दापोली तालुक्यातील शिर्दे गावातील भोमेश्वर मंदिर

1
5560

दापोली या शहरापासून ७ की.मी अंतरावर ‘शिर्दे’ गाव आहे. हे गाव काहीसे जंगल व डोंगरी भागात वसलेले आहे. गावातून ‘सूर्य नदी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचा उगम होतो. या सूर्य नदीच्या तीरावर भगवान शिवशंकराचे ‘भोमेश्वर मंदिर’ वसलेले आहे. हे मंदिर जवळपास १५० वर्षे जुने असून हे एक स्वयंभू  स्थान आहे.

इतिहास

सध्याच्या मंदिराच्या जागी पूर्वी घनदाट जंगल होते. या जंगलात त्यावेळच्या शिर्दे ग्रामस्थांना स्वयंभू शंकराची पिंड आढळली. कालांतराने तेथे पूजा अर्चा होऊ लागली. बाळ व बेहरे आडनाव असलेल्या ब्राम्हण  घराण्यांनी तेथे मंदिर बांधले. मंदिर अगदी साधेसुधे झोपडीवजा होते. एक दिवस मंदिरात वलय (जमिनीचे सपाटीकरण आणि सारवण) करीत असताना पिंडीशेजारी एक मोठे भोम (वारूळ) तयार झालेले आढळले. हे वारूळ लोकांनी काढून माती मंदिरा बाहेर फेकून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी चोप देण्यासाठी आलेल्या माणसांना मंदिराबाहेर टाकलेली माती तेथे नसून, पुन्हा मंदिरामध्ये होते-तसे वारूळ तयार झालेले आढळले. व त्यात वलय करण्यासाठी ठेवलेली साधने देखील वारुळाच्या आत लुप्त झाली. त्यामुळे पुढे हे मंदिर ‘भोमेश्वर मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही ती साधने भोमामध्येच आहेत, असे सांगितले जाते. वारुळाची उंची जमिनी पासून साधारणतः पाच ते सहा फूट इतकी उंच आहे.

भोमेश्वर हे बाळ व बेहरे कुटुंबियांचे कुलदैवत तर गावाचे ग्राम दैवत आहे. पूर्वी हे मंदिर कौलारू स्वरूपाचे होते. सन १९७८-७९ ला  बाळ व बेहरे यांनी मंदिराच्या गोलाकार घुमटाचे काम पूर्ण करून प्रथम जीर्णोद्धार केला. त्यानंतर १९८०-८५ या कालावधित  ग्रामस्थांनी मंदिराचे उर्वरित काम करून पुन्हा जीर्णोद्धार केला. पुढे कालांतराने ही घराणी कामानिमित्त दापोलीबाहेर स्थायिक झाली. तेव्हापासून मंदिरातील पूजा-अर्चा व इतर सण/उत्सवाची जबाबदारी  ग्रामस्थच पार पाडीत आहेत. मंदिराच्या परिसरात अजून काही लहान-लहान देवळांचे चौथरे दिसून येतात. या संदर्भात  पूर्वी येथे एकूण नऊ देवळे होती, असे येथील ग्रामस्थ सांगतात. तसेच आता अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या मागे काही कोरीव ‘शिल्पमूर्ती’ तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात. त्याकाळात होणाऱ्या परकीय आक्रमणातून या मूर्ती तुटल्याचे सांगितले जाते. सध्या शिवपिंडी बरोबरच देवळात  ग्रामदैवत झोलाई, काळकाई, कोटेश्वरी, गावपांढर, इ. देवी-देवतांच्या मूर्ती आहेत.

शिर्दे गावात जागडेवाडी, वाघबीळवाडी, रामवाडी, पूर्व वाडी-१ ,पूर्व वाडी-२ आणि बौद्धवाडी अशा एकूण सहा  वाड्या आहेत. गावाची लोकसंख्या साधारणतः ६०० ते ७०० आहे. देवळात महाशिवरात्री, नवरात्र व शिमग्याच्या वेळेस मोठे उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांना गावातील सर्व लोक आणि परगावी गेलेले बाळ व बेहेरे कुटुंबीय आवर्जून हजेरी लावतात. सन २०१५ रोजी ‘श्री भोमेश्वर मंदिर ट्रस्ट, शिर्दे’ ची स्थापना करण्यात आली. ही ट्रस्ट  मंदिराचे सर्व कामकाज पाहते. ‘श्री.बळवंत धोंडू केंबळे’ हे या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष असून सध्या तेच अध्यक्षस्थानी आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here