कोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक रानभाज्या येथे उगवतात. कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय व किटकनाशकांशिवाय उगवलेल्या व वाढलेल्या अशा रानभाज्या आरोग्यवर्धक व सुरक्षित आहेत.
पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. पुर्वी पावसाळ्याचे दिवस कोकणातील माणसांसाठी अतिशय कसोटीचे दिवस असत. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने येथील लोकांचे आरोग्यही चांगले राहत असे.
अश्याच कही रनभाज्यांची माहिती या लेखद्वारे घेऊ.
कुर्डू
कुर्डूची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीस शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन, जंगल अशा ठिकाणी आपोआप रुजते. कुर्डुची रानभाजी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. माठवर्गीय कुळात मोडणारी ही अतिशय रुचकर व बहुऔषधी गुणांनी युक्त रानभाजी आहे. बारीक व तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पाने येतात. ही रानभाजी कोवळी असताना खाण्यातच खरी मजा असते. कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात. कोकणातील जाणकर माणसे असे तुरे खुडून भाजीसाठी आणतात. कुर्डूची भाजी ओळखण्यासाठी खूप सोपी आहे. खुडून आणलेली कुर्डूची भाजी धुवून चिरतात. माठाच्या भाजीप्रमाणेच ही कुर्डूची भाजी शिजवतात. पातळ व सुकी अशा दोन्ही पद्धतीने शिजवलेली कुर्डूची भाजी अतिशय रुचकर व चविष्ट लागते.
पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पुढचे तीन महिने ही रानभाजी मुबलक प्रमाणात परिसरात उपलब्ध होते. साधारण सप्टेंबर महिन्यात अशा वाढलेल्या कुर्डूला फुलांचे रंगीत तुरे येतात. ही फुले परिपक्व होऊन सुकल्यावर अगदी माठासारख्याच काळ्या बिया तयार होतात. फुले सुकून गेली की या बिया पडून सर्वत्र पसरतात. याच बिया पावसाळ्याच्या सुरुवातीस उगवतात. कुर्डुच्या काळ्या बिया मूतखड्याच्या आजारावरही अतिशय गुणकारी आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अशा कुर्डुची भाजी तीन चार वेळेस खाल्ली तरी आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
फोडशी
ही कांदावर्गीय रानभाजी आहे. पांढऱ्या कांद्याच्या भाजीसारखीच ही भाजी असते व दिसते. बऱ्याच वेळेस ही भाजी उपटताता कांदा जमिनीतच राहतो. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीस ही भाजी जंगलात उगवते. कोकणात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी आहे. अनेक ठिकाणच्या नदीकाठच्या जंगलांत ही रानभाजी उगवते. मात्र फोडशीची भाजी अचूक ओळखण्यासाठी अनुभव व जाणती दृष्टी लागते. कारण फोडशीच्या भाजीसारखेच दिसणारे अनेक कंद येथे उगवतात. यांपैकी फोडशीसदृश दिसणारे कंद अनेक असतात. भाजीच्या पातीही तशाच दिसतात. मात्र किंचित पातळ व बारीक पात, लहान व पांढऱ्याशुभ्र कांदा दिसला की, ती फोडशी समजावी. फोडशीच्या रानभाजीचा कांदा इतर ऋतूत जमिनीखाली मृतवत असतो. मात्र पहिल्या पावसातच त्याला कोंब फुटून पाती वर येतात.
फोडशीची भाजी जंगलात उगवल्यापासून पुढचा पंधरवडाभरच खाण्यासाठी योग्य व चविष्ट असते. फोडशीच्या पाती जुन झाल्यावर त्या पटकन शिजत नाहीत व तशी चवही लागत नाही. फोडशीची भाजी कोकणातील जंगलांमध्ये सर्वत्र मिळते. कांद्याच्या पातीची भाजी जशी करतो तीच पाकक्रिया वापरून फोडशीची भाजी करता येते. काही ठिकाणी या भाजीत सुका कोलीम घालून शिजवतात. फोडशीची भाजी खूप चविष्ट व बहुपयोगी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस ही भाजी उपलब्ध होईल तेव्हा अवश्य खावी. अनेक खवय्ये पावसाळ्याच्या सुरुवातीस या रानभाजीची अगदी आतुरतेने वाट बघत असतात.
