कवी केशवसुत

0
8439

केशवसुत यांचा जन्म मालगुंड गावी, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत वाद असल्यामुळे १५ मार्च १८६६ व ७ ऑक्टोबर १८६६ अशा दोन तारखा समोर येतात. परंतु सामान्यपणे ७ ऑक्टोबर या दिनांकावर केशवसुतांची जयंती साजरी केली जाते. केशवसुतांचे कनिष्ठ बंधू सी.के.दामले यांनी प्रसिद्ध केलेल्या केशवसुतांच्या चरित्रात त्यांची जन्मतिथी ‘भाद्रपद कृष्ण १४ रविवार शके १७८८ सन १८६६ सांगितली आहे. कृष्णपक्षातील जन्म असल्यामुळे कृष्ण नाव ठेवले गेले, असा अंदाज ते वर्तवतात.

कवि केशवसुतांचे वडिल ‘केशव विठ्ठल दामले’ उर्फ ‘केसोपंत’ हे सरकारच्या शाळाखात्यातील मराठीशाळेमध्ये शिक्षक होते. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी लवकर निवृत्ती घेतली व दापोली तालुक्यातील ‘विश्वनाथ नारायण मंडलिक’ यांचे खोतीगाव असलेल्या वळणे गावाची देखभाल पाहू लागले. या गावचा स्पष्ट नामनिर्देश केशवसुतांनी त्यांच्या ‘एक खेडे’ या कवितेत केला आहे. वळणे येथील घराबाबत सी.के.दामले लिहितात, घराभोवती वन्य फुलझाडे होती, फुलाच्या पखरणी घराभोवतालच्या अंगणा-परसात पडलेल्या असायच्या. केशवसुतांना इथला निसर्गरम्य परिसर फार प्रिय होता. विद्यार्थीदशेत असताना सुट्टीस घरी आले की, ते येथे बराच काळ घालवीत असत. ‘टिप फुले टिप माझे गडे ग‌ | फुलाची पखरण झिप” ही त्यांची कविता त्यांनी वळणे येथेच धाकट्या बहिणीकडून पाठ करवून घेतली होती. विद्यार्थीदशेनंतर मात्र अशा रमणीय ठिकाणी राहता येईल, अशी स्थिती त्यांना दुर्दैवाने प्राप्त झाली नाही.

केशवसुतांना एकूण अकरा भावंडे होती. त्यामध्ये पाच बहिणी व सहा भाऊ. केशवसुत हे केसोपंतांचे पाचवे पुत्र. त्यांचे सुरुवातीचे चार-पाच इयत्तांचे शिक्षण मराठी शाळेमध्ये वडिलांच्या हाताखालीच झाले. पुढे बडोदा, वर्धा, नागपूर, पुणे येथे. नागपुरात असताना सुप्रसिद्ध कवि ‘नारायण वामन टिळक’ यांच्याशी त्यांची ओळख व मैत्री झाली. नारायण टिळकांच्या सहवासात येऊन त्यांच्या कवित्वशक्तीला चालना मिळाली. १८९०–१८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले.

पुढे मॅट्रिकनंतर १८९६-१८९७ पर्यंत मुंबईत त्यांनी अनेक हंगामी नोकऱ्या केल्या. मुंबईत प्लेगची साथ पसरल्यानंतर ते मुंबई सोडून खानदेशला गेले. तिथे एखाद्या लहानश्या गावी म्युन्सिपालटीच्या शाळेत नोकरी मिळावी म्हणून त्यांनी खटपट केली व फैजपूर येथे प्रथम नोकरी धरली. त्यानंतर भडगाव येथील अँग्लो व्हर्नाक्युलर शाळेत ते असिस्टंट मास्तर म्हणून होते. १९०१-१९०२ पर्यंत ते खानदेशात राहिले. नंतर धारवाड येथे हायस्कूलात त्यांची नेमणूक झाली. १९०३ पासून पुढे ते त्याच ठिकाणी हायस्कूल मास्तर म्हणून होते.

