जाखडी नृत्य

0
12406

गणा धाव रे, मना पाव रेI तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे | तू दरसन आम्हाला डाव रे…|

श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला…| आईबापाची कावड खांद्याला, कावड खांद्याला…|

ही जाखडी नृत्यातील अजरामर लोकगीते. खास कोकणी शैलीतील. कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य. जिला शक्ती-तुरा, चवळी नाच किंवा बाल्या नाच असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्राच्या अनेक लोककलांमधून चालणारी सवाल जवाबाची जुगलबंदी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आली; ती या जाखडी नृत्याच्या कार्यक्रमांतून. हे जाखडी नृत्य म्हणजे काय? त्यामागील परंपरा काय? ही कला किती वर्ष जुनी आहे अशा उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांसाठी टीम ‘www.talukadapoli.com’ दापोलीतील काही प्रख्यात शाहिरांना भेट दिली ( भारदे गुरुजी, मारुती चव्हाण, प्रभाकर चोरगे, उदय काटकर ) आणि पुढील माहिती हस्तगत केली.

जाखडी नृत्याचा उगम नेमका केव्हा झाला, कोणत्या काळात झाला याबद्दल खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. पण पूर्वी पावसाळ्यातील शेतीची कामे आटपल्यानंतर लोक मनोरंजनासाठी एकत्र जमायचे आणि झांज, ढोलकी, घुंगरू या वाद्यांच्या साथीवर देवाची गाणी म्हणायचे, नृत्य करायचे. पायात चाळ बांधून नाचत असल्यामुळे या नाचाला ‘चवळी नाच’ असे म्हटले जात असे. हाच चवळी नाच पुढे कोकणातील लोकांबरोबर मुंबईत आला आणि बाल्या नाच म्हणून प्रसिद्ध झाला. कोकणातून मुंबईत आलेले काही तरुण त्यावेळी घरकामे करीत असत. या घरकाम करणाऱ्या मुलांना मुंबईच्या लोकांकडून बाला म्हटले जात असे. हे बाले आपली सर्व कामे आटपून, रात्रीच्या वेळेस एकत्र जमून आपल्या पारंपारिक लोककलेचा आस्वाद घेत असत. कोकणातून आलेली ही लोकसंस्कृती मुंबईच्या लोकांना अतिशय भावली आणि मुंबईच्या मिश्र संस्कृतीत समाविष्ट झाली. पुढे या परंपरेत दोन संप्रदाय तयार झाले. शक्तीवाले आणि तुरेवाले. शक्ती म्हणजे शिवप्रिया देवी पार्वती आणि तुरा म्हणजे भगवान शिवशंकर. या दोघांमधील प्रश्नोत्तरी भांडण म्हणजे शक्तीतुरा किंवा कलगीतुरा. हे भांडण एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेले शाहीर करतात. हे शाहीर सागरीत झालेले असतात. म्हणजेच या दोन्ही संप्रदायात जी गायकीची घराणी आहेत, त्या घराण्यांच शिष्यत्व त्यांनी पत्करलेल असतं. उदा. शक्तीवाल्यांमध्ये गुरुगणपती आणि सदालाल घराणे व तुरेवाल्यांमध्ये वासुवाणी आंनी रामचंद्र पंडित घराणे. हा सागरीत होण्याचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने मांड भरून दोन्ही संप्रदायाच्या लोकांना बोलावून जाहीररित्या केला जातो. तो केल्याशिवाय शाहीर गायकी करू शकत नाही किंवा प्रतिवाद करू शकत नाही.

सागरीत झाल्यानंतरच त्या शाहिराला सांप्रदायिक मान्यता प्राप्त होते. शक्तीतुऱ्यामधील वाद अथवा भांडण हे शास्त्राधारे चालते. श्रुती, स्मृती व पुराणांवर आधारलेल्या अनेक ग्रंथाचा आसरा घेऊन हा वाद मांडला जातो. वादात गद्याचे प्रयोजन कमी आणि पद्याचे प्रयोजन जास्त असते. काव्य, संगीत, नृत्य यामुळे शक्तीतुऱ्याचा खेळ चांगलाच रंगला जातो. या खेळाला बरी असे म्हणतात. बारीची सुरवात करण्याचा मान हा नेहमी शक्तीवाल्यांकडे असतो आणि समाप्तीचा तुरेवाल्यांकडे. दोन्ही संप्रदायाचे शाहीर बारीला सुरुवात करताना प्रथम गण गौळण गातात मग इतर पदे. टोनपा अंतिम असतो. तो खास प्रतिस्पर्धीला खिजवण्यासाठी गायला जातो. शक्तीतुऱ्यामधील जुगलबंदी खऱ्या अर्थाने रंगते ती या टोनप्यामुळेच. याच शक्तीतुऱ्याचा सुधारित अवतार म्हणजे जाखडी नृत्य. आधुनिक काळात उत्तम कवित्व करणारे, उत्तम गाणारे शाहीर या कलेमध्ये आले. त्यांनी या कलेला निराळे स्वरूप आणले. अध्यात्माबरोबर समाजप्रबोधन आले. पारंपारिक वाद्यांबरोबर नवनवीन वाद्ये आली. नाचण्याचा ठेका बदलला, वेशभूषा पालटली, एकंदरीत कलेला संपन्नता आली. याच संपन्नतेचा फायदा घेऊन केवळ पैसा कमवू पाहणारे लोक कलेला मात्र लांच्छन आणतात. काव्यात फाजील शब्दांचे, द्विअर्थी शब्दांचे प्रयोजन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवू पाहतात. पण पाण्यावरचा बुडबुडा फार काल टिकत नाही हे त्यांनी जाणले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कलेची सेवा केली पाहिजे. जेणेकरून कला अधिक संपन्न होईल आणि कलेचे पावित्र्य अबाधित राहील.जाखडी नृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here