राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. पाशा पटेल यांचे दापोलीत आगमन

0
2192

कोकणामध्ये वाईन उद्योगास चालना मिळावी, याकरीता श्री. पाशा पटेल यांचेकडे कोकणवासियांनी वाईनवरील जावक अबकारी कर (EXCISE DUTY) १०० % कमी व्हावा यासाठी निवदने दिली होती. त्या निवेदनांवर कार्यवाही करत मा. पाशा पटेल यांनी जावक अबकारी कर कमी करून अगदी नाममात्र करून घेतला. कोकण वाईन उद्योगातील इतर मागण्या व बाबी त्यांच्यासमोर ठेवण्यासाठी मा. पाशा पटेलांना दापोलीत निमंत्रित करण्यात आले. त्यानुसार दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मा. पाशा पटेल दापोलीत आले व वरील विषयाचा आढावा घेतला. डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठाचे कुलगुरू श्री. संजय सावंत व लघू उद्योजक आणि आत्माचे अध्यक्ष श्री. विनायक महाजन यांनी त्यांचे स्वागत केले व विद्यापिठाच्या प्रशासकीय इमारतीत चर्चासत्र पार पडले. सदर बैठकीत उद्योजकांनी एक निवेदन सादर केले आहे व या निवेदनाचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा आणि सक्रीय सहकार्य लाभावे, अशी विनंती केली आहे.

निवेदनातून ठेवण्यात आलेला प्रस्ताव.

• एक कॉटेज वाईनरी.
( कोकणामध्ये एप्रिल व मे महिन्यात विविध फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पुढचे पावसाळ्याचे महिने तापमान कमी करणारे असल्यामुळे वाईन उत्पादनासाठी सहाय्यक ठरतात. पावसाळ्यानंतरचा हंगाम पर्यटनाचा असतो. तोपर्यंत वाईन छान मुरून तयार झालेली असते. अशी वाईन शहरात नेण्याऐवजी जागेवरच विक्री केली तर शेतकऱ्याचा थेट फायदा होऊन त्या योगे पर्यटनालाही चालना मिळेल. आणि अशा किमान ५०० कॉटेज वाईनरी जरी कोकणात उभ्या राहिल्या व एका कॉटेज वाईनरी कडून प्रतिवर्ष ५००० रु. शासनाने आकारले तर शासनाला एकही रुपया खर्च न करता प्रतिवर्षी थेट २५ लाख शुल्क स्वरूपात प्राप्त होतील. शिवाय कोकणच्या GDP मध्ये २५ कोटी रुपयांची भर पडेल. )
• वाईन उत्पादन उद्योग परवानगीच्या शासन निर्णयात एक कॉटेज वाईनरी अशी एक कॅटेगरी असावी व या कॅटेगरीतील वाईनरीला वार्षिक १००० लीटर वाईन निर्मितीची परवानगी असावी. अधिकची परवानगी असू नये. यासाठीचे परवाना शुल्क वार्षिक ५००० रु. असावेत.
• वाईन उत्पादनाच्या जागीच वाईन विक्री करता येईल, कोठेही, कोणत्याही दुकानात विक्रीसाठी वाईन थेट अशी विकत येणार नाही.

• अन्न प्रक्रिया उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असावे. आणि अशी नोंदणी करताना त्यामधील विशिष्ठ पौष्टिकता मिळवण्यासाठी उत्पादित केलेले अन्नपदार्थ, या शिर्षकाची नोंदणी करणे आवश्यक असावे.

वरील मुद्दे शासन निर्णयीत झाल्यास कोकणात निरनिराळ्या औषधी गुणधर्म युक्त वाईन निर्मितीची इंडस्ट्री स्थापित होईल आणि सामान्य शेतकरी, शासन व जनता असा तिहेरी फायदा होईल, हा विश्वास उद्योजकांना आहे.
वाईन उद्योग इच्छुकांच्या वतीने हे निवेदन श्री. विनायक महाजन, ययाती बापट, संतोष मेहता, माधव महाजन यांनी मा. पाशा पटेलांना सादर केले आणि यावर सकारात्मक प्रतिसाद देत पटेलांनी पंतप्रधानांच्या Doubling farmers income या घोषणेनुसार शेतकऱ्यांसाठी काम करू, असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here