दापोलीतील बीजमहोत्सव

0
3166

शेती म्हटली, की बियाणे आलेच. त्यात नुसते नावाला बियाणे असून चालत नाही, तर ते परिपक्व असणे आवश्यक असते. “शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी” या संत तुकारामांच्या पंक्ती नुसार, जर बीज चांगले असेल तर त्याला येणारी फळे देखील चांगली रसाळ असतात. त्यामुळे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’, जयंतीचे औचित्त्य साधून ‘कृषि तांत्रिक व्यवस्थापन संस्था’ (आत्मा), ‘कोकण कृषि विद्यापीठ, दापोली’ व ‘उन्नत भारत अभियान’ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ३०/४/२०१९ रोजी ‘बीजमहोत्सव’ या कृषि संलग्न कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ठीक ११ वाजता ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजां’च्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली (आंबा गुणवत्ता केंद्र उद्यानविद्या विभाग) चे शास्त्रज्ञ ‘डॉ. श्री योगेश परुळेकर’ सर यांनी ‘आंबा बागांचे पुनरुज्जीवन’ या विषयावर शेतकऱ्यांना खालील माहिती दिली :-

कोकण विभाग

  • आंब्याखालील क्षेत्र : १,८२,००० हेक्टर
  • उत्पादन : ५००००० मेट्रिक टन
  • उत्पादकता : २.३ टन /हेक्टर

महाराष्ट्र राज्य

  • आंब्याखालील क्षेत्र : ४.७४.५०० हेक्टर टन
  • उत्पादन : ५,९७.०००/- मेट्रिक टन
  • उत्पादकता : १.३० टन /हेक्टर

भारत

  • आंब्याखालील क्षेत्र : २५.०० लाख हेक्टर
  • उत्पादन : १८०.०० लाख मेट्रिक टन
  • उत्पादकता : ७.२ टन / हेक्टर

कोकणातील आंबा बागांची स्थिती :

कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्याचे मिळून १,८२,००० हेक्टर क्षेत्र आंब्याखाली आहे. त्यापैकी साधारणपणे १,००,००० हून अधिक हेक्टर क्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्गात आहे. यामध्ये कातळ, डोंगर उतार, सखल भाग, समुद्र किनाऱ्यापासून जवळ आणि दूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर आंबा लागवड झालेली आढळते. (देशात किंवा महाराष्ट्रात कोकण विभाग सोडला तर कोठेही कातळात आंबा होत नाही.) पारंपारिक लागवडीची जी झाडे आहेत, ती अतिशय उंच आणि अनियंत्रित पसरलेली आहेत. एकूण क्षेत्रापैकी २५ ते ३०% क्षेत्र अउत्पादित आणि अत्यल्प उत्पादित आहे.

  • पुनरुज्जीवनाची आवश्यकता :

झाडांची अनियंत्रणीत वाढ झाल्यास त्याचे व्यवस्थापन करणे अवघड जाते,  तसेच बदलत्या वातावरणाचा तडाखा यावर बसतो व परिणामी उत्पन्न कमी होते. हे रोखण्यासाठी पुन्नरुज्जीवानाची आवश्यकता असते. तसेच, नवनवीन जोमदार फुट येण्यासाठी, आकार देण्यासाठी, झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी, चांगल्या दर्जाची फळे व फुले मिळण्यासाठी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी,  मशागतीची कामे सुलभ करण्यासाठी झाडांचे पुनरुज्जीवन केले जाते.

   ३) पुनरुज्जीवनासाठी कोणती झाडे निवडावीत?  

१० वर्षापेक्षा अधिक वयाची परंतु, उत्पादकता अत्यंत कमी झालेली झाडे पुनरुज्जीवनासाठी निवडावीत. १० ते १५ वर्षाची परंतु पुरेसा विस्तार न झालेली झाडे, अति दाठ झालेली झाडे ज्यामध्ये सूर्यप्रकाश झाडाच्या आतील बाजूस पोहचत नाही, ज्या झाडांच्या फळांचा आकार कमी  व वजन २०० ग्रॅम पेक्षा कमी झालेले आहे तसेच ५० ते ६० वर्ष वयाची व उत्पादकता कमी झालेली व हळू-हळू  फांद्या वाळणारी इ. झाडे पुनरुज्जीवनासाठी निवडली पाहिजे.

  • पुनरुज्जीवन कसे करावे?