टाकळा
टाकळा ही वनस्पती ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात उगवते. कोकणात ही भाजी सर्वत्र सहज आढळते. पहिल्या पावसानंतर ही भाजी जमिनीतून उगवते. टाकळ्याची रोपटी वितभर उंचीची झाली की ही रानभाजी खाण्यास योग्य समजावी. रस्ते व पायवाटेच्या दुतर्फा, मोकळ्या मैदानात किंवा शेतात व जंगलातही ही रानभाजी मुबलक प्रमाणात उगवते. टाकळ्यामध्येही अनेक प्रकार आहेत. पण साधारण घंटेच्या आकाराची पाने असलेला टाकळा खाण्यास योग्य समजावा. टाकळ्याची रोपे कोवळी असतानाच त्याच्या वरच्या कोवळ्या पानांचे तुरे खुडून ते भाजीसाठी वापरतात. किंचित तुरट चवीच्या या रानभाजीला खूप खमंग असा सुवासही येतो. टाकळ्याची भाजी पित्त विकारांवर गुणकारी आहे.
पावसाळ्यानंतर पुढच्या दोन महिन्यांपर्यंत ही भाजी खाण्यास योग्य असते. टाकळ्याचे खुडलेले तुरे स्वच्छ धुवून त्याची बाजारात मिळणाऱ्या पालेभाजींसाठीची पाकक्रिया वापरून पातळ किंवा सुकी भाजी करतात. टाकळ्याचे रोपटे साधारण एक मीटरपर्यंत उंच वाढते. पावसाळ्याच्या अखेरीस टाकळ्यास पिवळी फुले येऊन नंतर प्रत्येक फुलाच्या जागी एक शेंग येते. या शेंगा परिपक्व झाल्यावर शिशिरात तडकून त्यांतील बिया इतस्ततः विखुरतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस याच बिया रुजून टाकळ्याची नवीन रोपे तयार होतात. खमंग चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही औषधी गुणधर्म असलेली टाकळ्याची रानभाजी पावसाळ्यात अवश्य खावी.
भारंगी
कोकणात पावसाळ्यात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी आहे. भारंगीचे झुडूप दोन ते तीन मीटर उंचीपर्यंत वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीस शुष्क काटक्यांच्या रुपात असलेल्या भारंगीला कोवळी पाने व नवीन तुरे फुटतात. लांबट गोलाकार कात्र्यांच्या कडा असलेली पाने जंगलात शोधून खुडावी लागतात. भारंगीची भाजी गोळा करण्यासाठी जंगलात फिरावे लागते. एकाच झाडावर अशी मुबलक भाजी मिळत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीस फुटलेले कोवळ्या पानांचे तुरे खाण्यासाठी योग्य असतात. हे कोवळे तुरे घरी आणून व स्वच्छ धुवून इतर पालेभाज्यांचीच पाकक्रिया वापरून भारंगीची सुकी भाजी करतात. भारंगीच्या भाजीत चणाडाळ वापरल्यास ही पालेभाजी अधिक चविष्ट लागते. पावसाळ्यात एकदा भारंगीच्या झुडूपाला कोवळी पाने आल्यावर पुढचे दोन महिने असे वरचेवर फुटणारे कोवळ्या पानांचे तुरे खुडून आपण भारंगीची भाजी खाऊ शकतो. भारंगीच्या भाजीलाही खूप छान सुवास येतो. भारंगीची भाजी शिजवल्यावर केवळ वासानेच ओळखणारे अनेकजण आहेत. इतर पालेभाज्यांची पाकक्रिया वापरून भारंगीची सुकी भाजी करतात. टोपातल्या भाजीपेक्षा लोखंडी तव्यावर परतून शिजवलेली भारंगीची भाजी अधिक रुचकर लागते.
