भजन एक लोककला

1
2503

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला असून लोककलेत दशावतार, लावणी, लेझीम, पोवाडा, किर्तन, तमाशा, गोंधळ, भारुड इ. लोककलांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भजनाचा. भक्तांनी मनापासून भगवंताची केलेली विनवणी , प्रार्थना म्हणजे भजन. भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द व त्यांचे अर्थ , विचार तसेच संगीत – स्वर, ताल, लय, वाद्य ह्या सगळ्याचा संगम म्हणजे भजन असेही म्हणता येईल. ‘भक्त ’, ‘जप’, ‘नमन’ या तीन शब्दांच्या आद्याक्षराने भजन हा शब्द पूर्ण होतो असे म्हणता येईल. ‘भजन’ या शब्दाचा विस्तार दापोली तालुक्यातील ५३ वर्ष भजनाची अविरत सेवा करणारे श्री . नामये बुवा पुढीलप्रमाणे करतात.

‘भ’ म्हणजे भक्तजन

‘ज’ म्हणजे जनार्दन

‘न’ म्हणजे नारायण

जाणकारांच्या मतानुसार भजनाचा उगम हा सामवेदापासून झालेला दिसत असला तरी भजनाचा स्पष्ट उल्लेख श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात आढळतो. भागवताचा कालखंड साधारण इ.स.पू.३०० असा मानण्यात येत असून या काळापासून भजन परंपरा सुरू झाली असावी आणि येथूनच भारतात वेगवेगळ्या प्रांतात भजन परंपरा सुरू झाली असावी. ह्याच भारतातल्या प्रांतातील वेगवेगळ्या थोर संतांनी अनेक अभंग लिहून त्यांना चालबध्द केले. मृदुंग व टाळ या वाद्यांच्या साथीने भजन परंपरा दृढ करण्याचे कार्य ह्या संतांनी केले. यानंतर प्रत्येक प्रांतात भजनाची स्वतंत्र परंपरा उदयास आली व त्याचसोबत प्रत्येक प्रांतात वेगवेगळे संप्रदाय जन्मास आले.. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय असे भक्ती संप्रदाय सर्वत्र परिचित झाले. त्यासोबतच शक्ती देवतेच्या उपासकांचा शाक्त संप्रदाय आणि तंत्रमंत्र विद्येचा कापालिक संप्रदाय असे संप्रदायही भारतभर परिचित आहेत.

 ह्या संप्रदायामध्ये महाराष्ट्रात वारकरी संप्रदायी भजनाची परंपरा संत नामदेवांच्या काळापासून सुरू झाली असावी. त्यापूर्वी महानुभाव पंथात मठसंगीत असायचे. मठसंगीत म्हणजे त्यावेळी संगीत फक्त एखाद्या मठापुरते मर्यादित होते. मठातील शिष्य सोडून अन्य कुणालाही प्रवेश दिला जायचा नाही परंतु कालपरत्वे संगीत मुक्त झाले. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत चोखामेळा अशा अनेक थोर संतांनी रचलेले अभंग प्रत्येक ईश्वरभक्ताच्या ओठी भजनाद्वारे रूळू लागले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तर अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी किर्तनाबरोबरच भजनाचाही प्रभावीपणे वापर केला. त्यांच्या या प्रभावी भजनातून ‘खंजिरी भजन’ हा नवा भजनाचा प्रकार उदयास आला.

भजनाला आध्यात्मिक अधिष्ठान असून  प्रबोधनाचा एक पर्याय म्हणून बघितलं जाऊ लागलं आणि कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रात ‘भजन’ हे लोककला म्हणून उदयास आले. भजनाचा प्रारंभ जयजयकाराने करतात. ‌त्यानंतर‌ “सर्व मंगल मांगल्ये” असे नमनाचे श्र्लोक आणि नंतर “जय जय रामकृष्ण हरी” चे भजन सुरू होते त्यानंतर रूपाचा अभंग – “रूप पाहता लोचनी ”अभंग गाऊन लोक मागणीचे अभंग गायले जातात. त्यानंतर भजनात एखादी कव्वाली व भारूडाचा समावेश असतो. भारुडामध्ये “वाढ ए माय तुला बुरगुंड होईल”, “विंचु चावला”, “दादला नको गं बाई” अशा पद्यांचा समावेश असतो.