पुनरुज्जीवनाच्या ढोबळ मानाने दोन पद्धती आहेत –

मध्य फांदीची विरळणी :

झाड सशक्त असते, उत्पदानक्षमता जोरदार असते; परंतु आतील भागात अपुरा सूर्यप्रकाश येत असल्याने, प्रकाश संश्लेषण क्रिया प्रभावीपणे होत नसल्याने  रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो. अशा झाडाची मध्य फांदी सशक्त असली तरी, तिची छाटणी करावी. ही छाटणी साधारणतः ८ ते १० फुटापर्यंत करावी.

टीप- कमी उंचीवर अधिक तीव्रतेची छाटणी करू नये. त्यामुळे झाड मरण्याचा, खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. विस्तार कालावधीही योग्य छाटणीच्या तुलनेने जास्त जातो.

अधिक उंचीवर कमी तीव्रतेची छाटणी केल्यास पालवी अधिक सशक्त नसते आणि छाटणीपासून ३ – ४ वर्षातच झाडे उंच वाढतात.

जुन्या झाडाची १/३ छाटणी :

जिथे एकच १० ते १२ फुटापर्यंत वाढलेले मुख्य खोड असेल, तिथे झाडाला मुख्य खोड दुसऱ्या आणि तिसऱ्या फांद्या असतात. त्यापैकी तिसऱ्या फांदीवर १८ ते २० फुटावर छाटणी करावी. या दोन पद्धतींव्यतिरिक्त अन्य पद्धत ही अवलंबता येऊ शकते; पण ती झाडाची रचना आणि फलधारणक्षमता पाहून अवलंबवावी लागेल.

 पुनरुज्जीवनाचा हंगाम –

साधरणतः ऑक्टोबर महिन्यात झाडाची छाटणी करावी. कारण जून ते सप्टेंबर या कालावधीत भरपूर पाऊस झालेला असतो आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली असते. किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यात म्हणजेच थंडी सरलेली असेल तेव्हा छाटणी करावी. पण झाडाला पाणी मुबलक प्रमाणात कसे मिळेल? याची काळजी घ्यावी.

  • आंबा बागांची छाटणी कशी करावी ? व छाटणीनंतर घ्यावयाची काळजी.

योग्य उंचीवर चैन सॉं, पोलप्रुनर (यांत्रिक करवत) किंवा चांगल्या कोयता, कुऱ्हाडीने छाटणी करावी. तसेच काप तिरकस येतील याची काळजी घ्यावी; जेणे करून फांदी पिंजणार नाही.

छाटणीनंतर खालील गोष्टी करणे ताबडतोब शक्य असेल तरच छाटणी करावी अन्यथा करू नये.

  • कापलेल्या फांद्या ताबडतोब गोळा करून बाहेर काढून बग स्वच्छ करावी.
  • कापलेल्या भागावर किंवा पूर्ण खोडावर क्लोरापायरीफॉस ५ मिली प्रति पाण्यात मिसळून फवारावे.
  • ब्लॅक जपानमध्ये ( काळे द्रवरूप डांबर मिसळून ) कार्बनडॉझिम (१० ग्राम/लिटर ) मिसळून कापलेल्या भागावर ब्रशच्या सहाय्याने लावणे.
  • छाटणी केलेल्या झाडास शक्य असल्यास १५० ते २०० लिटर पाणी १० ते १५ दिवसाच्या अंतराने २-३ वेळा द्यावे.

छाटणीनंतर योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, संजीवकाचा वापर, कीड व रोगापासून संरक्षण, पाणीपुरवठा, फळगळ व्यवस्थापन इतर झाडांप्रमाणे छाटणी केलेल्या झाडाला करावे. २० ते ४० वर्षाच्या झाडामध्ये छाटणी ते मोहोर येण्याचा कालावधी २ वर्षाचा तर ४० वर्षापेक्षा जुन्या झाडामध्ये ३ वर्षाचा असतो. योग्यप्रकारे पुनरुज्जीवन करून आपल्याला झाडाची उंची १८ – २० फुटापर्यंत नियंत्रित करता येते आणि झाडाचा विस्तार वाढवून उत्पादन वाढवता येते.

श्री. योगेश परुळेकर सरांनंतर कोकण कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. श्री. अरुण माने सर यांनी बीज महत्व, निवड व संवर्धन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इतर विविध विषयांवर विस्तृतपणे माहिती दिली त्यातील काही मुद्धे खालील प्रमाणे ..

१. बियाणांचे महत्व

उत्पन्न वाढण्यासाठी योग्य व सुधारित संकरीत वाणांची निवड करणे आवश्यक आहे. योग्य वाणाचे शुद्ध बियाणे वापरल्यास उत्पादन वाढते. योग्य बियाणे नसल्यास खते, औषधे इ. वरील खर्च वाया जातो.

