पावसाळा सुरु झाला, की कोकणात सुरुवात होते भात शेतीची. कोकणी माणूस कोकणाबाहेर गेला, त्याला शेतीची ओढ नाही, सगळ्या शेतजमिनी पडीक आहेत अशी जागोजागी वाच्यता आणि ओरड होत असली तरी, कोकणात हिंडल्यावर भातशेती आजही किती मोठ्या प्रमाणावर चालते हे लक्षात येईल. गुंठ्या-गुंठ्याच्या जमिनीतून पिकवला जाणारा हा भात दुकानावार्र विक्रीस जात नसेल; पण त्या घराची वर्षभराची रसद म्हणून हमखास राहतो. कोकणी माणसाच्या दृष्टीने तांदूळ म्हणजे लाल मातीत पिकणार पांढर सोनं आहे. आणि हे सोनं आजही पारंपारिक पद्धतीने पिकवलं जातं. आपल्या दापोली तालुक्यातील चित्र देखील हेच आहे. रोहिणी नक्षत्र लागले, की गुडघाभर चिखलात उतरून नांगर हाती धरला जातो. हा नांगर हाती धरलेला असताना किंवा भात लावीत असताना गाणी गायली जातात. विशेषतः भात लावणी करणाऱ्या स्त्रियांकडून. कानाला टोपरं, अंगावर घोंगडी आणि डोक्यावर इरलं घेऊन भरपावसात भात लावताना पिढीजात ऐकिवात आलेली पारंपारिक गाणी आनंदान म्हटली जातात. ही गाणी जात्यांवरल्या ओव्यांप्रमाणे आहेत. जिथे जन्म घेतात, तिथेच संपतात. या गाण्यांमधून देखील स्त्रिया आपल्या इच्छा, आकांशा आणि घुसमट पूर्वी व्यक्त करीत होत्या. खरं पाहिलं तर ही गाणी म्हणजे मराठीतील मौखिक साहित्य आहे. मराठीतील अस्सल वाङ्मय आहे. आपल्या महाराष्ट्राची आणि देशाची कलासंस्कृती आहे. आधुनिकीकरणाच्या ओघात या गोष्टी कुठे हरवणार नाहीत याची आपण जरूर काळजी घेतली पाहिजे.
दापोलीत आता सगळीकडे भात लावणी पूर्ण झाली आहे. भात लावणी करणाऱ्या एका शेतकऱ्याला दिलेली भेट-