या लोककलेचा आपल्या तालुक्यातील इतिहास शोधला तर  लोकं  दिवसभर कष्ट करून घाम गाळून घरी आल्यावर करमणूक म्हणून भजन करीत असावीत . भजन सादर करण्यासाठी रात्रीच्या वेळी गावातील लोकांची पावलं ईश्वरभक्तीच्या ओढीपायी गावातील मंदीरात किंवा गावातील एखाद्या घराच्या ओसरीवर टाळ, मृदुंग, चिपळ्या, तबला या वाद्यांसह संघटीत होऊन  भजन सादर करीत असत.  सण – उत्सवात, आठवड्यातून एखाद्या दिवशी गावातील लोकं भजन सादर करीत असत. ह्या सण-उत्सवाच्या भजनांतून   गावोगावी भजनाची“  प्रासादिक मंडळे ” स्थापित होऊ लागली. प्रासादिक म्हणजे प्रसाद रूपात दिले जाणारे.. ही प्रासादिक मंडळे जशी सण-उत्सवाला अथवा इतर कार्यात भजनं सादर करू लागली व वाद्यांमध्ये ढोलकी , हार्मोनियम ( पायपेटी / हातपेटी ) या वाद्यांची भर पडली व सोबतच काळानुसार भजनात चित्रपट व नाट्यगीतांचा समावेश होत गेला आणि त्यातून जन्म झाला तो म्हणजे “ संगीत भजनाच”.  संगीत भजनात तबला, ढोलकी , पखवाज, पियानो, हार्मोनियम इ. वाद्यांच्या साहाय्याने संगीत भजन सामूहिकपणे सादर होत असते. आजच्या जमान्यात लोकं‌ जास्त करून संगीत भजनाकडे आकर्षित होत आहेत.  संगीत भजन व वारकरी भजनासह चक्री भजन, सोंगी भजन , रिंगण भजन देखील काही ठिकाणी सादर होत आहे. चक्री भजनात एखादा अभंग गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरा अभंग गाण्यासाठी सुरूवात केली केली जाते‌. सोंगी भजनामध्ये देवभक्तांच्या संवादाचा आधार घेऊन सोंगे करून भजन सादर होते व रिंगण भजनात तीन स्वतंत्र भजनी मंडळे गोलाकार उभी राहून भजने गात असतात. एका मंडळाचे भजन गाऊन झाले की दुसरे मंडळ भजन गाऊ लागते व सहाजिकच त्यामुळे भजनाचे एक रिंगण बनते.

आजच्या काळात आपल्या दापोलीत वारकरी भजनाबरोबर संगीत भजन फार मोठ्या प्रमाणात सादर होत आहे. काही ठिकाणी संगीत भजनात अनेकवेळा राधा – कृष्ण अशा प्रातिनिधिक स्वरूपात आपापली भूमिका / पात्र रंगवतात आणि एखादी गवळण गातात. राधेची भूमिका साकारणारा स्वत:ला राधा समजतो आणि कृष्णाशी पद्याद्वारे संवाद साधतो तसंच कृष्णाची भूमिका साकारणारा स्वत:ला कृष्ण समजून पद्य गात कृष्णाच्या अगाध लीलांचे दर्शन घडवतो. “कृष्णा मजकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून” अशा काही गवळणी भजनात गायल्या जातात.

ह्या ईश्र्वराच्या नामस्मरणात गुंतून जाऊन पूर्वांपार असलेला भजनी साचा जपत संगीत भजन व वारकरी भजन तसेच स्वरचना केलेल्या अभंगांच्या आधारावर भजनाच्या डबलबाऱ्या होऊ लागल्या. जसे जाखडी नृत्यात डबलबाऱ्या असतात तसंच भजनाच्या डबलबाऱ्या विशेष प्रमाणात आपल्या कोकणात पर्यायाने आपल्या दापोलीत  होऊ लागल्या. गणेशोत्सव , नवरात्र इतर सण-उत्सवाला डबलबाऱ्या सादर होत असतात.‌ डबलबारी भजन म्हणजे भजनाचे दोन स्वतंत्र संघ / मंडळे.  डबलबारी भजनात रूपाचा अभंग त्यानंतर ध्यानाचा अभंग“ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ” नंतर मग भारूडला सुरूवात केली जाते.

या लोककला प्रकारात आपल्या दापोलीतील अनेक गावांत हरिनाम सप्ताहात म्हणजे साधारण मार्गशीर्ष महिन्यात हरिपाठाची भजनं सादर होताना पहावयास मिळतात. हि भजनं वर्षभर मंदीरात देखील सादर होत असल्याने त्यास नेमाचे भजन असे म्हटले जाते.