 २. भात पिकाची सद्य स्थिती –

भात हे जगातील ५०% तर भारतातील ७५% लोकांचे प्रमुख तृणधान्य आहे . महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी पिका नंतर भाताचा दुसरा क्रमांक लागतो. तर कोकण, विदर्भ भागात  ‘भात’ हे प्रमुख पिक घेतले जाते.

महाराष्ट्र

  • क्षेत्र : १४.६६ लाख हेक्टर
  • उत्पादन : ५०.०९ लाख टन
  • उत्पादकता : ३३ – ७० ( क्विंटल / हेक्टर )

कोकण

  • क्षेत्र – ३.७९ लाख हेक्टर
  • उत्पादन – तांदूळ ११.११ भात १६.१०
  • उत्पादकता – तांदूळ २९.४० भात ४२.६०

 भात वाणांची निवड

हळवा (१०० ते १२०) भात वाण ११, निमगरवा (१२१ ते १३५) भात वाण १०, गरवा (१३६ ते १५०) भात वाण ५, क्षार प्रतिकारक भात वाण ३, संकरित ५ हे डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ प्रसारित भात वाण आहे. यामध्ये प्रसारण वर्षानुसार आणि वैशिष्ट्यानुसार वाणाच्या अनेक जाती आहेत त्यामुळे आवश्यक ते वाण निवडावे.

नागली, कडधान्य, भाजीपाला, गळीतधान्य या पिकांचीही वाण निवड भाताप्रमाणेच प्रसारण वर्ष, पिक तयार होण्याचा कालावधी आणि वैशिष्ट्यानुसार करावी.

 ३. अन्नधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी नियोजन :

लोकसंख्या वाडीचा वेग, कमी होणारे क्षेत्रफळ, बियाणे दरबदल, सरासरी उत्पादकता लक्षात घेता. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जेणे करून  अन्नधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. तसेच सुधारित जातीची निवड, दर्जेदार बियाणांचा वापर, खते व पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन इ. गोष्टी महत्वाच्या आहेत.

४. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी.

  • बियाणे मान्यताप्राप्त संस्थेकडून खरेदी करावे.
  • बियाणे पिशवीवर लेबल आवश्यक आहे.
  • खरेदी बिलाची पक्की पावती घेणे आवश्यक आहे.
  • लेबलवर बियाणे जात, प्रकार, लॉट नं., उगवणशक्ती, अनुवांशिक शुद्धता, बियाणे वापर व अंतिम दिनांक असणे आवश्यक आहे.

५. बियाणे नापास होण्याची कारणे  

  • बियाणे योग्य रीतीने न वाळवल्यास साठवणूक करताना अति आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो व परिणामी रुजवा कमी होतो.
  • बियाणे भिजल्यास रुजवा कमी होतो.
  • भात प्लॉट मध्ये जास्त खडे असल्यास.
  • रोग कीड प्रमाण जास्त असल्यास.

विविध कडधान्य, तृणधान्य, डाळी, पालेभाज्या व फळभाज्यांचे बियाणे, औषधी वनस्पती या महोत्सवात प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

श्री. गंगाराम सोनू मोरे. (उर्फी,दापोली )

श्री. सुभाष रामचंद्र साठले. (मुरुड,दापोली)

श्री. महेश रमेश केळकर. (आंबवली)

श्री. शंकर गणपत पुळेकर. (गव्हे,दापोली)

श्री. सुरेश राजाराम दळवी. (खवटी, खेड )

श्री. अनंत हरीभाऊ राणे. (पन्हाळजे,खेड )

श्री. अनंत गणपत चव्हाण. ( कुंभवली )

श्री. दिलीप शांताराम कदम. (पिंपळगाव, मंडणगड)

श्री. सुरेश कानू मोडकले. (वडवली, मंडणगड)

या  दापोली, खेड, मंडणगड तालुक्यामधील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. श्री. संजय सावंत सर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्री. संजय भावे सर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. श्री. जगताप सर, तालुका कृषि अधिकारी श्री. हाके सर, कोकण कृषि विद्यापीठाचे डॉ. हळदणकर सर, उन्नत भारतचे नोडल ऑफिसर डॉ. वरवडेकर सर, ग्राम समन्वयक श्री. विनायक(काका) महाजन, उपविभागीय अधिकारी श्री. दिपक कुटे, कृषि सेवक, शेतकरी मित्र तसेच  दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. शिवाय बाहेरील जिल्ह्यातींल शेतकऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here