दापोलीची जडणघडण (स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर)

2
2385

कालखंड १८१८ ते १९३०

सन १८१८ पासून कोकणात ब्रिटीश अंमल सुरु झाला. तेव्हा दापोली येथे मोठे लष्करी ठाणे स्थापन करण्यात आले. या वसाहतीस कॅंप दापोली नाव पडले. त्याचेच रुपांतर पुढे काप दापोली म्हणून झाले. गिम्हवणे, जोगेळे, जालगांव व मौजे दापोली या खेड्यांच्या जमिनीतून कॅंप दापोली क्षेत्र वसविले गेले. दापोली हे थंड हवेचे ठिकाण. शिवाय चातुर्सिमेला जंगल, निसर्ग उत्पन्नाची श्रीमंती, शूर माणसाचं मनुष्यबळ, रसदगोटा-दारुगोळा मिळवण्यास सोयीस्कर आणि हर्णे, दाभोळ, मुरुड या किनारपट्टींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोक्याचे, त्यामुळे इंग्रजांनी दापोलीची निवड केली.

त्याकाळात सैन्य अधिकारी व सैन्यासाठी वस्तिस्थाने उभी राहू लागली. तंबू, कोठारे, युद्ध सरावासाठी मैदाने या दृष्टीने भूखंड विकसित होऊ लागले. दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी छोटो-छोटी दुकाने उघडू लागली. प्रशासनाच्या इमारती, न्यायालय, दवाखाना, चर्च, फॅमिली माळ अनेक गोष्टी स्थापन झाल्या. रोजगार मिळू लागल्याने आसपासचे लोक दापोलीत येऊ लागले. सुमारे ३००० ते ५००० असलेली लोकसंख्या १,५०,००० पर्यंत गेली. त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीची म्युन्सिपाल्टी झाली. १८४० मध्ये खालच्या श्रेणीतील लष्करी तुकड्या दापोलीतून इतरत्र हलविण्यात आल्या. आणि फक्त जुन्या, अनुभवी सैनिक-अधिकाऱ्यांची पलटण ठेवण्यात आली. १८५७ साली ही पलटण पण काढून घेतली गेली. पुढे १९४७ पर्यंत ब्रिटीश अंमल चालू राहिला. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रशासनाचा भाग म्हणून दापोली तालुका मुंबई इलाका ( Bombay province ) मध्ये समाविष्ट होता.

१८७८ मध्ये मिशनरी म्हणून आलेल्या आल्फ्रेड गॅडने यांनी १८७९ साली S.P.G मिशन संस्थेची दापोलीत इंग्रजी शाळा सुरु केली. व तेच मुख्याध्यापक होते. म्हणून त्या शाळेला मिशन स्कूल किंवा गॅडने स्कूल म्हणत. त्याच दरम्यान काही काल दापोलीत इंग्रजी शिक्षण देणारे ‘गोगटे हायस्कूल’ होते. मिशन स्कूलच्या पश्चिमेस श्री. बर्वे यांच्या जागी १ ते ४ इयत्तेची राष्ट्रीय शाळा देखील होती. परंतु या दोन्ही शाळा काही वर्षच चालल्या. मिशन स्कूल १९२८ पर्यंत सुरु होते. त्यानंतर ही शाळा मिशन संस्थेकडून दापोली शिक्षण संस्थेने आपल्या ताब्यात घेतली. व ती आता एक नामांकित शाळा म्हणून प्रसिद्धीस आहे. आल्फ्रेड गॅडने यांचेच नाव या शाळेस आहे. याच A.G. स्कूलमध्ये डॉ. पा.वा.काणे, रँग्लर परांजपे, खगोलशास्त्रज्ञ श. बा. दीक्षित, पूज्य साने गुरुजी यासारख्या जगद्विख्यात विद्वानांनी शालेय शिक्षणाचे धडे गिरवले.

ब्रिटीशांची वसाहत दापोलीत येण्यापूर्वी दापोली गावचा फारसा इतिहास आढळत नाही. ब्रिटीश शासनाने १८२० पासून दापोली गावचा समावेश रत्नागिरी जिल्ह्यात केला होता. १८३२ मध्ये जिल्ह्याचे पाच तालुके अस्तित्वात आले. त्यावेळी दापोली गाव सुवर्णदुर्ग तालुक्यात समाविष्ट होते. तालुक्याचे मुख्यालय हर्णेच्या गोवा किल्ल्यात होते. १८६२ मध्ये तालुक्याचे मुख्यालय दापोली येथे हलविण्यात आले. १८६८ मध्ये तालुक्याची पुनर्रचना होऊन दापोली वेगळा तालुका झाला. त्यात दापोली हे गाव होते. पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत दापोली गावात फारसा बदल झाला नाही.

