मुरुडमधील बंडू काका उर्फ वसंत जोशी गेली चाळीस वर्षे पाणी पारखी म्हणून दापोलीत कार्य करीत आहेत. आज ते ७९ वर्षांचे आहेत. बंडू काकांचा जन्म मुरुडमधेच, २६/६/१९३९ या तारखेचा. बंडू काका त्यांच्या बारा भावंडांपैकी तिसरे. आई-वडिल लवकर निवर्तल्यामुळे परिस्थितीच्या भारापायी त्यांना अधिक शिक्षण घेता आले नाही. परंतु मराठी माध्यमातून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
एके दिवशी अत्यंत जुने, जीर्ण झालेले इतिहासकालीन एक पुस्तक त्यांच्या हाती लागले. त्या पुस्तकात भूगर्भातील पाणी कसे शोधावे? विहीरी कशा तयार कराव्यात? या संदर्भात माहिती होती. अभ्यासाची आवड असल्याकारणाने बंडू काकांनी ते पुस्तक कसेबसे सुधारून त्यातील काही पाने वाचली व पाणी शोधण्याचा ध्यास घेतला. त्यानुसार त्यांनी भूगर्भ स्तर, त्या आतील जलवाहिन्या, वनस्पती, प्राणी, दिशा यांविषयी अभ्यास सुरु केला.
प्रथम स्वगावी आणि मग हळूहळू इतर ठिकाणी त्यांनी आपलं हे शिक्षण तपासून पाहिलं आणि त्यात ते पारंगत झाले. आता अनेक ठिकाणचे लोक त्यांना पाणी पारखी म्हणून बोलावतात. अगदी इतर जिल्ह्यांतून देखील. बंडू काका केवळ ‘तांब्याची तार व होकायंत्र’ च्या सहाय्याने पाणी शोधतात. तांब्याची तार बोटाला बांधली असता जमिनीतून येणाऱ्या संवेदना जाणवतात त्या अचूक ओळखता आल्या की पाणी शोधता येते असे ते सांगतात.
जुन्या काळच्या व आजच्या पाणी शोधण्याच्या किंवा विहीरी पडण्याच्या तंत्रात पुष्कळसा भेद आहे. हा भेद स्पष्ट करताना ते म्हणतात की जुन्या काळी हिरडा, बेहडा, अव्वळकाठी याचा लेप दगडावर टाकून दगड फोडला जात असे. यामुळे सुरुंगाने दगड जसा विचकतो तसा विचकत नाही. दगडाला अधिक भेग पडत नाही. त्यामुळे पाणी झिरपले जाऊ शकत नाही. शिवाय जी हल्ली पाणी शोधण्याची यंत्रे आहेत ती केवळ पाण्याची दिशा शोधतात जलवाहिनी नाही. (माणसाच्या धमन्यांप्रमाणे जमिनीलाही अंतर्गत गोड्या, खारट पाण्याच्या जलवाहिन्या असतात. त्या अचूक शोधनं महत्वाचं असतं.) सध्या विहीरी, बोअरवेलचे प्रमाण वाढत आहे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी घटत आहे यावर चिंता व्यक्त करताना बंडू काका सांगतात जमिनीतील पाणी वाढवण्याचा केवळ एकमेव मार्ग आहे डोंगराळ भागापासून खालपर्यंत जेवढी शेतजमीन आहे तिथे शेती झाली पाहिजे, तरच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटणार नाहीत. आज दापोलीत असलेल्या जवळपास ७० टक्के विहीरी जोशी काकांच्या मदतीने झाल्या आहेत. अनुभवी पाणी पारखी म्हणून त्यांना जवळपास संपूर्ण दापोली ओळखते.
need pani parkhi joshi kaka address