ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित

0
1683

मानवाला सुरवाती पासूनच आकाशातील चंद्र, सूर्य, तारे इत्यादी विषयी जिज्ञासा होती. या जिज्ञासेतूनच ज्योतिषशास्त्राचा उगम झाला. याच शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका विद्वानाचा जन्म आपल्या दापोली तालुक्यातल्या मुरुड गावातला आहे. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म आषाढ शुद्ध १४, शके १७७५ म्हणजेच २०/२१ जुलै १८५३ रोजी झाला. गावचे उपाध्येपण घरात असल्याने घराण्यास उचित असे अनेक वैदिक विषय, अमरकोश, काव्यव्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयांचा अभ्यास लहानपणीच झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड इथल्या मराठी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी २ वर्षे दापोली कोर्टात नोकरी केली. याच काळात त्यांनी इंग्रजी शिकण्यास सुरवात केली. १८७० मध्ये त्यांनी पुण्यातील ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच दरम्यान बाबा गोखले ह्यांनी सुरु केलेल्या इंग्रजी शाळेत त्यांनी इंग्रजीचा अभ्यास सुरु ठेवला. १८७४ मध्ये त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा दिली त्याच वर्षी ते ट्रेनिंग कॉलेज मधून पहिल्या वर्गातून उत्तीर्ण झाले.


१८७४ मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरवात केली. १८७४-८० ह्या कालावधीत ते रेवदंडा येथे शिक्षक तर १८८०-८२ ह्या काळात ठाणे येथील मराठी शाळेत मुख्याध्यापक होते. १८८२-८९ या दरम्यान ते बार्शी येथील इंग्रजी शाळेत शिक्षक होते. १८८९-९४ ह्या काळात ते धुळ्यातील ट्रेनिंग कॉलेज वर शिक्षक होते. १८९४ नंतर ते पुण्यातील ट्रेनिंग कॉलेजला शिकवायला लागले. अनेकजण नोकरीच्या चक्रात अडकतात त्यामुळे त्यांना एक विषय हाती घेऊन त्यात प्राविण्य मिळवता येत नाही पण ह्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले ज्ञान वाढवले पाहिजे असा विचार दीक्षित यांनी केला. त्यांच्या रोजनिशीत त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे नाहीतर ‘काकोsपि जीवति’ अश्या प्रकारचे उद्गार नमूद केलेले आढळतात.
अश्या प्रकारे एक विषय धरून प्राविण्य मिळवण्यात त्यांनी ज्योतिषशास्त्र हा विषय निवडला. दीक्षित रेवदंड्यास असताना वर्तमानपत्रात ‘स्फुटवक्ता अभियोगी’ या नावाने कै.विसाजी लेले सायनवादावर लेख लिहित असत. ते वाचून दीक्षित ह्यांचे लक्ष ज्योतिषशास्त्राकडे वळले. पुढे ठाण्यात त्यांची गाठ कै. जनार्दन बाळाजी मोडक ह्यांच्याशी पडली. या दोघांनी मिळून ज्योतिषसंबंधाने अनेक उद्योग सुरु केले त्यामुळे दीक्षित यांचा ज्योतिषाचा अभ्यास वाढीस लागला. मोडक यांस ज्योतिषाची खूप माहिती होती परंतु त्यासाठी लागणारे गणित मात्र दीक्षित करत असत. या दोघांसोबत कै. लेले एकत्र आले व तिघांनी मिळून सायनमानावर आधारित पंचाग सुरु केले. हे पंचाग ठाण्यातील अरुणोदय ह्या नियतकालिकात प्रसिद्ध होत असे.

दीक्षित यांनी ज्योतिषशास्त्रावर आधारित सखोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. ज्योतिषशास्त्र सामान्य लोकांना समजावे ह्यासाठी त्यांनी ‘ज्योतिर्विलास’ अथवा ‘रात्रीची २ घटका मौज’ हे पुस्तक लिहिले. कोणत्याही शास्त्राबद्दल इत्यंभूत पण सोप्या भाषेत माहिती देणारा ग्रंथ मराठीत ह्या आधी झाला नाही असा अभिप्राय लोकमान्य टिळकांनी ह्या ग्रंथाबद्दल दिला होता. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरु केल्यापासूनच त्याच्या इतिहासाबद्दल त्यांना जिज्ञासा होती. ही जिज्ञासा मिटवण्यासाठी त्यांनी असंख्य ग्रंथांचे वाचन केले आणि त्यानंतर ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ अथवा ‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात भारतीय ज्योतिषाचा वेद काळापासून १९ व्या शतकापर्यंतचा इतिहास आहे. ह्या ग्रंथात भारतीय समाजाची ज्योतिषविषयक मते काय होती? ती कशी बदलत गेली? भारतीय व अर्वाचीन पाश्चात्य ज्योतिष्यांच्या मतांमध्ये काय साम्ये व भेद होते? पंचाग कसे तयार करतात? निरनिराळ्या पंचांगांचे गुणदोष इत्यादी विषयी सखोल लिहिलेले आहे. सदर ग्रंथास बडोद्याचे गायकवाड सरकार व दक्षिणा प्राइज कमिटी सारख्या मोठ्या संस्थांकडून पारितोषिक मिळाले आहे.


