हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायन पध्दतीत साथीच्या वाद्यांमध्ये हमखास आढळणारे एक तालवाद्य म्हणजेच ‘पखवाज’. पखवाज हे वाद्य गायनाबरोबर किंवा इतर वाद्यांबरोबर वाजवतात.
आज आपल्या दापोलीत सुध्दा अनेक पखवाज वादक आहेत. खरंतर ह्या पखवाजाचा काल इ.स.पूर्व ४०० ते इ.स.पूर्व ८०० असा समजण्यात येत असून पखवाजाचा स्पष्ट उल्लेख हा वैदिक वाङ्मयातील शुक्लयजुर्वेद या संहीतेत त्याचप्रमाणे रामायण, महाभारत, जातककथा, कालिदासादिकांची नाटके, काव्ये इत्यादींमध्ये आढळतो. शिसम, खैर, बाभूळ इत्यादी झाडांच्या खोडापासून पखवाज हे वाद्य बनवण्यात येते. गायनातल्या सप्तस्वरांसारखे ता, दिं, ती, ट, क, ग, न असे सात बोल आहेत.
‘पखवाज’ हा मूळ फारसी शब्द असून पखवाजाच्या दोन तोंडापैकी लहान तोंडाकडील बाजूस ‘शाईपूड’ व मोठ्या बाजूला ‘धूमपूड’ असं संबोधलं जातं. पखवाजालाच मृदुंग असेही म्हणतात. पूर्वी ह्या वाद्यास विष्णूवाद्य असेही म्हटले जात होते. त्याखेरीज त्याला माची, मादुला, मुरजा, पाणवातक अशीही नावे आहेत . पखवाजाचे जड व हलका असे दोन भाग आहेत. वाद्याच्या चामड्याच्या आवरणावर बोटाने, छडीने, काठीने किंवा हाताने आघात करून वाजवतात तेव्हा ते वाद्य ‘आनध्द’ ह्या प्रकारात मोडते.
शंकर तांडव नृत्य करत असताना नंदीने हे वाद्य वाजवल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. पुराणाप्रमाणेच हिंदू शिल्पकला व चित्रकलेत पखवाजाचे स्थान आढळते.
ह्या वाद्याला खूप मोठा इतिहास आहे.आपल्या दापोलीत सुध्दा भजन सेवेतून, किर्तन सेवेतून तसेच शक्तीतुरा या कोकणच्या कलेतून अनेक वादक वर्षानुवर्षे सेवा करत आले आहेत. त्यांपैकी श्री. श्रीधर (बावा) विचारे, श्री. अशोक मांडवकर, श्री . देविदास दातार, कु. नागेश किरडावकर, कु. नयन किरडावकर ही कला जोपासता आले आहेत.
दापोलीतल्या काही वाद्यवृंदांनी पखवाजाविषयी आम्हाला माहीती दिली.
पखवाज हा लांबट वर्तुळाकार लाकडाचा तुकडा सुमारे दहा तसूंपासून तीस तसूंपर्यंत लांब तसंच दोन्ही तोंडाला दहा इंचापासून पंधरा इंचापर्यंत रूंद असून, मध्यभागी त्याचा व्यास दोन तीन इंच अधिक असतो. आतल्या बाजूने तो इतका पोखरलेला असतो की ते लाकूड अर्ध इंच जाडीचे बाकी ठेवले जाते.
पखवाजाची दोन्ही तोंडे कातड्याने मढवलेली असतात . दोन्ही तोंडाच्या किनाऱ्यावर अर्धा इंच अथवा पाऊण इंच दुहेरी चामडे असते. पखवाजाच्या दोन्ही तोंडाच्या काठांबरोबर चामड्याच्या वालीचा वेठ वळून घातलेला असतो त्यास ‘महाळू’ किंवा ‘गजरा’ असं म्हटलं जातं. पखवाजाच्या सांगाड्यास ‘नाल’ असे म्हणतात.
पखवाजाच्या एका तोंडाला मध्यभागी दोन ते तीन इंचापर्यंत शाई घातलेली असते. ही शाई लोखंडाची जळ बारीक घातलेली असते. वाजवण्याच्या वेळेस दुसऱ्या तोंडाला गव्हाचे पीठ भिजवून शाईप्रमाणे लावले जाते. पखवाजाच्या शाईच्या पुडी बाहेरच्या भागाला ‘चाट’ किंवा ‘टाकणी’ असे म्हटले जाते.
पखवाजाच्या दोन्ही बाजूला दोन्ही हातांनी प्रहार केल्याने जो आवाज निर्माण होतो त्याला ‘बोल’ असं म्हटलं जातं. पखवाजावर ज्या हातांच्या बोटांनी वादन केले जाते त्या बोटांचे अर्थ सुध्दा निराळे आहेत ते पुढीलप्रमाणे:
- करंगळी म्हणजे कनिष्ठिका
- करंगळी च्या शेजारील बोट म्हणजे अनामिका
- मधले बोट म्हणजे मध्यमिका
- अंगठ्याच्या शेजारील बोट म्हणजे तर्जनी
- आणि अंगठ्याला अंगुष्ठ असं म्हटलं जातं
ह्या बोटांनी पखवाजावर केलेल्या एकामागून एक ठोक्याने ताल निर्माण होतो.. तालांचा विस्तार होत नसल्याने तीन ठोक्यांचा एक , चार ठोक्यांचा एक असा एक एक ठेका चढवत पुष्कळ तारांचा विस्तार करून तालांस नावे देण्यात आली. त्यातील प्रमुख सात ताल खालिल प्रमाणे.
१) धृताल २) मठताल ३) रूपकताल ४) झंपाताल ५) त्रिपुटताल ६) आडताल ७) एकताल
ह्या ७ तालांस दक्षिण हिंदुस्थानातील लोकं आडाचवताल, सुलफाक, रूपकताल किंवा एक्का, झंपाताल अथवा त्रिवट, आधा, तिताला किंबहुना तिलवाडा, चौताल व एकताल असेही म्हणतात. प्रत्येक तालास ५ जाती असून एकूण मिळून चतस्त्र, तिस्त्र, मिश्र, खंड, संकीर्ण मिळून एकूण ३५ ताल होतात. ३५ तालांच्या कोष्टकात मात्रांच्या खुणांनी ताल दर्शविलेले असतात.
सध्या दापोली तालुक्यात श्री. श्रीधर (बावा) विचारे, श्री. अशोक मांडवकर, श्री. देविदास दातार, कु. नागेश किरडावकर, कु. नयन किरडावकर असे अनेक कलाकार दापोली तालुक्यात पखवाज वादन कलेत तरबेज आहेत तसेच अनेक जणं वादनकलेकडे लक्ष्य केंद्रित करत आहेत. दापोली तालुक्यातील असे अनेक वादक आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वादनातून कलेची सेवा करत आहेत.
संदर्भ :-
- पखवाजवादन – ग.ग. विश्वनाथ रामचंद्र काळे वकील
- Wikipedia
- नागेश किरडावकर