एकांडा शिलेदार – र.धो.कर्वे

1
3431

लोकसंख्या वाढ, लैंगिक समस्या ही भविष्य काळातील संकट ज्याने आपल्या द्रष्टेपणाने खूप आधीचं जाणली आणि यावर मात करण्यासाठी भरीव कार्य केलं; तरीही कायम उपेक्षितच राहिला, असा महाराष्ट्राच्या सुधारकी परंपरेतही एकटा पडलेला सुधारक म्हणजे, ‘रघुनाथ धोंडो कर्वे.’R D Karve

रघुनाथ कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ सुपुत्र. त्यांचा जन्म दापोली तालुक्यातील मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथेच झाले. पुढे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून १८९९ मध्ये प्रथम क्रमांकाने मॅट्रिक झाले. १९०४ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून बी,ए. झाले. गणित विषयात त्यांनी एम.ए.केले. नंतर पॅरिसमध्ये वास्तव्य करून फ्रान्स विद्यापीठाची गणितातील पदविका प्राप्त केली. नंतर सोलापूर हायस्कूल(१९०३), एल्फिन्स्टन कॉलेज(१९०८ ते १९१७), कर्नाटक कॉलेज(१९१७-१९), गुजराथ कॉलेज(१९२१), विल्सन कॉलेज, मुंबई(१९२२-२५) अशा विविध ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले. विल्सन कॉलेजमधील नोकरी करतांना कर्वे कुटुंबनियोजन, लोकसंख्येला आळा, लैगिंक समस्या याबद्दल लेखन व व्याख्यानाद्वारे प्रचार करू लागले. कॉलेजच्या व्यवस्थापनेला ते मान्य होईना. नोकरी हवी असेल तर हे कार्य तुम्हाला करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. रघुनाथ कर्वेंनी आपल्या ध्येयाशी, विचारांशी तडजोड होऊ दिली नाही. त्यांनी नोकरी सोडली. तेथून पुढे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत या माणसाने संततीनियमन प्रसाराचे फार मोलाचे कार्य केले. ज्या काळात संततीनियमनाविषयी साधा उच्चार करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात या विषयाचा प्रचार करण्याचा अट्टहास कर्वेंनी धरला.

१९२३ मध्ये त्यांनी ‘संततीनिमयन विचार आणि आचार’ हे पुस्तक लिहिले. ‘गुप्तरोगापासून बचाव’ ‘आधुनिक कामशास्त्र’ इत्यादी ग्रंथ लिहिले. १९२७ मध्ये त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरु करून मृत्यूपर्यंत(१४ ऑक्टोबर१९५३) चालवले.या मासिकातून त्यांनी लैंगिक शिक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मासिक तोट्यात जात होते पण स्वतःचा पदरमोड करून त्यांनी हे मासिक चालवले. ‘आधुनिक कामशास्त्र’ (१९३४), ‘आधुनिक आहारशास्त्र’ (१९३८), ‘वेश्याव्यवसाय’ (१९४०) ही त्यांची शास्त्रीय विषयांवरील पुस्तके. ‘पॅरीसच्या घरी’(१९४६) आणि ‘तेरा गोष्टी’(१९४०) हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे.

रघुनाथरावांच आयुष्य म्हणजे एक दारूण शोकांतिका. कारण दारिद्र्य, तिरस्कार, उपेक्षा, कुचेष्टा या पलिकडे त्यांच्या वाट्याला दुसरं काहीचं आल नाही. तरीही त्यांच्या पत्नीने (मालतीबाई) त्यांना शेवटपर्यंत या कार्यात मदत केली. शिवाय डॉ.आंबेडकर, रियासतकार सरदेसाई, रँग्लर परांजपे आणि मामा वरेरकर अशी काही मोजकीचं माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ते कायम प्रवाहाविरुद्ध पोहत राहिले. त्यात त्यांना तडाखे बसले, ते हरले; पण मोडून पडले नाहीत.

खरं तर र.धो. चं कार्य म्हणजे एक आधुनिक भूमिका होती. जी समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि प्रगल्भतेसाठी घेतलेली. त्यामागे विज्ञानाची आणि वैद्यकीय शास्त्राची बैठक होती. हे एक महान देशकार्य होतं. जे भारतीय समाज उभारणीसाठी अत्यावश्यक होतं. त्यामुळेच अलिकडच्या काळात त्यांच्या कार्याचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख होत आहे.

संदर्भ:- विजय तोरो (परिचित अपरिचित दापोली तालुका)

जयंत पवार यांचा लेख. (महाराष्ट्र टाईम्स)

मयुरेश कोण्णूर यांचा लेख. (बीबीसी मराठी)

Previous articleदापोलीचे सर्पमित्र – सुरेश खानविलकर
Next articleगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार
कु. सतीश शिरीष भोसले. २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्याची बी.ए.ची पदवी प्राप्त. २०१० पासून ‘प्रेमाचा अर्थ कळू दे’, ‘भटकंती’, ‘मनातला क्रांतिकारी’, ‘सेर सिवराज’, ‘पुडकं’, ‘परमपूज्य बाबसाहेब’ अशा अनेक कवितांचे लेखन. २०१४ मध्ये ‘अबोध’ या लघुपटासाठी पटकथा व संवाद लेखन. २०१४ ते २०१७ ‘एक चुंबनाची गोष्ट’, ‘जीवश्च कंठश्च’, ‘ऑफिसची पहिली पार्टी’, ‘वस्त्रधारण’, ‘मोबाईल’, ‘पेच’, ‘फेसबूक’, ‘सेल्फी’, ‘हर्षा भाभी’, ‘योगायोग’, ‘आमचा कॅप्टन’ या लघुकथांच लेखन. २०१७ पासून ‘मोठ्या जगातल्या छोट्या गोष्टी’ या नावाखाली ब्लॉग लेखन.

1 COMMENT

  1. द्रष्टा समाजशास्त्री पण सुमारबुध्दी कुपमंडुक साधनसुचिता परंपरवादी व दांभिक सुसंस्कारवादी मान्यतावादीनी यांना दुर्लक्षीत करून स्वहस्ते जो कुठाराघात करून घेतला आहे त्याने धर्म राष्ट्र समाज व सामाजीक सुरक्षितता व सुदृढता यांची संपूर्ण तफावत अस्तित्वाचाच घात करत आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here