१८५७ ते स्वातंत्र्यापर्यंतचा दापोलीचा कालखंड अलौकिक बुद्धिमत्ता, चिकाटी व प्रतिभा असलेल्या लोकांचा होता. या काळातील नररत्नांनी तर संपूर्ण भारताच समाजजीवन ढवळून काढलं. महर्षी कर्वे, डॉ. पा.वा.काणे, रँग्लर परांजपे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी या युगपुरुषांच्या कार्याला जग नतमस्तक आहे. शिवाय खगोलशास्त्रज्ञ श. बा. दीक्षित, सुधारक र.धो.कर्वे, कोशकार य.रा.दाते, व्याकरणकार रा.भी.जोशी, साहित्यिक श्री.ना.पेंडसे, कवि केशवसुत अशा अनेक मंडळींमुळे समाज सर्वांगाने समृद्ध झाला. या काळात वीज, पाणी, रस्ते, दळणवळण या सुविधांचा अभाव असेल; परंतु सुदृढसमाज पोषक विचारांचा आणि इच्छाशक्तीचा अभाव अजिबात नव्हता. समाजाला परिवर्तनाची योग्य आणि क्रांतिकारक दिशा लाभलेली.

कालखंड १९३० ते १९९०

गांधीपर्व सुरु झाल्यानंतर ब्रिटीश विरोधी लढा जोरात उभा राहिला. यात दापोली जराही मागे नव्हती. साने गुरुजी, सेनापती बापट, आप्पासाहेब पटवर्धन, विनोबा भावे यांनी गांधीनिष्ठा जपली व यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा फाटक, चंदूभाई मेहता, सुडकोजी खेडेकर, शिवराम मुरकर, पुरषोत्तम मराठे यांसारखे अनेक स्वातंत्र्यसेनानी उभे राहिले. ब्रिटीश विरोधी लढा व निष्काम समाजसेवा असे दोन दोर धरून सगळ्यांचा जीवनप्रवास चाललेला. म्हणून दापोलीला गांधी, नेहरू, सावरकर, जयप्रकाश नारायण या थोरांचा पदस्पर्श झाला.

स्वातंत्र्य लढ्यात दापोलीच योगदान मोठ होतं. म्हणूनच ब्रिटीशांनी जाण्यापूर्वी (१९४२ ला) येथील ग्रंथ संपदा जाळून टाकली. त्यात बराचसा इतिहास नष्ट झाला.

ब्रिटीश गेल्यानंतर दापोलीची लोकसंख्या मोठी घसरली. पारंपारिक चालत आलेली चाकरी बंद पडली. लोक पोट भरण्याची नवीन सधन व्यवस्था शोधू लागले. त्यातूनच खेळ, कला, व्यवसाय व अन्य विविध क्षेत्रांमध्ये गेले. निपुण झाले. चिवट जाती व्यवस्था थोडीशी ढिली झाली. शैक्षणिक गरज लोकांच्या लक्षात येऊ लागली. १९४७ साली कुणबी सेवा संघाच वसतिगृह व १९५० साली नवभारत छात्रालय दापोलीत सुरु झालं. अप्पासाहेब पटवर्धन आणि सामंत गुरुजी यांनी सुरुवात केलेली पुढे शिंदे गुरुजी, शामराव पेजे, शैलाताई मंडलिक व बाबूरावजी बेलोसे यांनी छात्रालयाच्या वाढीस हातभार लावला.. २१ जून १९६५ रोजी कृषी महाविद्यालय दापोलीत स्थापन झाले. विद्यार्थ्यांची वसतिगृहे बांधली गेली. प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्गासाठी निवासस्थाने बांधली गेली. १९६८ ला बाबूरावजी बेलोसे व इतर काही मंडळीच्या प्रयत्नाने दापोलीत एस.टी. आगार तयार झाले. १८ मे १९७२ रोजी कोकण कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठामुळे दुकाने, व्यापार, वाहतूक, नवीन घरे सगळ्यात वाढ झाली. इतरही शिक्षणसंस्था वाढू लागल्या. १९७४ साली एन.के.वराडकर आणि आर.वी.बेलोसे महाविद्यालयाची स्थापना झाली. १९७६ साली पहिला संगणक दापोलीत आला. १९९० च्या दरम्यान हर्णे, मुरुड, आंजर्ले ही पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्धीस आली. या सर्व ठिकाणी जाण्यास दापोली गाव मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे दापोली पर्यटन नकाशावरही मोठ्या अक्षरात दिसू लागले. महाराष्ट्र शासनाने २६ मार्च १९९० रोजी कॅंप दापोली गाव व जागोळे ग्रामपंचायत जोडून ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर केले.

संदर्भ :

  • प्रा. डॉ. विजय अनंत तोरो
  • प्रा. सतीशचंद्र तोडणकर
  • स्मरणगाथा – साथी चंदुभाई मेहता
  • स्वातंत्र्य सैनिक स्मरणिका
  • श्री.बाळकृष्ण पाठक (वराडकर व बेलोसे महाविद्यालय ग्रंथपाल)
  • डॉ. सुरेश खेडेकर (दापोलीतील मा.आ.सुडकोजी खेडेकर यांचे सुपुत्र)
  • श्रीमती. विजया इंगळे (दापोलीतील मा.आ.सुडकोजी खेडेकर यांच्या सुकन्या)
  • श्रीमती. शांता सहस्रबुद्धे (दापोलीतील समाजसेविका)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here