कोकणातील आगोट

0
2749

कोकणातील लोकांना ‘ आगोट ‘ हा शब्द तसा नवीन नाही. पूर्वी साधारण मार्चनंतर मे अखेपर्यंत ‘ आगोट ‘ ची लगबग कोकणात सर्वत्र दिसायची. पावसाळ्यासाठीची तरतूद करताना कोकणी माणूस या काळात व्यस्त असतो. 

कोकणात पूर्वीपासून शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने संपूर्ण पावसाळ्यात शेतकरी राजा शेतीच्या कामांमध्ये गढून जातो. रोहीणी नक्षत्रानंतर शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची धांदल सुरु व्हायची. त्यानंतर संपूर्ण पावसाळ्यात कोकणातील शेतकऱ्यास अजिबात फुरसत मिळत नसे. शेतीची कामे टाकून जिन्नस गोळा करणे त्याला शक्य होत नसे. याशिवाय पावसाळ्यात वारंवार नद्यांना येणारे पूर आणि पूरांमुळे, नैसर्गिक पडझडीमुळे बंद होणारे मार्ग, गावागावांशी तुटणारे संपर्क यांमुळे घरात दैनंदिन वापराच्या जिन्नसांची कमतरता होऊ नये यासाठी कोकणातील शेतकरी आवश्यक जिन्नस पावसाळ्याआधीच घरात भरून ठेवत होता. या गरजेतूनच ‘ आगोट ‘ची संकल्पना पुढे आली असावी.


पूर्वी चलनी रुपयांपेक्षा वस्तुविनिमयाची पद्धत अधिक रुढ होती. आपल्याकडे निर्माण किंवा उत्पादीत होणारी वस्तू दुसर्‍या गरजवंतास देऊन त्या बदल्यात त्याच्याकडील वस्तू, जिन्नस विकत घेण्याची प्रथा होती. कोकणातील शेतकरी त्यांचा शेतमाल कुंभार, शिंपी, सोनार, लोहार, वाणी, सुतार यांसारख्या पारंपारिक कारागीरांस देऊन त्या बदल्यात दैनंदिन वापराच्या वस्तू व जिन्नस घेत होते. वाळलेल्या सरपणाचे भारे, तांदूळ, नाचणी, उडीद कुळीथ, मूग, चवळी यांसारखी धान्ये, वस्तू समुद्र किनारी वास्तव्य करणाऱ्या कोळी लोकांस विकून त्या बदल्यात सूकी मासळी घेऊन येत होते. घाटावरील अनेक शेतकरी आगोटच्या काळात घाटावर पिकणारी लसूण, कांदे, मिरची कोकणात आणून व येथील लोकांस विकून त्या बदल्यात कोकणातील सुकी मासळी, तांदूळ, सुके खोबरे यांसारखे जिन्नस तिकडे घेऊन जात होते. या काळात कोकणातील उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या काजूबिया, आंबे विकून त्या बदल्यात वर्षभरासाठी लागणारे जिन्नस खरेदी करण्याची कोकणात आधीपासून प्रथा होतीच.


भात व मासे हे येथील शेतकऱ्यांच्या दररोजच्या आहारातील मुख्य पदार्थ आहेत. जून महिन्यापासून सर्वत्र सागरी मासेमारी बंद होते. पुढील तीन महिन्यांपर्यंत ती बंदच असते. पावसाळ्यात गोड्या पाण्यातील मासे, खेकडे उपलब्ध होत असले तरी अनेकांना शेतीच्या कामांमुळे असे मासे, खेकडे पकडणे शक्य होत नसे. अशा परिस्थितीत येथील खवय्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यासाठी लागणाऱ्या सुक्या मच्छीची खरेदी पावसाळ्यापुर्वी केली जायची. विकत घेतलेली सुकी मच्छी खरेदी करून, ती आणखी वाळवून, आवश्यक वाटल्यास व्यवस्थित तुकडे करून ती पावसाळ्यासाठी हवाबंद बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये भरून ठेवली जायची. आगोटसाठीच्या सुक्या मच्छीच्या खरेदीत प्रामुख्याने बगी, बोंबिल, कोलीम, आंबडखाड, सोडे, बांगडा, ढोमा, लेपा, मांदेली, चेवना, सुरमई यांसारख्या सुक्या मच्छीचा सामावेश असे. आगोटच्या या काळात अनेक स्थानिक बारपेठांमध्ये,आठवडी बाजारांतून अशा सुक्या मासळीची खरेदी- विक्री व्हायची.

