ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मुरूड

0
3686

 

कोणत्याही गावाची स्थापना, त्या गावात कालानुरूप तयार होणाऱ्या परंपरा, संस्कृती विकसन आणि बदल, या सर्वच गोष्टी रंजक असतात. मध्ययुगातील एक मोठे गाव ते आज पर्यटनाच्या नकाशात स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या मुरुड गावची गोष्ट देखील अशीच आहे.

मुरुड गाव

आदिलशाही काळात एका सिद्धपुरुषाने दाभोळ सुभ्यात गर्दीपासून दूर व उपेक्षित भाग वसाहती करता निवडला. गंगाधर भट असे त्या सिद्ध पुरुषाचे नाव. सौराष्ट्र प्रांतातून हा सिद्ध पुरुष कोकणात आला. गावाची रचना, व्यवस्था, स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारच्या श्रमजीवी व बुद्धीजीवी वर्गाची वस्ती मुरुड गावी वसवण्यात आली. गावच्या बखरीनुसार सिद्धपुरुष, ‘दातार’ यांच्या घरी राहिला व दातार यांच्या बाल-विधवा मुलीला त्यांनी शिक्षण दिले आणि विद्या शिकवल्या. मुरुड गावाच्या रचनेत या मुलीचा विशेष हात होता. सिद्धपुरुषाबरोबरच त्यांचे शिष्य व मानसपुत्र, ‘वैशंपायन’ हे  मुरुडला आले व स्थायिक झाले. गावचे उपाध्येपण व धर्माधिकरण हे दोन्ही अधिकार १९व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत त्यांच्याकडेच होते.

 इतिहास

१९व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत एकही सागरी सत्ता पश्चिम किनाऱ्यावर नव्हती. त्यामुळे किनाऱ्यावर मलबारी चाच्यांचा आणि सिद्दीचा जुलूम व उपद्रव शिवकाळापर्यंत चालू होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हर्णेतील गोवागड, फत्तेगड, कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्ग सक्रिय झाले आणि आडवाटेला असलेले मुरुड गाव राजमार्गावर आले.

मुरुड गावाचा लौकिक, सधन गाव म्हणून वाढत होता. त्यामुळेच लुटारू चाच्यांच्या धाडीला, गाव बळी पडले. उपलब्ध ऐतिहासिक साधनांच्या पुराव्यांनुसार इ.स. १६१४ मध्ये मोठी धाड गावावर पडली. गावाच्या रचनेबरोबर स्थापन केलेले पाच देवाचे मंदिर या जाळपोळीत दग्ध झाले. या घटनेनंतर चाच्यांची एवढी दहशत बसली की अनेक लोकांनी गाव सोडले, लोक वसतीला पुन्हा येत नव्हते. गाव, बागा ओस पडू लागले. यामुळे गावातील स्थानिक प्रशासनाने वस्ती भरण्याचा उपक्रम सुरू केला. यातून अनेक जण गावात आल आणि गाव परत एकदा गजबजू लागले.

केशव जोशी नावाचे मुरुड मध्ये  जेष्ठ ग्रामस्थ होते. इ.स. १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्गाची दुरुस्ती केली. त्या दरम्यान, महाराज हर्णेत आले होते. त्यावेळी महाराजांनी केशव जोशींची भेट घेतली व सन्मान केला. यावेळी महाराजांना हवे असलेले कर्ज जोशी यांनी दिले. महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८३ मध्ये औरंगजेब संपूर्ण ताकदीनिशी दक्षिणेत आला. या काळात झालेल्या संघर्षात मुरुड मध्येही चकमकी झाल्या. पुढे कान्होजी आंग्रे यांच्या काळात जोशी आणि आंग्रे यांची मैत्री वाढली. यामुळे केशव जोशी यांना मुरुड येथील सरकारी वसुलीचे काम मिळाले.

