आपला भारत देश हा खरा शेतीप्रधान देश आहे. परंतु सध्याचे वास्तव पहिले तर शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे आणि औद्योगिकरणाचे प्रमाण वाढत आहे. दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार, शहरीकरण अशी अनेक कारणे यापाठीमागे असली, तरी मुख्य कारण आहे, ‘बदलणारी मानसिकता.’ ज्यांच्या पिढ्यानपिढ्या शेतात धान्यरूपी सोनं पिकवित होत्या, ते आज म्हणतात, “शेतीत राम नाही”, “शेतीला प्रतिष्ठा नाही”, “शेतीपेक्षा हुजरेगिरी करणारी नोकरी बरी.” दुर्दैवाने हे सत्य आहे. परंतु या दुर्दैवी सत्यावर आपल्या जिद्दीने, कष्टाने आणि हुशारीने चपखलपणे मात करणारे काही हाडाचे शेतकरी अजून या भारत भूमित शिल्लक आहेत. अशांपैकीच एक रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील, बांधतिवरे गावात राहणारे ‘श्री. गणेश अर्जुन जगदाळे.’
गणेश जगदाळेंचं कुटुंब हे खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंब. त्यांचे आई-वडील वयोमान झालेले असताना देखील आजही शेतात पहाटेपासून-सायंकाळपर्यंत काम करतात. ‘शेती हा आपला धर्म आहे’ असं या कुटुंबातील प्रत्येकाला वाटतं. कोकणातील शेती ही चोंड्या-चोंड्यात विभागलेली अव्यावसायिक शेती, त्यामुळे इतर घरांप्रमाणे या कुटुंबाला देखील श्रीमंतीची तूट होती. गणेश जगदाळेंचा आजपर्यंतचा उभा जन्म शेतातच गेल्यामुळे त्यांचे फारसे शिक्षण झालेले नाही. परंतु त्यांनी शेतीत जे ज्ञान कमावले आहे ते उज्वल आहे. सुरुवातीला ते पिढ्यानपिढ्या चालत आलेली भात, नाचणी, वरी, तीळ, कुळीद, पावटा ही पारंपारिक पिके घेत असत. परंतु अनिश्चित पाऊस, गुराढोरांचा त्रास यामुळे नुकसान झाले तर संपूर्ण खर्च अंगावर बसत असे.
या गोष्टीला वैतागून त्यांनी सुद्धा इतरांप्रमाणे मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला; पण मुंबईत देखील आपला निभाव कितपत लागेल? याचा सारासार विचार केल्यानंतर त्यांनी निर्णय बदलला व शेतीला जोडधंदा ठरेल, असे व्यवसाय करायचे ठरवले. पारंपारिक पिकांबरोबर त्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांचे पिक घेण्यास सुरुवात केली. आलेल्या पिकाची ते स्वतः दापोलीच्या बाजारपेठेत जाऊन विक्री करू लागले. नफा वाढू लागला तशी शेतीतील निष्ठा आणि मेहनत त्यांनी अजून वाढवली. दुसऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर घेऊन ते त्यात शेती करू लागले. शेतात वेगवेगळे प्रयोग केल्यामुळे ते आज फ्लावर, कोबी, टोमॅटो, गाजर अशी अपारंपरिक पिके यशस्वीरित्या घेतात.
दापोली शेतकरी सेवा संघटनेच्या मदतीने त्यांना गाडी तळावर भाजी विक्रिची जागा प्राप्त आहे. दररोज पहाटे चार-साडेचारला शेतावर जाऊन, शेतमाल खुंडून साडे नऊ-दहा पर्यंत ते बाजारपेठेत येतात व भाजीची विक्री करतात. गावठी आणि सेंद्रिय खताची भाजी असल्यामुळे त्यांची भाजी हातोहात खपली जाते. बरीचशी गिऱ्हायके गावातलाच माणूस म्हणून, शेतकरी म्हणून एक निराळी बांधिलकी जपतात व भावामध्ये जास्त तोलमोल न करता भाजीची खरेदी करतात. विक्री झाल्यावर गणेश जगदाळे ताबडतोब पुन्हा शेतावर येतात आणि पिकपाण्याकडे लक्ष देतात. शेती हा सोपा व्यवसाय नाही. त्यात कष्ट अपार आहेत. पण बिनकष्टाचा या जगात कोणताच व्यवसाय नाही. श्रम आणि निष्ठा प्रत्येक व्यवसायाला आवश्यक आहे. जगदाळे तेच करत आले म्हणून आज यशस्वी आहेत.
सध्या ते स्वत:ची व इतरांची मिळून चार-पाच एकराची शेती करतात. शेतीतून किती नफा मिळवता येईल यापेक्षा पिक किती घेता येईल याकडे त्यांचा जोर असतो. ते शेतात नवनवीन प्रयोग करीत असतात. दापोलीतील कृ.वि आणि सरकारी योजनांचा योग्य पाठपुरावा करुन ते पुरेपूर वापर करुन घेतात. कृषि सहली मार्फत इतर शेतकऱ्यांच्या प्रयोगाचा आढावा घेतात. त्यामुळे आज जिल्ह्याच्या आणि राज्याच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने ते सन्मानित आहेत, गावातल्या आणि तालुक्यातल्या बऱ्याच तरुणांनी त्यांचे अनुकरण केले आहे, यामुळे थोडासा का होईना दापोलीतील शेती नष्ट होण्याचा वेग मंदावला आहे.
दापोलीतील शेतीनिष्ठ शेतकरी गणेश जगदाळे यांचे शेतीनिष्ठ वडील श्री. अर्जुन जगदाळे, टीम ‘तालुका दापोली’ ला मुलाखत देताना. या मुलाखतीत त्यांनी शेतीची सुरुवात कशी केली, शेती बद्दल केलेले प्रयोग आणि त्यांची शेती वरील निष्ठा या बद्दल माहिती दिली आहे. त्यांची हि मुलाखत जरूर पहा-