पूर्वी कोकण प्रांत पशुधनाने समृद्ध होता. तेव्हाच्या विशाल कौलारू घरांमागे गुरांसाठी स्वतंत्र गोठे होते. बैल, गायी, म्हशी अशा गुरांनी तेव्हाचे गोठे भरलेले असत.कोंबड्यांच्या आरवण्याने,गायीच्या हंबरण्याने, वासरांच्या लाडीक व गोड हंबरण्याने तेव्हा दररोज सकाळ झाल्याचे समजायचे. सकाळी उठल्यावर गोठ्यातली कामे आवरताना घरातल्या मोठ्या माणसांची खूप धावपळ होत असे. सकाळी सकाळी प्रत्येक गोठ्यांतून गायीचे किंवा म्हशीचे दूध काढताना होणारा आचळांचा मधुर आवाज हे पारंपरिक संस्कृतीचे चित्रण होते.
पशुधन हेच खरे धन
कोकणातील, पर्यायाने दापोली तालुक्यातील गावागावांतली माळराने सकाळपासून गुरांच्या कळपांनी भरून जात असत. गुरांना आवरण्यासाठी पारंपारिक सांकेतिक भाषेत काही शब्द होते. गुराख्यांच्या अशा आरोळ्यांनी गावागावची माळराने सकाळपासूनच अशी गजबजून जात असत. प्रत्येक घरातच असे दुधदुभते असल्याने दूध, ताक, तूप, लोणी, दही यांचाही सुकाळ होता. सकाळी घरातली कामे आवरली की, प्रत्येक घरातून रविने ताक घुसळतानाचे असे लयबद्ध आवाज येत असत. प्रत्येक गोठ्यात शेतीच्या कामासाठी, नांगर ओढण्यासाठी किमान तीन -चार तरी धडधाकट बैल असत. आपल्याच गोठ्यात व आपल्याच गायींना झालेले बैल संभाळताना सोबत आपुलकीची एक झालर असे. अशा गायीगुरांमुळेच घरात धनधान्य येत असे. याशिवाय गायी गुरे असल्याने घरात दररोज उरलेल्या अन्नाची, धान्याची नासाडीही होत नसे. आपल्याच शेतात आपण घाम गाळून पिकविलेल्या भाताचा भरडल्यावरचा कोंडा रात्रभर घमेलात भिजवून ठेवल्यावर सकाळपर्यंत त्याचा पौष्टिक खुराक झालेला असे. असा पौष्टिक खुराक, घरातल्याचा भुईमूगाच्या शेंगा गावातल्या घाण्याला लावून आणल्यावर तेलासोबत मिळणारी पेंड, भाताचे पेंडे, नाचणीची काड, भुईमूगाचे सुकलेले गुळे, कुळदाचे गुळे आणि खाजणातली चार असा पूर्णतः नैसर्गिक व फुकटाचा पशुआहार घरात व परिसरातच उपलब्ध होत होता. अशा आपुलकीच्या व मायेने वाढलेल्या खाण्यावरची तेव्हाची गुरेही खूप धष्टपुष्ट दिसत. पिळदार अंगाचा असा बळावलेला धष्टपुष्ट बांगर बैल गोठ्यात असणे म्हणजे तेव्हा घरातल्या समृद्धीचे लक्षण वाटे. गोठ्यातला एखादा बैल आजारी पडला तर त्याच्यावर उपचार करणारे अनेक गावठी वैद्य गावागावांत उपलब्ध असत. अडलेल्या गायी किंवा अडलेल्या म्हशींची मोकळीक करण्यासाठी असे वैद्य कोणतीही अपेक्षा न करता तातडीने धावून जात असत.
पावसाळी शेतीस सुरुवात होण्याआधी पुर्वी शेतीच्या अवजारांसोबतच बैलांचीही आवश्यक तयारी करून घेतली जात असे. नवीन व तरुण बांगर बैलांना नांगर ओढण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. बऱ्याच गावात असे बैलांना ‘हुजू’ करणारे काही ठराविक प्रशिक्षक शेतकरी होते. असे आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतरच हुजू झालेल्या बैलांना प्रत्यक्ष नांगरटीसाठी नांगराला जुंपले जात असे. याशिवाय नेहमीच्या बैलांना पावसाळाभर शेतात, दगड धोंड्यात चालायचे, नांगर ओढायचे अवजड काम करायचे असल्याने या बैलांचे खूर झीजू नयेत यासाठी काही ठिकाणच्या बैलांच्या खुरांना लोखंडी नाल ठोकले जात. असे लोखंडी नाल ठोकल्याने बैलांच्या खुरांचे संरक्षण होत असे. दापोलीतील काही ठराविक लोकांनांच असे नाल ठोकण्याचे कसब अवगत होते. नाल ठोकण्यासाठी बैलाला आडवे झोपवणे व त्याला घट्ट दाबून धरणे हेही फार जोखमीचे काम असे.