दीक्षित यांचे ज्योतिषशास्त्रातले महत्वपूर्ण योगदान कालगणना, का लनिर्णय ह्या क्षेत्रात दिसून येते. ‘इंडियन अँटीक्वेरी’ व ‘इपिग्राफिका इंडिका’ ह्या इंग्रजी मासिकातून ते ह्याविषयी लेख लिहित असत. शतपथ ब्राह्मणामधल्या एका ऋचेत कृतिका पूर्वेस उगवतात व अजिबात मावळत नाहीत असा उल्लेख आहे. या वर्णनावरून गणित करून दीक्षित यांनी शतपथ ब्राह्मणांची कालनिश्चिती केली आहे. त्याचप्रमाणे पहिल्या आर्यसिद्धांत केव्हा लिहिला गेला असावा हे एका निबंधात नमूद केले आहे. बऱ्याच युरोपिअन विद्वानांच्या अडचणी दूर करून कालनिर्णयासंबंधी शंका निवारण ते करत असत. ‘गुप्तांचे शक’ या पुस्तकाचे लेखक डॉ. फ्लीट यांनी त्यांच्या पुस्तकात दीक्षितांच्या मदती शिवाय गुप्तांचा शककाल निश्चित करता आला नसता असे लिहिले आहे. हे काम सोपे होण्यासाठी, भारतात सापडणार्या शिलालेखात, ऐतिहासिक पत्रात इत्यादी कागदपत्रात दिलेल्या दिवशी नेमकी इंगजी तारीख कोणती होती व तो खरा तोच दिवस होता की नाही हे ठरवण्यासाठी, दीक्षित यांनी रॉबर्ट सेवेल यांच्या सोबत इंडियन कॅलेंडर हा इंग्रजी ग्रंथ लिहिला.

ज्योतिषशास्त्र सोडून देखील त्यांनी काही ग्रंथरचना केली. ‘भारतवर्षीय भूवर्णन’ हा त्यातील एक महत्वाचा ग्रंथ. या पुस्तकात वेद, पुराणे व इतर प्राचीन ग्रंथ ह्या मधून ज्या स्थळांचा उल्लेख होतो ती सध्या कोणत्या नावाने ओळखली जातात याचे दिग्दर्शन केले आहे. दीक्षित मुळात शिक्षक असल्याने त्या अनुषंगाने देखील त्यांनी लिखाण केले. ‘विद्यार्थीबुद्धीवर्धिनी’ या पुस्तकात त्यांनी तत्कालीत मराठी पुस्तकातील कवितांवर माहितीपूर्ण टीका लिहिली आहे. शिक्षकांनी कविता कश्या शिकवाव्यात व विद्यार्थ्यांनी त्या कश्या शिकाव्यात याबद्दल पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन पब्लिक सर्विस परीक्षेत सृष्टीज्ञान हा विषय असे. त्याच्या अभ्यासात उपयोगी असे ‘सृष्टचमत्कार’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. याच धर्तीवर अंकगणित विषयावर देखील त्यांनी ग्रंथ लिहिला. शिक्षक म्हणून देखील त्यांची चांगलीच ख्याती होती. ते सर्व विषय विद्यार्थ्यांना कळतील अश्या सोप्या भाषेत शिकवायचे. रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना ते ग्रह तारे इत्यादी विषयी देखील माहिती देत असत. ‘विद्यार्थ्यास शिकवणे म्हणजे केवळ परीक्षेसाठी तयार करणे नाही तर त्याला सुशिक्षित गृहस्थ बनवायचे’ हे त्यांचे तत्व होते. गुप्तांचे शक ग्रंथाचे लेखक डॉ. फ्लीट यांनी दीक्षित यांना महसूल विभागात मामलेदार पद देऊ केले होते पण त्यांनी विद्याव्यासंग थांबेल म्हणून हे पद नाकारले.

बालविवाहाला त्यांचा सक्त विरोध होता. आपल्या मुलांची लग्न १८ वर्ष पूर्ण व मुलींची लग्न १२ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती व समाजाचा व कुटुंबीयांचा विरोध न जुमानता पूर्ण केली.

प्रख्यात ज्योतिषी असले तरी दीक्षित यांचा फलज्योतिषावर विश्वास नव्हता. वर्षफलाने काही गोष्टी जुळतात तर काही जुळत नाहीत, अश्यात ज्योतिषशास्त्र व ज्योतिषी ह्यांची कुचेष्टा होते असे त्यांचे मत होते. कुठल्याही गोष्टीचा पक्का शोध करून आपली मते ठरवायची ही त्यांची पद्धत होती. तिला अनुसरून फलज्योतिषाचे ग्रंथ त्यांनी हाती घेतले. त्यात त्यांना दिसून आले की आपल्याच लोकांच्या कालगणनेच्या चुकीमुळे व हलगर्जीपणामुळे अनेक चुका होत गेल्या. या चुका शोधून दुरुस्त करण्याचा त्यांचा मानस होता, त्यास त्यांनी सुरवात पण केली होती परंतु त्याचदरम्यान वैशाख शुद्ध ६ , शके १८२० (२७ एप्रिल १८९८) रोजी प्लेगच्या साथीत विषमज्वराने आजारी पडून त्यांचे देहावसान झाले.

प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एका विषयात प्राविण्य मिळवण्याचा विचार त्यांनी आयुष्याच्या सुरवातीला केला तो विचार ते अक्षरशः जगले. ज्योतिषशास्त्रात त्यांनी त्यांचे नाव अजरामर करून ठेवलेच त्याच बरोबर त्यांच्या कालनिर्णयाचे इतिहास संशोधनातील योगदान देखील महत्वपूर्ण आहे. त्यांचे लेख राजकीय वा सामाजिक नसल्याने त्याकाळातील वाचकांच्या वाचनात फार आले नाहीत पण आता त्यांचे महत्व समजून येते.

संदर्भ –
कै. ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांचे त्रोटक जीवनवृत्त – रामभाऊ शंकर दीक्षित व कृष्णराव शंकर दीक्षित, आर्यभूषण छापखाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here