनी दोघांना प्रेमळ ताकीद दिली होती. सानेगुरुजींनी झोपेच्या गोळ्या घेऊन मृत्यूला कवटाळले तेव्हा त्यांना अमाप दुःख झाले. गुरुजींचे कार्य चालू ठेवावे म्हणून त्यांनी प्रभातफेरी, सेवादल शाखा, साने गुरुजींचा संदेश असलेली पत्रे व पुस्तकांचे वाटप चालू केले.
पुढे समाजवादी पक्षाच्या प्रचारासाठी श्री. जयप्रकाश नारायण याचा देशभर दौरा चालू होता. चन्दूभाईंनी त्यांना आग्रहाने बोलावून दापोली, दाभोळ येथे सभा आयोजित केल्या. कोकणचे खासदार बॅ. नाथ पै यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभत होते. १९५२ साली आप्पासाहेब पटवर्धन यांनी भूदान चळवळीच्या प्रचारार्थ स्वतंत्र सभा आयोजित केल्या होत्या. तेव्हा चंदुभाईंनी आपल्या गावी नेऊन स्वतःच्या जमिनीतील मोठा वाटा त्यांच्या स्वाधीन केला आणि गावातील इतरांना भूदान करण्यास राजी केले.

१९५३ साली शासनाने ग्रामसफाई कार्यक्रमात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सहकार्यानं विकास योजना प्रकल्प राबविण्याचे ठरविले. तेव्हा आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार चंदुभाईंनी पक्षाचा राजीनामा दिला व योजनेकडे वळले. ह्या योजनेचे काम पाहण्यासाठी श्री. यशवंतराव चव्हाणांनी दापोली- मंडणगड विकास गटाला भेट दिली होती. तेव्हा चंदुभाईंनी यशवंतरावांशी खुली चर्चा केली. योजना संपल्यानंतर त्यांना आरोग्य खात्यात नोकरी मिळाली. आईच्या आग्रहामुळे चंदुभाई फेब्रुवारी १९५५ ला विवाहबद्ध झाले. विवाहानंतर थोड्याच दिवसात गोवामुक्ती सत्याग्रहाने जोर घेतला. चंदुभाई त्यातदेखील सामील झाले आणि बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा घरी परतले.

पुढे त्यांनी माटवणात बारमाही रास्ता व्हावा, एस. टी. वाहतूक, पीकअपशेड, वाचनालय, शाळा, हायस्कुल इ. साठी प्रयत्न केले. कातकरी समाजाच्या व हरिजनांच्या सुधारणेसाठी परिश्रम घेतले. दापोलीत सरकारी दवाखान्याजवळ त्यांचे घर होते. तिथे तर रुग्णाची, त्याच्या नातेवाईकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जात असे.

दापोलीत पक्षीय मतभेद असूनसुद्धा चंदुभाईंचे सर्वांशी कौटुंबिक स्वरूपाचे, जिव्हाळ्याचे नाते होते. मालूशेट, दादा खेडेकर, अप्पा मंडलीक, शैलाताई मंडलीक यांच्याशी त्यांची भेट व खुलेपणाने चर्चा असायची. महात्मा गांधींचे विचार तळागाळापर्यंत पोहचावे म्हणून गांधी जन्मशताब्दी निमित्ताने बाबा फाटक व त्यांनी मिळून कार्यक्रम आखले होते. सर्वोदयी चळवळ व सरकारच्या दारूबंदी प्रचार खात्यात असलेले श्री. वाघमारे याना घेऊन ते संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये फिरत असत. त्या प्रचारात समाजप्रबोधनावर आधारित चित्रपटाचाही समावेश होता. दापोलीतल्या ‘नवभारत’ छात्रालयासाठी सुद्धा सामंत गुरुजींना मदत करून त्यांनी आपला हातभार लावला. दापोलीत खादी मिळेनाशी झाल्यावर त्यांनी स्वतः खादी विक्रीचे दुकान काढले. कारण लोक खादी वापरतात याचा त्यांना मनस्वी आनंद वाटत होता. बाबा फाटक व त्यांनी मिळून दापोलीत सानेगुरुजींच्या कथामालेचे अधिवेशन आयोजित केले होते.

देशात आणिबाणी पुकारली गेली तेव्हा तो निर्णय चंदुभाईंना रुचला नाही. म्हणून त्यांनी सरकारी नोकरीत असतानादेखील आणीबाणी विरोधी साहित्य, पत्रके वाटणे, संदेश पोहचवणे इ. कार्य सुरु केले त्यामुळे सी. आय. डी. ची. माणसे त्यांच्या घरी चौकशीलाही येऊन गेली; परंतु चंदुभाई हाती न गवसल्यानं त्यांना परत जावे लागले.

१९८४ ला ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर फॅमिली प्लॅनींग असोसिएशन इंडिया तर्फे दापोलीत ग्रामीण विकास प्रकल्पाचे दोन वर्ष कार्य केले. त्यानंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ राहू लागली. १९८१ साली व १९८८ साली एकुलत्या एक मुलीच्या व पत्नीच्या झालेल्या निधनाने ते संपूर्णतः खचून गेले. शामराव पेजेंनी स्वातंत्रसैनिक मानधनासाठी आग्रहाने त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला. चंदुभाईंना शासनातर्फे सन्मानपत्र व ताम्रपट देण्यात आले.
४ जानेवारी १९९४ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here