काही ठिकाणी काजूबियांच्या बदल्यातही सुकी मच्छी विकत मिळायची. पावसाळ्यात शेतीच्या कामांच्या गडबडीत कमी वेळेत चटपटीत जेवण बनविण्यासाठी अशी सुकी मच्छी खूप उपयोगी पडायची. येथील शेतकऱ्यांबरोबरच समुद्रकिनाऱ्यावर वस्ती करून राहिलेल्या पारंपारिक कोळी समाजबांधवांचीही ‘ आगोट ‘ असायचीच. पावसाळा सुरु होण्यापूर्वी राहत्या झोपड्या शाकारून घेणे, किनार्‍यावर आणलेल्या होड्या व्यवस्थित झाकून, बांधून झोपडीत शाकारून ठेवणे यांसारखी कामे त्यांना पावसाळ्यापूर्वी अगत्याने करावी लागत. पूर्वी बहुसंख्य कोळी समाज माडाच्या झावळ्यांनी शाकारलेल्या झोपडीत राहायचा. त्यामुळे पावसाळ्यात मासेमारी बंद असताना, घरात आराम करताना पावसाच्या पाण्यामुळे गळती होऊ नये, त्रास सहन करावा लागू नये यासाठी त्याला झोपडी व्यवस्थित शाकारावी लागायची. झोपडीची जूनी झापे बदलणे, जुन्या काठ्या, वासे बदलणे यांसारखी कामे तो पावसाआधीच पूर्ण करायचा. याशिवाय मासेमारीसाठी वापरायच्या होड्या पावसाळ्यात मासेमारी बंद असताना व्यवस्थित किनार्‍यावर सुरक्षित ठिकाणी आणून त्यांना माडाच्या झावळ्यांनी शाकारून ठेवणेही आवश्यक असायचे. होडीच्या बुडाला पाणी लागून ती कुजू नये, खराब होऊ नये यासाठी तेवढ्या भागाला डांबर लावावे लागायचे.

 
पावसाळ्याच्या बेगमीसाठी कोकणात एप्रिल ते मे या काळात वर्षभरासाठीचा मसाला तयार करण्याची किंवा कुटून घेण्याची पारंपारिक प्रथा होती. मसाल्याची आगोट एप्रिलपासून सुरु व्हायची. सुकी मिरची आणि मसाल्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर मसाल्याच्या पदार्थांची या काळात फार मोठी खरेदीही व्हायची. मिरचीबरोबरच हळकुंड, दालचिनी, धणे, जायफळ, खसखस, वेलदोडा, दगडफूल, मीरी, लवंग यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा सामावेश मसाल्यात असायचा. भाजका मसाला, गरम मसाला, हिरवा मसाला, मिरचीपूड अशा विविध प्रकारांमध्ये हा मसाला कुटला जायचा. दैनंदिन आहारात आवश्यक असणाऱ्या मसाल्याचे महत्त्व पुर्वीदेखील फार मोठे होते. पुर्वी मसाल्याच्या गिरणी नसताना मुसळ आणि जात्यावरच मसाला दळला किंवा कांडला जायचा. अशा वेळेस मसाला कांडणाऱ्या स्रिया काही पारंपारिक सामुहिक गीतेही गात असत. अशा खेळीमेळीत कामाचा क्षीणही जाणवत नसे.


पावसाळ्यात शेतीच्या कामांच्या गडबडीत वेळोवेळी भात कांडप करणे शक्य होत नसे. कोकणातील ग्रामीण भागात सर्वत्र भाताचे पुर्वी फार मोठे उत्पादन व्हायचे. वर्षभरासाठी आवश्यक असणारे भाताचे उत्पन्न राखून ठेवून शिल्लक राहिलेले भाताचे उत्पादन येथील शेतकरी स्थानिक बाजारपेठेत किंवा इतरत्र विकायचा. पूर्वी भात कांडपासाठी छोट्या गिरण्या होत्या. त्याच्याही आधी येथील घराघरात घिरटीवर भात भरडले जायचे. दगडी जात्याच्या आकाराची परंतु प्रचंड मोठी लाकडी घिरट असे. घिरट लाकडी असल्याने ती एका जागेवरून दुसरीकडे नेणे सोपे होई. घिरटीवर भात भरडणे तसे फार कष्टाचे होते. कधी कधी भात भरडताना घिरटीचा मोठा खुंटा फिरविण्यासाठी दोन दोन माणसे लागत. मात्र घिरटीवर भरडलेला तांदूळ अधिक पौष्टिक असे. कारण भरडल्यानंतरही तांदळावरचे लालसर साल कायम राहत असे. आगोट काळात पुर्वी सामुहिक पद्धतीने एकमेकांचे भात भरडले जाई. याशिवाय पावसाळ्यासाठी लागणारी कुळीथपीठी, पापडांसाठीचे उडीदडाळीचे पीठ अशाच प्रकारे घराघरात दगडी जात्यावर दळले जात असे. पावसाळ्यात भाताबरोबर पातळ कुळीथपीठी किंवा भाकरीसोबत कुळीथपीठीचा झुणका असे चवदार जेवण कमी वेळात तयार होत असे.


