नरहरी काशीराम वराडकर – दापोलीत शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देणारा हिरा

1
5988

दापोली तालुक्यात शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देणारा हिरा, असा उल्लेख करता येईल असे एक व्यक्तिमत्व म्हणजे – नरहरी काशीराम वराडकर! शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला असल्याने ते चिकाटी,  कष्टाळू आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचे  होते. त्यांचे वडील, मुरूडचे प्रसिद्ध व्यापारी परचुरे यांच्या यांच्याकडे नोकरी करत. नोकरी करतानाच पुढे त्यांनी वस्तुविनिमय त्याच्या पद्धतीने सुपारी खरेदी करायला सुरुवात केली आणि बदल्यात तंबाखू, खोबरे, हरभरे शेतकऱ्यांना देऊ लागले. यातूनच पुढे मोठ्या सुपारीचा व्यापार अण्णांनी उभा केला आणि सुपारीचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाले.

 

   २ मे १८९८ रोजी मुरुड गावात नरहरी काशीराम वराडकर यांचा जन्म झाला.  त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुरुड गावातच पूर्ण झाले. पुढे मॅट्रिकच्या शिक्षणासाठी ते दापोली तालुक्याच्या ठिकाणी चालत जात असत. पूज्य साने गुरूजी आणि न. का. वराडकर हे शाळेत सोबती असल्याचा दाखला देखील आपल्याला मिळतो. या वयात असणाऱ्या योग्य संगतीचा परिणाम आयुष्यावर होतो असे म्हणतात ते खरंच. याच काळात त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएटची परीक्षा ही दिली. परंतु मॅट्रिक दरम्यान म्हणजेच सन १९१७ मध्ये त्यांच्या मुरुड मधील वडील बंधूना अचानक देवाज्ञा झाल्याने त्यांचा आधार संपला. या परिस्थितीचा परिणाम म्हणजे त्यांना शिक्षण थांबवावे लागले. अण्णांनी नव्या उमेदीने व्यवसायात लक्ष घातले. त्यांच्या दुकानावर असलेल्या कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी त्यांना साधारण पाच ते सहा वर्षाचा कालखंड लागला. या काळात त्यांनी अपार मेहनत घेतली. अनुभवापेक्षा मोठा गुरू नाही असे म्हणतात, हा अनुभव त्यांना या कालखंडात आला अर्थातच या अनुभवाचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यासाठी झाला. दुकानाला यश मिळाल्यानंतर त्यांनी सुपारीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.

 

   त्यांना नोकरीच्या अनेक संधी आल्या पण न. का. वराडकर यांनी या संधी हेतुपुरस्सर नाकारल्या व व्यवसायाकडे लक्ष दिले. त्यांच्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी स्वतःला व्यवसायात झोकून दिले. दापोली तालुक्यातील सुपाऱ्या एकत्र करून सोलून त्यांची मुंबईतील व्यापाऱ्यांकडे निर्यात केली जात असे.कालांतराने त्यांनी किराणा दुकान बंद करून सुपारीचा व्यवसाय सुरू ठेवला. याच काळात त्यांचा विवाह शेजारच्या कर्दे गावातील राधाबाई यांच्याशी झाला. पुढील काळात राधाबाईंनी समाज कार्यात मोलाची साथ दिली.

सामाजिक कार्य
   नरहरी अण्णा उच्च विचारांचे आणि शिक्षणाची तळमळ असणारे होते. स्त्री शिक्षणा विषयी आग्रही होते. मुलींनी शिकले पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका. त्या काळात होती या काळात त्यांनी मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर केली होती.

 

     त्यांनी शेतात आणि बागेमध्ये शेती सुधारण्याच्या हेतूने अनेक प्रयोग केले. ते प्रगतशील शेतकरी होते, प्रयोगशील शेतकरी होते. त्यांच्या या संपूर्ण कार्यात त्यांच्या पत्नी राधाबाई यांचा सहभाग होता. अशा सामाजिक कार्यामुळेच मुरुड येथील लोकांनी  ग्रामपंचायत स्थापनेनंतर त्यांना सरपंच म्हणून निवडून दिले. अण्णा मुरुड गावचे पहिले सरपंच झाले.

    समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी सन १९६६ झाली ग्रामस्थांच्या सहकार्याने, महर्षी कर्वे शिक्षण संस्था व संस्थेचे एन.के. वराडकर हायस्कूल सुरू केले. हा शिक्षण संक्रमणाचा काळ होता या काळात अण्णांनी अनेक मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली, विद्यादान केले. अनेक गरीब होतकरू बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी त्यांनी स्वतःच्या घरी निवासाची सोय उपलब्ध करून दिली. ५ मे १९७३ रोजी नरहरी अण्णा यांनी उच्चशिक्षणाची असलेली अडचण दूर करण्यासाठी अजून एक पाऊल टाकले. तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच दापोली येथे शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने ५१ हजार रुपयांची देणगी त्याकाळात दिली आणि २५ मे १९७३ ला दापोली मंडणगड शिक्षण मंडळाची स्थापना झाली. या देणगीतून सुमारे दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाची असणारी इमारत उभी राहिली.

मुंबई विद्यापीठाची संलग्नता आणि अनुदान १९७६ ला प्राप्त झालेले हे न.का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे  वाणिज्य व शांतीलाल जैन कनिष्ठ महाविद्यालय, दापोली अनेक विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे स्वप्न साकार करत आहे.

   याबरोबरच कोळथरे पंचनदी शिक्षण संस्थेच्या पत्रव्यवहारात आढळणाऱ्या उल्लेखानुसार नरहरी काशीराम वराडकर यांनी सामाजिक कार्यात, विशेषता शैक्षणिक कार्यात अनेक ठिकाणी काम केले आहे. पंचनदी शिक्षण संस्थेच्या शाळा व आश्रमाचा ही समावेश यात होतो. या कार्याचा वेध घेणारे एक काव्य कवी आत्माराम यांनी नरहरी काशिराम वराडकर यांच्यावर लिहिले आहे.


नरहरी वराडकर हो काशीरामात्मजा मुरुडवासी
७५ वर्षे झाली म्हणून विधीस तू करिसी ll१ll
शिक्षण कार्यास्तव जो अर्थ सदा देतसे सुपात्र जना
अर्थाच्या पुरुषार्था धर्माच्या कोंदणात बघ सूजना ll२ll


   या थोर समाजसुधारकानी वयाच्या  ७९ व्या वर्षी म्हणजे २ ऑक्टोबर १९७७ ला अखेरचा श्वास घेतला. परंतु शैक्षणिक कार्यामुळे सामाजिक कार्यामुळे ते दापोली तालुक्याच्या मनात कायम राहिले.


संदर्भ

  • कृतार्थिनी धीरज वाटेकर
  • मुरुड ऐतिहासिक

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here