गावातल्या मोठ्या व सधन कुटुंबांच्या गोठ्यात तीन ते चार बैलजोड्यांही असत. त्या काळात पावसाळ्यापुर्वी गुरांचेही बाजार भरत. शेतीसाठी लागणाऱ्या बैलांची अशा बाजारात खरेदी विक्री होत असे. अशाच बैल बाजारात गायी, म्हशी, रेड्यांचीही खरेदी विक्री होत असे. पंचक्रोशीतील एक ठिकाण असे पारंपारिक बैलबाजारासाठी राखून ठेवलेले असे. दापोली तालुक्यातील कादीवली सारख्या काही गावात असे बैलांचे बाजार पुर्वी भरत असत. गुरांसोबतच शेळ्या, कोंबड्याही त्या काळात मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात. तालुक्यातील गावागावांमध्ये अशाच प्रकारे आषाढी अमावास्या, गौरी गणपती, होळी यांसारख्या सणासुदीला असे गावठी कोंबड्यांचे मटण खाल्ले जाई. कोणत्याही रासायनिक अन्नपदार्थांशिवाय केवळ घरातल्याच व परिसरातल्या अन्नावर वाढलेल्या अशा कोंबड्या पूर्णपणे निर्धोक व खाण्यास योग्य असत. अशाच प्रकारे परिसरातील झाडपाला खावून वाढलेले बोकडही एखाद्या मोठ्या सणासुदी निमित्ताने कापले जात. पावसाळी शेतीची कामे आटोपल्यावर शेतीच्या बैलांना थोडा आराम मिळावा यासाठी अशा बैलांना पुढील पावसाळ्यापर्यंत दुसऱ्या कडे राखणीस देण्याची पुर्वी प्रथा होती. दापोली तालुक्यातील शेतकरी ही प्रथा जोपसत होता. सपाट माळरानावर राहणारी काही कुटुंबे अशी राखणीस घेतलेली गुरे चार सहा महिने सांभाळण्याचेच काम करीत. पावसाळ्याच्या तोंडावर मग शेतकरी आपापल्या बैलांना परत घेऊन जात. बैल राखण्याच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून ठरलेला मोबदला पैशांच्या किंवा धान्याच्या रुपात दिला जात असे. माळावरील काही कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे हेच साधन होते. या व्यवसायाच्या जोडीला जोडधंदा म्हणून ही कुटुंबे शेळ्या, मेंढ्याही पाळीत.
पर्यावरणस्नेही पशुधन
सध्या पशुधन रोडावल्याने पावसाळ्यात सर्वत्र बेसुमार गवत वाढते. दापोली तालुक्यातील लागवडीखाली असलेले खरीपाचे क्षेत्र आता कमालीचे घटले आहे. आता शेतातील व बागांमधील वाढलेले गवत वाढून खूप अडचण होते. यावर उपाय म्हणून रासायनिक व विषारी द्रावणाची फवारणी करून असे निरुपयोगी गवत मारुन टाकले जाते. पुर्वी चित्र वेगळे होते. आता निरुपयोगी वाटणारे गवत काही वर्षांपुर्वी बहुपयोगी होते. गुरांचे राखणे दररोज सकाळी व संध्थाकाळी परिसरात वाढलेल्या अशा हिरव्यागार गवताच्या वरंडी बांधून घरी आणत. गोठ्यात बांधून ठेवलेल्या दुभत्या गायी, म्हशी, वासरे यांच्यासाठी हे गवत म्हणजे आवडता खुराक होता. सर्वत्र असे गवत कापले जात असल्याने शेती व बागेचा परिसरही आपोआपच स्वच्छ व साफसूफ दिसत असे. दुभत्या गायींना असे कोवळे व लुसलुशीत गवत मिळाल्याने अशा गायी, म्हशी जास्त दूध देत असत. त्या काळात शेताचे बांध, पडीक जमीन, फळबागा, माळरान येथील गवतही कमी पडत असे. काही ठिकाणी तर अशा गवतासाठी बंदिस्त कुरणे भाड्याने घेतली जात. गोरगरीब शेतमजूर दररोज सकाळ संध्याकाळी अशा चारीच्या वरंडी विकून चार पैसे कमावित. अशा प्रकारचे गवत हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनत असे. गोठ्यात गुरे असल्याने कोणतीच वस्तू तशी फुकट जात नसे. शेतीच्या कामांसाठी परड्यातल्या तोडलेल्या बांबुच्या काठ्यांची पाने गुरे आवडीने खात असत. गायीगुरांसाठीचे हे अन्न परिसरातूनच व निसर्गातूनच उपलब्ध होत असल्याने त्या काळात अशा पशुधनामुळे पर्यावरणाचे संरक्षण व समतोल अशा दोन्ही गोष्टी आपोआपच साध्य होत होत्या.