भारंगीची भाजी चवदार आहेच, शिवाय विविध औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. भारंगीची भाजी वात विकारांवर खूप गुणकारी आहे. भाद्रपदात या भारंगीला गर्द जांभळ्या व पांढरट रंगाच्या फुलांचे तुरे येतात. भारंगीच्या फुलांचीही भाजी खूप रुचकर लागते. भारंगीच्या फुलांचीही शेवग्याच्या फुलांच्या भाजीची पाकक्रिया वापरून भाजी करतात. फुलांची भाजीही खूप खमंग व चवदार असते. दिवाळीच्या अखेरीस भारंगीची पाने गळून पडतात. पुढील पावसाळ्यापर्यंत मग भारंगीच्या केवळ काटक्या जीवंत राहतात. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही भारंगी परत हिरवीगार होते.
कार्टुली/करटोली
कार्टुलीला रानकारली असेही म्हणतात. कातळवजा व खडकाळ परिसरात ही रानभाजी सर्वत्र आढळते. कार्टुलीच्या वेलीची पाने, फुले व फळेही कारल्यासारखीच असतात. फळे कारल्यापेक्षा खूप छोट्या आकाराची असतात. हिरवीगार गोमटी कार्टुली बघायलाही छान दिसतात. कोकणातील सर्वच जंगली भागांतल्या खडकाळ भागात ही रानभाजी मिळते. कोकणात या भाजीला काटला व फागूल या नावांनीही संबोधले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच मधल्या काळात जमिनीखाली निद्रिस्त असलेल्या कार्टुलीच्या कांद्यास कोंब फुटतात. साधारण पंधरवड्यातच या कोंबांचे छान वेल तयार होऊन पानाफुलांनी बहरतात. वाढलेले वेल खडकावर किंवा लगतच्या झुडुपावर पसरतात. प्रत्येक पानाच्या देठात एकेक कार्टुलीची छोटी कात तयार होते. आठवडाभरात ती फुलून छान कार्टुली वाढतात. पूर्ण वाढ झालेल्या पण कोवळ्या कार्टुल्यांची भाजी करतात. एका वेलीवर साधारण आठ दहा कार्टुली एका वेळेस मिळतात.
भाजीसाठीची अशी कार्टुली गोळा करण्यासाठी जंगलात थोडी भटकंती करावी लागते. जंगलात फिरताना कार्टुलीच्या वेलावरची आकर्षक पिवळी फुले दुरुनच कार्टुलीच्या वेलाची जागा दाखवतात. हिरवीगार कार्टुली घरी आणल्यावर स्वच्छ धुवून उभी आडवी कापून एका कार्टुल्याच्या साधारण चार फोडी करतात. कार्टुली कोवळी असली तर त्यात बिया नसतात. पण जर बिया असल्या तर त्या काढाव्या लागतात. ज्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी करतो तीच पद्धत कार्टुल्यांची भाजी करण्यासाठी वापरावी. लोखंडी थव्यावर शिजवलेली कार्टुल्यांची भाजी अधिक चविष्ट लागते. मात्र कार्टुली कारल्याप्रमाणे कडवट नसतात. पावसाळ्यात अशा कार्टुल्यांची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. ही भाजी मूत्रविकारांवर अतिशय गुणकारी आहे. केवळ महिनाभरात कार्टुलीची ही फळे तशीच वेलीवर शिल्लक राहिली तर पिकून तयार होतात. पिकलेली कार्टुली लालभडक किंवा भगव्या रंगाची दिसतात. काही पक्षी या पिकलेल्या फळांतील रस व बिया खातात. पुढील पावसाळ्यात या पडलेल्या बिया रुजतात व नवीन वेलींची रोपे तयार होतात. स्थानिक बाजारातही पावसाळ्यात या रानभाजीला खूप मागणी आहे.
