मुरुडच्या सिद्धपुरुषाची समाधी

0
3503

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं बालपण जिथे दुडदुडलं ते गाव म्हणजे दापोली तालुक्यातील मुरुड. या मुरुडचा इतिहास शोधत गेलात तर उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या एका ब्राह्मणाचा संदर्भ सापडतो.

उत्तर हिंदुस्थानातून एक ब्राह्मण आपल्या चार शिष्यासहित आसूद व जालगाव येथे आला व त्याने आपल्या शिष्यांच्या मदतीने मुरुड, दिवे आगार व गुहाघर अशी तीन गावे वसवली.

पूर्वीच्या काळी बखरी लिहिल्या जात असत त्यातून हि माहिती सापडते. हा उत्तर हिंदुस्थानातून आलेला ब्राम्हण म्हणजेच ‘सिद्धपुरुष’. कर्वेंच्या आत्मवृत्त चरित्रात त्याचा ‘कानोजा ब्राम्हण’ असा उल्लेख आढळतो. शिवाय मुरुडबद्दल माहिती सांगणाऱ्या त्या गतकालीन बखरींचाही समावेश आहे. १८५८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मुरुड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक’ पुस्तका मध्ये तर सविस्तरपणे माहिती आलेली आहे.

मुरुडमधील भैरीचा कोंड – नवीबाव (नवीन विहीर) येथे या सिद्धपुरुषाची समाधी आजही आहे. ती बऱ्याच वर्षांपूर्वी बांधण्यात आली असल्यामुळे ती नेमकी कुणी बांधली याचा संदर्भ लागत नाही. दापोली-मुरुड-कर्दे रस्त्या लगतच हे समाधी स्थान आहे. हे स्थान छोटंसं असलं तरी अगदी शांत सुंदर ठिकाणी आहे. समाधी मंदिरा समोरच गोड्या पाण्याची विहीर आहे, पाण्याचे द्रोण आहेत, जवळुन पाण्याचा चांगला मोठा ओहोळ जातो.

वादळाडोंगर आणि खैराकोंड यातून वाहणाऱ्या पाण्याचा संगम ह्या समाधीजवळ होतो. पुढे हा प्रवाह थेट कर्दे-वहाळ समुद्रा पर्यंत जातो. याशिवाय सभोवताली गर्द झाडी आहे. कुणबी समाजाची घर आहेत. शिवाय सिद्धपुरुषाने स्वतः बांधलेली वहाळ येथील ‘दातारबाव’ हि देखील अगदी जवळ आहे.

सिद्धपुरुषाची हि समाधी म्हणजे मुरुड गावच्या जन्मकथेची अस्सल साक्ष आहे. जुन्या बखरींमध्ये उल्लेखलेल्या माहितीला पुष्टी देणारा एक जिवंत पुरावा आहे.

संदर्भ
कर्वे आत्मवृत्त – डॉ. धोंडो केशव कर्वे
मुरुड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक – गानु वामन रामचंद्र

धन्यवाद
ग्रामस्थ : अजय शंकर करंदीकर

Previous articleवेळेश्वर मंदिर, लाडघर, दापोली
Next articleमुरुडच्या सिद्धपुरुषाची समाधी – चित्रकथा
कु. सतीश शिरीष भोसले. २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्याची बी.ए.ची पदवी प्राप्त. २०१० पासून ‘प्रेमाचा अर्थ कळू दे’, ‘भटकंती’, ‘मनातला क्रांतिकारी’, ‘सेर सिवराज’, ‘पुडकं’, ‘परमपूज्य बाबसाहेब’ अशा अनेक कवितांचे लेखन. २०१४ मध्ये ‘अबोध’ या लघुपटासाठी पटकथा व संवाद लेखन. २०१४ ते २०१७ ‘एक चुंबनाची गोष्ट’, ‘जीवश्च कंठश्च’, ‘ऑफिसची पहिली पार्टी’, ‘वस्त्रधारण’, ‘मोबाईल’, ‘पेच’, ‘फेसबूक’, ‘सेल्फी’, ‘हर्षा भाभी’, ‘योगायोग’, ‘आमचा कॅप्टन’ या लघुकथांच लेखन. २०१७ पासून ‘मोठ्या जगातल्या छोट्या गोष्टी’ या नावाखाली ब्लॉग लेखन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here