पेशव्यांच्या काळात मुरुड एक समृद्ध गाव म्हणून वाढत होते. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांमध्ये संघर्ष वाढू लागला. पहिल्या इंग्रज – मराठा युद्धानंतर दुसरे बाजीराव पेशवे मुरुड येथे वास्तव्यास आले होते. इ.स. १८१८ मध्ये मराठा साम्राज्य पडले आणि संपूर्ण देशावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला. याच काळात इ.स. १८१७ मध्ये बलुची पठाणांची मुरूड वर धाड पडली. मुरुड गाव परत एकदा लुटले गेले.

रचना

गावाच्या रचनेबरोबर दुर्गादेवी मंदिर, श्री भैरव मंदिर, सीमादेवी मंदिर, पाचदेवांचे मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, महारुद्र मंदिर आणि मशीद यांची स्थापना झाली. यातील पाचदेव मंदिर वर उल्लेख केल्याप्रमाणे धाडीत दग्ध झाले. यातील मूर्ती लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात आहेत असा उल्लेख एका कागदपत्रात येतो.

 गावातील प्रमुख देऊळ दुर्गादेवी मंदिर व त्याच्या उत्सवाचे स्वरूप सिद्धपुरुषाने आखून दिले. या उत्सवात सर्व जातींना, समाजांना काहीना काही काम देण्यात आले आहे, मानाचे विडे व नैवेद्य देण्याची व्यवस्था आहे. सर्व जाती जमातींच्या सहकाऱ्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असे.

आज हे मंदिर पर्यटक आणि भक्तगण यांसाठी आकर्षण बनले आहे. नवरात्रात हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. 

  दुसरे प्राचीन मंदिर श्री भैरवाचे म्हणजेच बहिरीचे. बहिरीच्या घाटीला सुरवात होते तेथेच उंचवट्यावर प्राचीन मंदिर आहे. येथील उत्सव होळीपासून सुरू होतो. मुरुडच्या वसाहतीबरोबरच मशिदीची स्थापना झाली. मशिदीला उत्पन्नाची व एक काजीची नेमणूक सिद्धपुरुषानेच केली होती. आदिलशाही काळात सुवर्णदुर्ग, गोवळकोट व अंजनवेल या किल्ल्यांचे काही उत्पन्न या मशिदीसाठी लावून दिल्याचे आढळते.

नंतरच्या काळात उभारण्यात आलेल्या देवळांपैकी नागलेश्वर व पूर्वाभिमुख लक्ष्मी-नारायण ही देवळे आचवलांनी बांधली. सिद्धेश्वर मंदिर देवधर यांनी तर, गणपती मंदिर दीक्षित यांनी उभारले. देवीच्या देवळाजवळील गणपतीचे मंदिर पाटणकरांनी बांधले. इ.स. १९३४ मध्ये भंडारी समाजाने श्री राम मंदिराची स्थापना केली व तेथे रामनवमीला उत्सव सुरू झाला.

मुरूड तसे समृद्ध गाव म्हणून प्रसिध्द असल्याने गावापर्यंत रस्ता खूप आधीच झाला. हा रस्ता वैशिष्ट्यपूर्ण होता. एका बाजूला उंच पाखाडी, त्यावरून बैलगाड्या व इतर वाहतूक चालत असे आणि दुसऱ्या बाजूला रुंद बिद. बिद शब्द आणि पद्धत ही सिद्धपुरुषाने वसवलेल्या मुरूड, आंजर्ले आणि केळशी याच गावात दिसते. बिद ही पावसाच्या पाण्याची निचरा होण्यासाठीची सोय आहे. या प्रदेशात पडणारा प्रचंड पाऊस आणि तिन्ही गावांचे समुद्राजवळील स्थान, त्यामुळे भरती ओहोटीचा पाण्याच्या निचऱ्यावर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा विचार करून बिद आखण्यात आणि उभारण्यात आली होती.