अळू( तेरी )
पावसाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी ही लोकप्रिय रानभाजी आहे. उन्हाळ्यात निद्रिस्त असलेल्या तेरीच्या जमिनीत असलेल्या कांदेवजा गुठळ्यांना पावसाळ्याच्या सुरुवातीस कोंब येतात. कोंब जमिनीबाहेर आले की पहिले पान उगवते. गोलाकार आकाराचे लांब देठाला आलेले पान हिरवट काळसर व छान नक्षीयुक्त असते. हे पहिले पान खूडून आणल्यावर स्वच्छ धुतात. कोकणात सर्वत्र सहज उपलब्ध होणारी ही रानभाजी आहे. या भाजीसाठी जंगल तुडवावे लागत नाही. घराजवळच्या पडीक जागेत, पडीक जमिनीत पायवाटेच्या दुतर्फा व शेताच्या बाजूस हे अळू आपोआपच उगवते. देठ व पान खुडून मोकळे केल्यावर देठाची पातळ पापुद्र्यासारखी साल सोलून काढतात. अळू पासून पातळ भाजी, गाठींची भाजी, अळुवड्या करतात. अळूच्या भाजीत निसर्गतःच थोडी खाज असते.
भाजी शिजवताना भाजीत कोकम किंवा चिंच टाकल्यास अशी खाज निघून जाते. अळूची पातळ भाजीही खूप रुचकर व चविष्ट लागते. पातळ भाजीत शेंगदाणे, पावटा, चवळी, चणे किंवा फणसाच्या आठळ्याही सोलून टाकतात. असे काही टाकल्यावर अळुच्या पातळ भाजीची लज्जत अधिक वाढते. पुर्वी कोकणात गरीबीचे प्रमाण जास्त असताना पावसाळ्यात अशा अळूच्या पानांच्या गाठी उकडून त्या पोटभर खात असत. काळसर झाक असलेल्या अळूची घराच्या परसात लागवडही करतात. अशा लावलेल्या अळूच्या अळूवड्या छान व रुचकर असतात. मात्र जंगलात किंवा शेताच्या कडेला पावसाळ्यात आपोआप उगवणाऱ्या अळूची पाने किंचित पोपटी रंगाची व गोलाकार असतात. अशा जंगली अळूला तेरी म्हणतात. ही तेरी अतिशय चविष्ट रानभाजी आहे. पुर्वी तेरीची पाने गुंडाळून त्यांची सुरळी करून त्याची गाठ बांधत अशा गाठी मीठ, मसाला व इतर आवश्यक घटक टाकून शिजवून खात असत. आजही काहीजण अशा अळूगाठी आवर्जून उकडून खातात. पावसाळ्यात सर्वत्र सहज आढळणारी ही रानभाजी आहे. पावसाळ्यात दोन ते तीन महिन्यांपर्यंत अळूची भाजी खाण्यास योग्य असते. पावसाळ्यानंतर या अळूला एक उंच देठाचे आकर्षक फूल येते. फूल कोमेजून सुकल्यावर अळूची पानेही सूकून जातात. अळूचे कंद मग पुढील पावसाळ्यापर्यंत जमिनीत निद्रिस्त रुपात जीवंत राहतात.
शेवरा
शेवरा ही फोडशीप्रमाणे अत्यल्प कालावधीसाठी खाण्यास योग्य असलेली रानभाजी आहे. फोडशीप्रमाणेच शेवऱ्याचे कंद पावसाळ्यापुर्वी जमिनीखाली निद्रिस्त असतात. पावसाळ्याची चाहूल लागताच या कंदाला जमिनीतून एकच सरळसोट कोंब फुटतो. कोंबाच्या टोकावर फुलाच्या पाकळीच्या किंवा केळीच्या बोंडाच्या सोपासारखी एकच पाकळी गुंडाळलेली असते. साधारण एक ते दीड फूट उंचीचा हा कोंब असतो. शेवऱ्याचे फंल पुढच्या दोन ते तीन दिवसांत फुलते. पाकळी उघडून, दुमडून मोकळी झाल्यावर आत एक काठीसारखा निमुळता जाडसर स्रीकेसर असतो. त्याचा रंग पांढरट पिवळसर असतो. हाच भाग शेवऱ्याच्या भाजीसाठी उपयुक्त असतो. शेवरा ही रानभाजी कोकणातील जंगली भागात पावसाळ्याच्या सुरुवातीस सहज उपलब्ध होते. हा वर निमुळता होत जाणारा टोचदार भाग कापंन व स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करतात.
