भारत कृषिप्रधान देश आहे असे कायम म्हटले जाते. शेतीच्या इतिहासात महिलांचे योगदान अमूल्य आहे. उत्क्रांतीचा अभ्यास करणारे संशोधक जगात शेतीची सुरवात महिलांनी केली असे मानतात. अशाच महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृषी मंत्रालय २०१६ पासून १५ ऑक्टोबर महिला किसान दिवस म्हणून साजरा करते.
या दिवसाच्या व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष या निमित्ताने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांनी गट ग्रामपंचायत गव्हे यांच्या सहकार्याने महिला किसान दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिशांत कोळप (उपविभागीय कृषी अधिकारी) उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना महिलांचे शेतीतील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विशेषतः आजही महिला शेतीचा प्रमुख भाग समर्थपणे बजावतात हे अधोरेखित केले आणि अधिकाधिक महिलांना शेती व शेती आधारित प्रक्रिया उद्योगात कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन दिले. सोबतच मार्गदर्शन करताना येणाऱ्या हंगामात पर्यटनात होणारी वाढ लक्षात घेऊन उत्पादनात त्याप्रमाणे वाढ करावी हा संदेश दिला.
याच बरोबर या कार्यक्रमाला श्री. पी.पी. थेटे (तालुका कृषी अधिकारी, दापोली), श्री. जे.डी. मेटे (मंडळ कृषी अधिकारी, दाभोळ), आर. एस. भावठाणकर (कृषी पर्यवेक्षक, दाभोळ), श्री. गणेश कोरके (तालुका तंत्र व्यवस्थापक, आत्मा), सौ. दर्शना वरवडेकर (कृषी सहाय्यक), श्री. मोगरे (कृषी पर्यवेक्षक), श्री. एम. पी. कापटे (कृषी सहाय्यक), श्री. पार्टे (कृषी सेवक) हे उपस्थित होते.
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विजेत्या सौ. शैला अमृते यांनी नाचणी मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले. यामध्ये त्यांनी नाचणी पासून विविध पदार्थ करून दाखवले व उपस्थित महिलांकडून करून घेतले.
चांगल्या कामाची दखल घेतली तर ते करण्यासाठी विशेष प्रोत्साहन मिळते म्हणूनच महिला किसान दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीम. अनघा मकरंद करमरकर, पालगड (आंबा, काजू फळप्रक्रिया), श्रीम. अपर्णा अविनाश गौरत, साखळोली (रानभाज्या व भाजीपाला उत्पादन व विक्री), श्रीम. श्रुती श्रीकांत बापट, मुर्डी (कृषी पर्यटन व फळप्रकिया), श्रीम. सुजाता महेश केळकर, आंबवली (आंबा, कोकम प्रक्रिया), श्रीम. रितिका रघुनाथ लाले, टाळसुरे (काजू प्रक्रिया उद्योग), मधुरा सचिन तलाठी, जालगाव (लोणची व सोडा उत्पादन), श्रीम. ललिता गोपाळ पवार, निगडे (नाचणी उत्पादने), श्रीम. रजनी दत्ताराम कदम, गव्हे (लोणची व पापड उत्पादन), श्रीम. मीरा मोहन मुंडेकर, गव्हे (लाडू, चकली, पापड इत्यादी उत्पादन), श्रीम. वैशाली अरुण पालटे, गव्हे (नाचणी व पापड उत्पादन), श्रीम. स्वप्नाली संजय हरावडे, गव्हे आणि श्रीम. दीप्ती जितेंद्र काजरेकर या अन्न व फळ प्रक्रिया क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या तालुक्यातील १२ महिलांचा सन्मान करण्यात आला.
आत्मा अंतर्गत गव्हे गावात या वर्षी अद्ययावत शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी भात शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांचा समारोपही या कार्यक्रमात करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद गव्हे गावचे सरपंच श्री. वसंत घरवे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन श्री. मारुती रहाटे यांनी केले. गव्हे गावचे ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर ग्रामस्थ हे देखील उपस्थित होते.
कृषी, तंत्रज्ञान आणि महिला हे तीन घटक एकत्र आले तर शाश्वत विकासाचा वेग नक्कीच वाढीस लागेल. त्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा सारखा उपक्रम, महिला उद्योजक आणि जागरूक नागरिक यांनी या कार्यक्रमाप्रमाणे सतत एकत्र कार्यरत राहण्याची गरज आहे.
विशेष सहकार्य-श्री.सुधाकर मोरे (शेतकरी मित्र),श्री.मारूती रहाटे ग्रा.प.सदस्य.