शिक्षणाकडे वाटचाल

इंग्रजी सत्ताकाळात  सरकारच्या धोरणानुसार १० ऑगस्ट १८३४ रोजी मुरुड येथे प्राथमिक शाळा सुरू झाली. मुरुड गावचे थोर ग्रामस्थ, स्त्री शिक्षणाचे आणि हक्कांचे खंदे समर्थक आणि त्यासाठी भरीव योगदान देणारे ‘भारतरत्न अण्णासाहेब कर्वे’ यांनी १८८०च्या दशकात मुरूड येथे इंग्रजी शाळा सुरू केली. पण १८९८ च्या काळात आलेल्या प्लेगच्या साथीने या शाळेला उतरती कळा लागली. या विपरीत स्थितीत देखील कै. नारोपंत दामले यांनी शाळा सुरू ठेवण्याचा १९०४ पर्यंत प्रयत्न केला पण नंतर ही शाळा सुरू ठेवणे अशक्य झाले.

मनोरंजन

सदोबा घारी व नरहरबुवा सवाशे यांच्या नाटक कंपन्या मुरूड येथे महिनों-महिने तळ ठोकून असत. या काळात पांडुरंगपंत बाळ हे मोठे कलाप्रेमी होते. वरील नाटककंपन्या पांडुरंगपंतांच्या चौसोपी वाड्यात नाटके करत. या आधी पौराणिक नाटके होत असत, या बरोबर व्यावसायिक नाटके मुरुडात व्हायला लागली. दोन्ही नारायणाच्या उत्सवाच्या अखेरीस दोन नाटके व रामजन्माच्या उत्सवाचे नाटक अशी एकूण ३ नाटके मुरुडात वर्षात स्थानिक कलाकारांची होत असत. खालच्या पाखडीतील नाट्य मंडळाला १९४७ साली २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा जेष्ठ नाट्यकर्मी मामा वरेरकर यांच्या अध्यक्षतेखाली रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला होता. उपरोक्त पांडुरंगपंत बाळ यांनी देखील गावात इंग्रजी शाळा सुरू केली त्याच बरोबर वाचनालय ही सुरू केले.

व्यवसाय आणि विकास

गावातील मुख्य व्यवसाय शेती होता. नारळ सुपारीच्या दाट वाड्या, आंबा काजूच्या बागा आणि भात शेती ही उत्पन्नाची मुख्य साधने. याच बरोबर काही प्रमाणात नाचणी शेती, उंडीणीपासून कडू तेल उत्पादन इत्यादी घरघुती उद्योग चालत असत. नारळापासून माडी करणे हा देखील एक उद्योग होता.

इ.स. १८६० च्या सुमारास हर्णे बंदरात नियमित बोट यायला सुरवात झाली. या अगोदर आठवड्यातून २ वेळा बोट येई. सागरी प्रवासामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाणे तुलनात्मक दृष्टीने सोपे झाले. मुरूड मध्ये उपलब्ध असलेले प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी अनेक गावकरी मुंबईत जाऊ लागले. 

 यातीलच काही उल्लेखनीय ग्रामस्थ म्हणजे भारतरत्न धोंडो केशव कर्वे, ज्योतिर्भास्कर शंकर बालकृष्ण दीक्षित, रघुनाथ धोंडो कर्वे. 

मुरुड गावातील रत्ने

  • विश्वनाथ नारायण मंडलिक – यांनी स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा, जुन्या वाङ्मयाचे संशोधन व प्रकाशन अश्या क्षेत्रात कार्य केले. संत तुकारामांची अभंग गाथा यांनी सर्व प्रथम प्रकाशित केली. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी ‘Native Opinion’ नावाचे वृत्तपत्र ते चालवत असत. त्यांच्या अभ्यासाला मान देत तत्कालीन मुंबई सरकारने व नंतर हिंदुस्तान सरकारने त्यांना आपल्या कौन्सिलवर नेमले. मनुस्मृतीची संशोधित आवृत्ती अनेक टिपा देऊन त्यांनी प्रसिद्ध केली.