अळुप्रमाणेच या भाजीलाही किंचित खाज असल्याने याची भाजी करताना कोकम टाकतात. त्याप्रमाणे आपण चिकन किंवा मटण मसाला करण्यासाठी पाकक्रिया वापरतो तीच पाकक्रिया वापरून तशीच याची भाजी करतात. शेवऱ्याची भाजीदेखील अगदी मटणासारखीच लागते. पावसाळ्यात सुरुवातीस खाल्ली जाणारी ही अतिशय रुचकर व चमचमीत रानभाजी आहे. शेवऱ्याचे फूल फुलल्यापासून पुढच्या आठवडाभरातच ही भाजी खाण्यास योग्य असते. ही भाजी काढताना संपूर्ण कोंब उपटून काढण्याची गरज नाही. वर उल्लेख केलेला टोकदार निमुळता स्रीकेसरच मोडून किंवा कापून आणावा लागतो. स्रीकेसर तसाच फुलात राहिला तर आठवडाभरानंतर स्रीकेसराचे फलन होऊन बारीक दाण्यांचे साधारण मक्याच्या कणसासारखे फळ तयार होते. दोन तीन दिवसांत हे फळ पिकते. आधी हिरवे असलेले दाणे पिकल्यावर पिवळे लाल होतात. त्यापुढील दोन चार दिवसांत हे फळही कुजून जाते. शेवऱ्याचे असे आयुष्य खूप कमी असते. त्याचा जमिनीखालील कांदा मात्र वर्षानुवर्षे जीवंत राहतो. पावसाळ्यात सुरुवातीस आवर्जून खावी अशी ही शेवऱ्याची रानभाजी आहे.
सुरण
रान सुरण व शेतात लागवड केलेला सुरण असे दोन प्रकारचे सुरण कोकणात सर्वत्र आढळतात. रान सुरण पावसाळ्याची चाहूल लागली की आपोआप उगवतात. घरगुती सुरणाच्या पानांची व कंदाची भाजी करतात. पण रान सुरणाच्या कंदाला खूप खाज असते. दोन्ही सुरणांची झाडे तशी सारखीच दिसत असली तरी घरगुती सुरणाचे खोड व पाने हिरवी व पांढरट असतात, तर जंगली सुरणाचे खोड व पाने हिरवी व काळपट असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस जमिनीखालील मोठ्या कंदांतून एक जाडजूड कोंब उगवतो. साधारण दोन ते अडीच फूट उंचीपर्यंत हा कोंब वाढतो. कोंबाच्या शेंड्यावर गोलाकार पसरलेली लांबट व परस्परांशी संलग्न असलेली पाने येतात. कोंबाच्या शेंड्यावरील तीन ते चार देठांना ही पाने येतात. सुरणाचे झाड छत्रीसारखे भासते. जंगली सुरणाची पाने कोवळी असतानाच कापून व स्वच्छ धुवून ती भाजीसाठी वापरतात. पातळ व सुकी अशी दोन्ही प्रकारची भाजी या पानांची करता येते. या भाजीला खाज असते. त्यामुळे ही भाजी शिजवताना त्यात कोकम किंवा चिंच टाकतात. सुरणाचे कंद खूप मोठेही असतात.
जेवढे सुरणाचे आयुष्य वाढत जाते तसा कंदाचा आकार वाढत जातो. घरगुती व जंगली अशा दोन्ही सुरणाच्या कंदांना कमी जास्त खाज असते. कंदाचा तुकडा स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करतात. कंदाची भाजी करताना त्यात कोकम किंवा चिंच टाकावी लागतेच. पावसाळ्यानंतर सुरणाचे खोड व पाने सुकून नष्ट होतात. मात्र जमिनीतील कंद तसाच निद्रिस्त रुपात जीवंत राहतो. पूर्ण वाढ झालेल्या सुरणाचा कंद पंधरा ते वीस किलोग्रॅम वजनापर्यंत वाढतो. मुळव्याध सारख्या आजारावर सुरणाच्या कंदाची व पानांची भाजी अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते.