कविता करण्याचा त्यांचा हा छंद फारच अल्प वयापासून होता. वयाच्या १४-१५ वर्षापासून त्यांना चांगले श्लोक, आर्या रचता येत असत. काव्याबरोबर त्यांना चित्रे रेखाटण्याचाही छंद होता. पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचव्या-सहाव्या इयत्तेत असताना वर्गातील अभ्यासाकडे लक्ष न देता ते टिळक, आगरकर, इ. ची चित्रे वहीत रेखाटित असत. पुढे त्यांनी चित्रकलेचा नाद सोडला.

विद्यार्थीदशेत असताना त्यांनी एक नाटक व ग्रंथ लिहून दक्षिणाप्राइज कमिटीकडे पाठविला होता; परंतु त्याची विशेष दखल घेतली गेली नाही. पुढे त्यांनी काव्य हेच जीवनाचे ध्येय मानले आणि अनेक कविता रचल्या. आजही त्यांच्या जवळपास १३५ कविता उपलब्ध आहेत.

१८८५ ते १९०५ हा केशवसुतांचा मुख्य काव्यरचना काल. हा काल त्यांनी पुणे, मुंबई, खानदेश येथे व्यतीत केला. मुंबईत असताना एक वेळ अशी आली होती की, मिशनरी शाळेत नोकरी करीत असल्यामुळे आणि मिशनरींच्या जास्त सहवासामुळे केशवसुत हिंदुधर्म सोडून ख्रिस्ती बनणार होते. त्यांचे मित्र ‘नारायण वामन टिळक’ याच सुमारास हिंदुधर्म सोडून ख्रिस्ती झाले होते. परंतु केशवसुतांच्या काही स्नेही मित्रांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. ( त्यांच्या कवितेवर इंग्रजी प्रभाव पडण्यामागचे एक कारण कदाचित हे देखील असावे.)

केशवसुतांच्या कवितेचे गुणदोषविवेचन विस्तृत रीतीने अनेक लेखकांनी केले; परंतु त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या कवितेविषयी कोणाही मोठ्या माणसाने चार स्तुतिपर उद्गार काढले नाहीत वा कोणी फारशी वाहवा केली नाही. अवघ्या ३९ वर्षाचे आयुष्य त्यांनी परिस्थितीशी अत्यंत झगडत काढले. अनेक प्रकारच्या काळज्यांमुळे त्यांचा स्वभाव फार एककल्ली, एकलकोंडा, मुग्ध व चिंताग्रस्त बनलेला. त्यांच्या कवितेमधून ‘निराशे’ संबंधी जे अनेक उद्गार निघालेले आहेत ते त्यांच्या स्वानुभवाचे द्योतक आहे. कदाचित त्यांच्या याच स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांनी उभ्या हयातीत त्यांचा एकही फोटो काढविला नाही. (अरविंद मासिकाच्या ५ व्या अंकामध्ये केशवसुतांचे म्हणून जे चित्र रेखाटले गेले, ते त्यांच्या चेहऱ्याशी थोडेसे साम्यदर्शक होते.)

केशवसुतांचे निधन ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाले. मृत्युपश्चात त्यांच्या कवितेबद्दल गुणग्राहक व प्रशंसापर अनेक लेख लिहिले गेले. अनेक कविताकारांनी त्यांना गुरुस्थानी ठेवले. त्यांना आधुनिक काव्याचे जनक मानले गेले. त्यांच्या काव्यापासून प्रेरणा घेऊन पुढील काळात ‘आधुनिक मराठी काव्यात’ कितीतरी परिवर्तने व प्रयोग झाले. महाराष्ट्राच्या काव्य परंपरेत ‘केशवसुत’ हे नाव आता अजरामर आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे १९६६ मध्ये केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली व या समितीकडून केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती १९६७ मध्ये प्रकाशित केली गेली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नातून केशवसुतांच्या जन्मगावी मालगुंड येथे स्मारक उभारण्यात आले व या स्मारकाचे उद्घाटन ८ मे १९९४ रोजी झाले. दापोलीतील वळणे गावीही त्यांचे स्मारक व्हावे म्हणून बरेच प्रयत्न झाले; परंतु तेथील त्यांच्या घरची वास्तू सध्या भग्नावस्थेत आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here