पावसाळ्याची तरतूद म्हणून घर धनधान्याने समृद्ध ठेवणे हा आगोटचा एक भाग होताच, पण अशी आगोट सामावून घेणाऱ्या घराची स्थिती सुधारणे, दुरुस्ती करणे हा देखील आगोटचाच एक प्रमुख भाग होता. पुर्वी कोकणातील घरे मातीच्या भींतीची व मातीच्याच भाजलेल्या नळ्यांच्या ( कौलांच्या ) छप्पराची होती. अशा घरांची दरवर्षी डागडुजी व दुरुस्ती करणे आवश्यक असे. दरवर्षी वारा, पाऊस, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे घरांच्या भींती खराब होत, छप्पराचे वासे, रीपा खराब होत आणि छप्पराचे नळे, कौलेही सरकत, फुटत. त्यामुळे पावसाळ्यात उंदीर, घुशींसारख्या व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी छप्पर दुरुस्त करून घेणे हा आगोटचा एक भाग होता. छप्पराचे वासे बदलणे, तुटलेल्या रीपा बदलणे, नळे परतणे हे काम सर्वांनाच जमत नसे. हे काम करणाऱ्या कारागिरांना आगोटच्या काळात क्षणाचीही उसंत मिळत नसे. घरांची छप्परे अशी दुरुस्त केल्यावर पावसाळ्यात गळती होत नसल्याने आगोट काळात अशी छप्पर दुरुस्ती हे आवश्यक काम होते.


रोहीणी नक्षत्रात शेतामध्ये पेरावयाच्या बियाण्यांसाठी आणि साठवणुकीसाठी शेतात पिकलेले भात, नाचणी सारखे धान्य कणग, किंवा कोठारासारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची पद्धत होती. कणग ही बांबूच्या भेतांपासून बनवली जायची. बांबूपासून कणग बनविणे हे फार मोठे कसब होते. ते सर्वांनाच अवगत नव्हते. बांबूपासून बनविलेली कणग घरात सुरक्षित ठिकाणी जमिनीवर उभी करून ती शेणाने सारवून हवाबंद केल्यावर व्यवस्थित वाळविलेले बियाण्याचे धान्य कणगीत सुरक्षित ठेवले जायचे. कणगीत ठेवलेले बियाणे नैसर्गिकरीत्याच सुरक्षित राहायचे. याशिवाय घरातील एखाद्या सुरक्षित खोलीत जमिनीत खड्डा करून व तो व्यवस्थित बंदिस्त करून बनविलेल्या कोठारात, लाकडी किंवा लोखंडी पेटीत, पिंपातही बियाण्याचे धान्य सुरक्षित ठेवले जात होते. बियाण्यासाठी लागणारे, पावसाळ्यासाठी लागणारे असे धनधान्य कणग, कोठार किंवा कोठीमध्ये सुरक्षित साठवून ठेवणे हादेखील आगोटचा एक प्रमुख भाग आहे.


बांबूपासून कणग विणण्याबरोबरच पावसाळ्यात शेतीच्या कामांसाठी लागणारे हारे, टोपल्या, बैलांची टोपरी बांबूपासून बनविली जायची. नांगर जुंपण्यासाठी लागणारे नांगर, दोरी, रुमणी, इशाड, जगाल, फावडे, कुदळ, टोपरे यांसारख्या वस्तूंची व अवजारांची दुरुस्ती पावसाळ्याआधी करून घेणे हा आगोटचाच एक भाग होता. पूर्वी पावसाळ्यात शेतीची कामे करताना पुरुष घोंगडी तर स्रिया इरली वापरीत. बांबूच्या भेतांपासून आणि पळसाच्या पानांपासून अशी आखीव रेखीव इरली बनविली जात. पावसाळ्याआधी आगोटसाठी गावांतील पंचक्रोशीच्या एखाद्या ठिकाणी असे इरली, घोंगड्यांचे बाजार भरत असत. पावसाळ्यात पावसात काम करताना थंडी, वारा, गारठ्यापासून संरक्षण होण्यासाठी उबदार व लोकरी घोंगडीचा चांगला उपयोग होत असे. याशिवाय थंडी वाऱ्यात व पावसात काम करताना शेतात काम करणाऱ्या स्रियांसाठी इरली फार उपयोगी ठरत. एकदा विकत घेतलेली इरली, घोंगडी पुढची चार पाच वर्षे वापरण्यासाठी योग्य असे. काही इरली आणि घोंगड्या अगदी दहा दहा वर्षेही टिकत असत. पावसाळ्यापुर्वीच अशा वस्तूंची तजवीज करणे, दुरुस्ती करणे हाही आगोटचा एक भाग होता.