पशुधन का रोडावले?
गावातल्या प्रत्येक गोठ्यात किमान आठ दहा गुरांची असलेली संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची रोडावली आहे. काही वर्षांपूर्वी दापोली तालुक्यात काही हजारांच्या संख्येत असलेले पशुधन आता काही शेकड्यांवर आले आहे. शहरी राहणीमानाचे आकर्षण खेड्यापाड्यापर्यंत पोचले आणि खेड्यांची दिशा व दशा बदलून गेली. बाजारात उपलब्ध असलेल्या आयत्या व सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तुंचे प्रमाण वाढल्याने खेड्यातील माणसांची शेतात कष्ट करण्याची इच्छा कमी कमी होत गेली. गावातली तरुणाई शेतीपासून दूर गेली आणि मुंबई, पुण्यासारख्या शहरात जाऊन विसावली. दोन तीन महिन्यांच्या शेतीसाठी वर्षभर गुरेढोरे संभाळणे पुढे गावात राहणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना झेपेनासे व परवडेनासे झाले. मग गोठ्यातील एक दोन करता करता संपूर्ण गोधन नाहिसे झाले. आज दापोली तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची हीच कहाणी झाली आहे. आज शहरात मोकाट गुरे तरी दिसतात. पण गावातली गायीगुरे कधीच पडद्याआड गेली आहेत. कधीकाळी पशुधनाने संपन्न असलेले व गजबजलेला हा प्रांत आता यांत्रिकी करणाने व्यापाला आहे.
पशुधनाची आवश्यकता काय?
आता शहरांप्रमाणेच गावागावातील लोकांचे राहणीमान बदलले आहे. पुर्वीसारखी सडासारवणाने सजलेली अंगणे आता गावातही दिसत नाहीत. आता कोणत्याच घरात सारवलेली मातीची जमीन व सारवलेले अंगण दिसत नाही. प्रत्येक गोठ्याशेजारी शेणकी म्हणजेच शेणाची गायरी असायची. वर्षभराचे साठलेले गुरांचे शेण या गायरीत साठायचे. शेणकीत असे निसर्गतः तयार झालेले शेणखत शेतीसाठी वापरले जात असे. आज बाजारात सेंद्रिय खताच्या नावाखाली असे शेणखत वीस पंचवीस रुपये किलो दराने दापोलीतील बाजारात विकतही मिळते. बाजारात मिळणारे असे सेंद्रिय खत आपण विकतही घेतो. पण अशाच प्रकारचे साधारण वीस पंचवीस क्विंटल शेणखत फुकटात प्रत्येक शेणकीत तयार व्हायचे. पुर्वी असे घरच्या पशुधनापासून तयार झालेले नैसर्गिक खत शेतीसाठी वापरले जात असे. गावातल्या पाणंदींत पडलेले, माळरानावर पडलेले शेणथापेही पुर्वी माणसे गोळा करायची. अशा उन्हात सुकलेल्या गोवऱ्यांचा सरपणासाठी वापर होई. घरातच बनवलेले घरगुती तूप स्वयंपाकासाठी वापरले जाई. आज असे पशुधन व गोधन दुर्मिळ झाले आहे. पूर्वीचे आपल्या स्थानिक गाई गुरांची म्हणजे गावठी गुरांची जागा आत्ता गीर, जर्शी सारख्या संकरीत वानाने घेतली आहे. तर गावठी कोंबड्या नमाशेष व्होवून आत्ता व्यवस्यायिक दृष्टीने वरवर पहिल्यास परवडणाऱ्या ब्रॉयलर, कडकनाथ, गिरीराज अशा अनेक जाती विकसित झाल्या.सरतेशेवटी एकच सांगावेसे वाटते, एके काळी पशुधनाच्या बाबतीत समृद्ध व स्वयंपूर्ण असलेल्या कोकणाला आणि पर्यायाने दापोली तालुक्यास शेतीत आधुनिकीकरणा बरोबर समृद्ध पशुधनाचे ते सुवर्णयुग पाहण्याचे दिवस पुन्हा लाभोत हीच अपेक्षा.