सध्याच्या या काळात आपल्या दापोलीत अनेक गावांमध्ये महिला भजनी मंडळे स्थापित झाली आहेत. सावित्रीबाई फुले महिला भजनी मंडळ ,काळकाईकोंड; प्रगती महिला भजनी मंडळ, कोळबांद्रे; इच्छापूर्ती श्रीगणेश प्रासादिक महिला नृत्यभजन मंडळ, दापोली अशी अनेक महिला भजनी मंडळं दापोली तालुक्यात असून पुरूषांच्या प्रासादिक मंडळांसह अनेक महिला भजनी मंडळं मोठ्या प्रमाणात स्थापन होत आहेत.

लोकांचे मनोरंजन करीत त्यांना आध्यात्मातून प्रबोधनाच्या चार गोष्टी सांगणाऱ्या ह्या कलेला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं असून भजन कलेशी तरूण पिढी जोडली जावी याकरीता भजनांच्या स्पर्धा गावोगावी आयोजित केल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या दापोली तालुक्यातील ‘श्री. अरविंद जाधव बुवा हे आपल्या कोकण विभागात ‘अखिल भारतीय शाहीर संघटनेत’ अध्यक्ष म्हणून कार्यरत असून श्री. अरविंद जाधव बुवांसह अनेक बुवा सरकारतर्फे भजनी वृध्द बुवांना मानधन मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत.

आपल्या दाभोळ मधील कै.अनंत महाडीक बुवा यांनी भजनाव्दारे समाजप्रबोधन केले व भजनाची एक नवी पिढी दापोली तालुक्यात घडवली व त्यानंतर  श्री.  अरविंद जाधव बुवा , श्री. गजानन बेलोसे बुवा, श्री. मधुकर रामचंद्र नामये बुवा, श्री. अनंत मांडवकर बुवा ,श्री.राजेश झाडेकर बुवा,श्री. श्रीधर पाथरटकर बुवा,श्री.विठ्ठल पाचरटकर बुवा,श्री. नंदकुमार पांचाळ बुवा असे दापोली तालुक्यातील अनेक भजनी बुवा तरूण पिढी भजनाकडे आकर्षित व्हावी व तरूण पिढीने भजन ही लोककला टिकवावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.. कारण भजन ही लोककला धार्मिक व आध्यात्मिक श्रध्दांशी निगडीत आहे. दूरदर्शनासारखी आज मनोरंजनाची साधनं विकसित असून सुद्धा भजनाच्या शौकीन वर्गाची पावलं आजही दिवसभरची कामं आटोपून संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी गावच्या देवळात अथवा गावातील एखाद्याच्या घराकडे भजनाच्या ओढीने वळतात. स्वत:मधील वादनकला जोपासण्यासाठी अथवा स्वत:मधील गायनकला दृढ करण्यासाठी आज तरुण पिढी भजने सादर करीत आहे. तरुण पिढीची स्वतंत्र भजनी मंडळे या कालखंडात स्थापित झाली असली तरी पूर्वी जशी आठवड्यातून दोन तीनदा सादर होत असायची तशी आता भजने सादर होत नाहीत . भजने आता फक्त एखाद्या सणासुदीला सादर होत आहेत. करमणूकीसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्यासोबतच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भजनाबरोबरच आता ऑर्केस्ट्रा व पाश्चिमात्य संगीताने जागा घेतली असली तरी   पूर्वीचा पारंपरिक भजनाचा बाज जपत आधुनिक काळातदेखील भजन हि लोककला अनेक भक्ती संप्रदाय  जपत असले तरी  या युगात भजनातर्फे देवाचे करण्यात येणारे नामस्मरण हा मुख्य हेतू कसा जपतात हा एक संशोधनाचाच भाग आहे .

संदर्भ

  1. श्री. अरविंद जाधव बुवा
  2. श्री. अनंत मांडवकर बुवा
  3. श्री. मधुकर रामचंद्र नामये बुवा
  4. महाराष्ट्रातील लोककला – ले. पुष्पलता राजापुरे

1 COMMENT

  1. हा लेख ज्यांनी लिहिला आहे त्यांचा contact number मिळेल का? मी एक संगीत विषयाचा विद्यार्थी असून कोकणातील भजन परंपरेचा अभ्यास करत आहे.
    माझा मोबाईल आणि व्हाट्सएप क्र. 9405545478

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here