कूडा
कूडा ही वनस्पती कोकणात जंगल परिसरात झाडे सर्वत्र आढळून येते.. ही वनस्पती खूप वर्षे जगते. कुड्याचे झाड साधारण तीन ते चार मीटर उंचीपर्यंत वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीस कुड्याच्या झाडावर पांढरीशुभ्र सुगंधी फुले उमलतात. या फुलांचा उपयोग भाजीसाठीही होतो. शेवग्याच्या फुलांची भाजी करण्यासाठी जी पाकक्रिया वापरतात त्याच पद्धतीने कुड्याच्या फुलांची भाजी करतात. किंचित तुरट व कडवट असली तरी ही भाजी चवीला छान लागते. पोटदुखीसारख्या विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. फुले कोमेजून गेल्यावर प्रत्येक फुलाच्या देठास एक याप्रमाणे वाल सारख्या लांब शेंगा येतात. मऊ व कोवळ्या शेंगा भाजीसाठी वापरतात. जंगलातून अशा कोवळ्या शेंगा तोडून आणल्यावर स्वच्छ धुतात. त्यामुळे शेंगाना चिकटलेला चिकही निघून जातो.
या शेंगा कापल्यानंतर त्यांच्यातील कडवटपणा जाण्यासाठी त्या काही वेळ मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात. नंतर या शेंगा घट्ट पिळून त्याची भाजी करतात. मीठाच्या पाण्यात पिळल्याने त्यांच्यातील कडवटपणा जातो. फुलांच्या भाजीप्रमाणेच किंचित कडवट लागणारी भाजी तशी चविष्ट असते. लहान मुलांनी ही भाजी खाल्ली तर पोटात जंत होत नाहीत. पोटदुखीप्रमाणेच तापासारख्या आजारावरही कुड्याच्या शेंगांची भाजी अतिशय गुणकारी आहे. वर्षातून एक दोनदा कुड्याच्या शेंगांची व फुलांची रानभाजी अवश्य खावी. या शेंगा पुढे परिपक्व होऊन तडकून फुटतात. या तडकलेल्या शेंगांमधून म्हातारीच्या केसांसारख्या बिया वाऱ्याबरोबर दूरवर उडत जातात.
अळंबी
कोकणात पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. पावसाळ्यात साधारण श्रावण महिन्यातील पुष्प नक्षत्रात टपोऱ्या थेंबांच्या पावसात ही अळंबी उगवतात. जंगल परिसरात अशी अळंबी आपोआप उगवतात. अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात अशी पांढरीशुभ्र अळंबी उगवतात. मात्र अळंबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात. कारण किंचित पिवळसर, पिवळीधमक, किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात. विषारी अळंबी खाणे आरोग्यास धोकादायक आहे. मोकळ्या रानात अंतरा अंतरावर उगवलेली अशी अळंबी गोळा करण्यासाठी जंगलाचा परिसर पायी तुडवावा लागतो. काही ठिकाणी वारुळावरही अशी खूप अळंबी येतात. वारुळावर उगवलेली अळंबी वारुळातील नाग खातो असा गैरसमज आहे. मात्र नाग अशी अळंबी कधीही खात नाही. एकदा उगवण्यास सुरुवात झालेली अळंबी आठवडाभर उगवत राहतात. सकाळी लवकर व संध्याकाळी ही अळंबी उगवतात. अळंबी शोधण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी रानात जावे लागते. उगवलेली अळंबी दिवसभर तशीच राहिली तर पाऊस पडल्याने खराब होतात. याशिवाय बारीक काळे भुंगे अशी अळंबी पोखरतात.