 

  • रामचंद्र भिकाजी जोशी – हे समाजसुधारणेचे खंदे समर्थक होते. मुरूड गावातील पहिला पुनर्विवाह यांच्या बहिणीचा होता. आई वडिलांची मान्यता मिळणार नाही म्हणून यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विवाह घडवून आणला होता. पुढे अनेक पुनर्विवाहांमध्ये यांनी पौरोहित्याचे काम केले.  इ.स. १८८१ मध्ये मित्रांच्या साहाय्याने ‘निबंध चंद्रिका’ नावाचे मासिक ते प्रकाशित करत असत. यांचा व्याकरणाचा अभ्यास व मराठी  भाषेचा व्यासंग गाढा होता. यातूनच त्यांनी बाळबोध व्याकरण, मराठी भाषेची घटना, प्रौढबोध व्याकरण, शब्दसिद्धी अश्या ग्रंथांची रचना केली.

 

  • वैद्यरत्नचुडामणी वि. र. जोशी – विनायकशास्त्री हे त्यांच्या वडिलांप्रमाणे प्रख्यात वैद्य होते. अचूक रोगनिदान आणि यश यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. इ.स. १९१७ मध्ये शंकराचार्य मुरूडला आले तेव्हा त्यांचा फार दिवसांचा यकृताचा आजार विनायकशास्त्र्यांनी बरा केला, तेव्हा त्यांनी त्यांना ‘वैद्यरत्नचुडामणी’ ही पदवी दिली.

 

  • डॉ. अनंत महादेव गोखले – मुरूड येथील मराठी शाळेत यांनी त्यांच्या विद्याव्यासंगाला सुरुवात केली. इ.स. १९३५ मध्ये LCPS ची परीक्षा वरच्या क्रमांकाने पास झाले, त्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळाली पण १९३८ साली ती नोकरी सोडून तेO.M.S. (नेत्र शल्य विशारद) झाले व परेल आय हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल अश्या ठिकाणी ते प्रमुख नेत्र वैद्य होते. अपक्व मोतीबिंदू काढणे, बुब्बुळ बदलणे अश्या चिकित्सा त्यांनी सर्वप्रथम भारतात करण्यास सुरुवात केली. याबरोबरच दादर मराठी वाचनालयाचे ते एक संस्थापक होते.

 

  • न. का. वराडकर – नरहरी काशिराम वराडकर यांचा जन्म इ.स. १८९८ मध्ये झाला. शाळेत असतानाच त्यांचे ज्येष्ठ बंधू आजारी पडले आणि त्या काळात त्यांना त्यांच्या वडिलांचे मुरुड येथील किराणा मालाचे दुकान सांभाळावे लागले. पुढे त्यांनी सुपारीचा व्यापार सुरू केला. त्यांनी केलेल्या प्रचंड कष्टामुळे त्यात त्यांना यश मिळाले. न. का. वराडकर मूळतःच सामाजिक बांधिलकी जपणारे होते, त्याच बांधिलकीने त्यांनी बऱ्याच संस्थांना मदत केली. आज दापोलीतील एका नावाजलेल्या महाविद्यालयाला – न. का. वराडकर महाविद्यालयाला यांच्या नावावरूनच नाव दिले आहे.

 आजचे मुरुड

आज कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू मुरूड आहे. अक्षरशः हजारो पर्यटक मुरूडला दरवर्षी भेट देतात. समुद्र किनाऱ्यावरील खेळ, साहसी खेळ, डॉल्फिन सफारी, अथांग समुद्र, रुचकर जेवण, नारळ सुपारीच्या बागा इत्यादी गोष्टी पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मोठ्या मोठ्या हॉटेल्सपासून घरगुती निवास व्यवस्थांपर्यंत अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. ऐतिहासिक काळापासूनच समृध्द गाव म्हणून प्रसिद्ध असलेले मुरूड आज समृद्धीच्या रोज नवीन सीमा ओलांडत आहे, नवीन तयार करत आहे.

मुरुड गावाला भेट देणाऱ्या प्रत्येकाने मुरुड हे फक्त पर्यटनाचे ठिकाण म्हणून असे न मानता, या गावाचा इतिहास जाणून घेऊन भेट दिली तर त्यांचा अनुभव हा अधिक सुंदर होईल यात शंका नाही

संदर्भ –

१) मुरूड – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक – वामन रामचंद्र गानू

२) मुरूड गावची बखर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here