दापोलीतील ईदगाह

0
3235

ईदगाह म्हणजे काय? तर ईद या सणादिवशी सामूहिकरित्या नमाज अदा करण्याची जागा. त्यामुळे ईदगाह शब्दाची फोड केली तर ईद म्हणजे ‘ईदसण’ व गाह म्हणजे ‘जागा.’ हा मुळात ‘पर्शियन’ शब्द आहे. पूर्वीच्या काळी मशिदी छोट्या-छोट्या असल्याकारणाने ईदगाहची निर्मिती केली जात असे. दापोली शहरात आसराच्या पूलावरून डाव्या बाजूला नर्सरी रोडला, कोकण कृषी विद्यापीठाच्या आवारालगत एक अत्यंत जुना ‘ईदगाह’ आहे. दापोली तालुक्यातील हा ‘एकमेव’ ईदगाह आहे व याचा निर्मितीकाळ ‘आदिलशाही राजवटीचा’ असावा, असे म्हटले जाते.

या ईदगाहची रचना अगदी सामान्य आहे. नमाज अदा करताना काबाकडे तोंड राहील अशी दिशा हेरून एक लांब भिंत बांधण्यात आली आहे आणि भिंतीला मध्यभागी एक कमान आहे. या कमानीला ‘मेहराब किंवा कीबला’ असे म्हणतात. मेहराबला काबाचे प्रवेशद्वार मानून नमाज अदा केली जाते. या मेहराबच्या जवळ ‘केवळ एकच’ माणूस उभा राहील, असा साधारण ‘साडे तीन-चार फुटाचा’ पायरी उंचवटा आहे. त्या उंचवट्याला ‘मेंबर’ असे म्हणतात आणि त्या मेंबरवरून इमाम खुद्ब्याचे वाचन करतात. भिंतीच्या वरच्या बाजूला छत नाही, केवळ इस्लाम धर्माचे चिन्ह लावण्यात आले आहे. हे चिन्ह भिंतीच्या दोन टोकांना आणि मध्यभागी आहे. भिंतीसमोर म्हणजेच ईदगाहसमोर सुमारे सहाशे लोक नमाज अदा करतील एवढी जागा आहे. नमाजाच्या वेळी पहिल्या पंक्तीत मौलाना उभे राहतात. त्यांच्यामागून सफ (रांगा) केल्या जातात.

ईदगाहमध्ये केवळ ईदच्याच दिवशी नमाज अदा केली जाते. ही नमाज बंधनकारक(अनिवार्य) नाही. लोकांच्या विचाराचे आदान-प्रदान व्हावे, प्रेम-जिव्हाळा वाढावा हा त्यामागील खरा हेतू आहे. जगामध्ये अरब राष्ट्रांपेक्षा रशियामध्ये अशा ईदगाहचे प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये असे ईदगाह फार कमी प्रमाणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here