अळंबी मातीतून उगवत असल्याने त्यांना माती लागलेली असते. सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळंबी नंतर पूर्ण उमलल्यावर छत्रीसारखी दिसतात. घरी आणलेली अळंबी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर कापून त्याच्या फोडी करतात. कांदापातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळंबीभाजी करतात. अळंबी भाजीत खाज नसली तरी शिजवताना कोकम टाकण्याची पद्धत आहे. सुकी कोलीम टाकूनही अळंबीची छान रुचकर भाजी होते. लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबीची भाजी अधिक रुचकर लागते.
घोळ
ही रानभाजी असली तरी जंगल परिसराप्रमाणेच शेतातही आढळते. शेतात, शेताच्या बांधावर ओलसर जागेत ही रानभाजी आपोआप रुजते. बारीक गोलाकार व फुगीर पाने असलेले हे रोपटेवजा छोटेसे झाड असते. एकाच मुळाला अनेक फांद्या फुटून त्या जमिनीलगत पसरत व वाढत जातात. घोळीच्या फांद्या खुडून त्यांची पाने शेवग्याच्या टाळ्यांप्रमाणे ओरबाडून घेतात. पाने स्वच्छ धुवून ती बारीक कापून किंवा न कापताही त्यांची भाजी करतात. लोखंडी तव्यावर कांदापातीच्या भाजीसारखी घोळीची भाजी करतात. या भिजीत सुकी कोलीम टाकली तर ही भाजी अधिक रुचकर लागते. शेतात वर्षभर ओलसरपणा असेल तर वर्षभर ही रानभाजी उपलब्ध होते. घोळीची भाजी आवडीने खाणाराही खवय्यांचा एक खास वर्ग आहे. कोणत्याही जास्त मेहनतीशिवाय अगदी सहज उपलब्ध होणारी ही रानभाजी आहे.
बांबूचे कोंब
कोकणात सर्वत्र बांबूची झाडे आढळतात. जंगली भागातही अनेक ठिकाणी बांबूची झाडे दिसतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस बांबूच्या बेटात नवे कोंब उगवतात. साधारण फूटभर उंचीचे कोवळे कोंबच भाजी करण्यासाठी उपयुक्त असतात. हे कोंब त्यापेक्षा अधिक वाढले की, त्यांचा भाजीसाठी उपयोग होत नाही. वर टोकदार सालींनी गुंडाळलेले कोवळे कोंब मुळाशी कापून भाजीसाठी आणतात. हे कोंब सोलून आतला पांढरट गर तासून भाजीसाठी वापरला जातो. या कोवळ्या नाजूक गराच्या बारीक फोडी करून त्याची भाजी केली जाते. काही वेळेस हा गर किसणीवर किसून त्याच्या किसाचीही भाजी केली जाते. ज्याप्रमाणे आपण चणे, वाटाणे यांची उसळ करतो त्या पद्धतीने या गरांची पातळ भाजी होते. किसलेल्या गराची सुकी भाजी करतात. आम्लपित्ताच्या अनेक विकारांवर ही भाजी गुणकारी आहे. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीस पंधरवडाभर अशी बांबुच्या कोंबांची भाजी करण्यास योग्य असते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी अशा बांबुंच्या कोंबांची भाजी अवश्य खायला हवी.
पावसाळ्यातील रानभाज्या ही निसर्गाची अनमोल देणगीच आहे. बहुसंख्य रानभाज्या आरोग्यास हितकारक व विविध विकारांवर गुणकारी आहेत. याशिवाय या सर्व रानभाज्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. कोणत्याही रासायनिक खताशिवाय वाढलेल्या अशा नैसर्गिक रानभाज्या आपण पावसाळ्यात अवश्य खायला हव्यात.
रानभाज्यांचे महत्त्व सांगताना पोलीतील वैद्या सौ. पौर्णिमा कुलकर्णी (आयुर्वेद – पदवीधर)
खूप छान उपयोगी माहिती दिली आहे ….मी पण नाशिक , पेठ कडील रानभाज्या माहिती लीहाली आहे नक्की वाचा
खूप छान