कोकणातील शेतकरी प्राचीन काळापासून निसर्गपूजक आहे. येथील प्रत्येक शेतकऱ्याचे निसर्गाशी अतूट नाते असून विविध सणांच्या माध्यमातून तो निसर्गाची यथाशक्ती व यथोचित पूजाअर्चा फार मोठ्या श्रद्धेने करत आला आहे. पावसाळ्यात कोकणातील शेतीस सुरुवात होताना शेतीच्या हंगामात कोणतीही आपत्ती ओढवू नये, गुराढोरांना कोणतीही इजा होऊ नये, सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होऊ नये आणि जंगली जनावरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, शेतात चांगले व भरपूर धान्य पिकावे यासाठी आपल्या शेतातील पारंपारिक स्थळांवर निसर्ग देवतेची ‘ देणी ‘ देण्याची व अशा स्थानिक दैवतांस, भूताखेतांस तृप्त करण्याची पुर्वापार प्रथा हादेखील आगोटचा एक भाग म्हणावा लागेल. अशा पालेजत्रेच्या निमित्ताने एखाद्या स्थानिक सोवळ्या देवास शाकाहारी नैवेद्य दाखवून तर मांसाहारी देवास गावठी कोंबड्याची ‘ राखण ‘ देऊन अशा निसर्ग दैवतांस तृप्त करण्याचा प्रयत्न व्हायचा. अशा स्थानिक देवता तृप्त व समाधानी झाल्यावर आपली वर्षभरातली शेतीची कामे निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची नितांत श्रद्धा येथील शेतकऱ्याच्या मनात होती. एकदा मृगाचा पाऊस सुरु झाल्यावर येथील शेतकऱ्यास क्षणाचीही उसंत मिळत नसल्याने या राखणीच्या निमित्ताने घरातील संपूर्ण कुटुंब, मुंबईत जाणारे चाकरमानी अशा सर्वांनाच या निमित्ताने कधी मिष्टान्न तर कधी चमचमीत जेवणाचा आस्वाद घेता येत असे. वर्षातून अशाच प्रसंगांत केवळ एक दोनदा घरात पाळलेली गावठी कोंबडी कापून कधीतरी अशी सुग्रास मेजवानी करण्याचे प्रसंग येत.

अशा एक दोन प्रसंगांत चमचमीत मांसाहाराचा आस्वाद घेऊन येथील शेतकरी सुखी व समाधानी दिसे. याशिवाय आपल्या परिसरातील देवाचे ‘ देणे ‘ देऊन त्याला तृप्त केल्याचे समाधानही येथील शेतकऱ्याच्या चेहर्‍यावर दिसत असे. येथील काही ठिकाणी अनेक माहेरवाशिणीही त्यांच्या मुलाबाळांच्या रखवालीसाठी माहेरच्या अशा काही स्थळांत व दैवतांना ‘ राखण ‘ देत. माहेरची, माहेरच्या दैवतांविषयीची ओढ या निमित्ताने वृद्धिंगत होत असे आणि दोन्ही कुटुंबांतील स्नेहबंध या निमित्ताने अधिक दृढ होण्यास मदत असे. तसे पाहिले तर अशी राखण देणे हा आगोटचाच एक भाग असावा.


पावसाळ्यासाठीची तरतूद, पावसाळ्यासाठीचे नियोजन आणि ऐन पावसाळ्यात पाऊस, पूर आदी नैसर्गिक आपत्तीकाळात गडबड होऊ नये, घरात रोजच्या वापरासाठीच्या जिन्नसांची वाणवा होऊ नये यासाठी येथील पुर्वजांनी केलेली ‘ आगोट ‘ ची प्रथा हे आर्थिक व कौटुंबिक नियोजनाचे एक आदर्श उदाहरण होते. कोकणातील प्रत्येक शेतकरी दरवर्षीच्या अशा आगोट काळाची आतुरतेने वाट पाहत असे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here