दापोलीतील श्रीकृष्ण जन्मोत्सव

0
961

दापोली तालुक्यात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाल्याचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री बरोबर बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथील दुष्ट कंसाच्या कारागृहात झाला असे मानले जाते. भगवान श्रीकृष्ण हा विष्णूच्या अवतारांपैकी आठवा अवतार आहे असे देखील मानले जाते. पृथ्वीवर ज्या-ज्या कालखंडात दुष्टांचा उपद्रव वाढला त्या त्या वेळेस भगवान विष्णूने अनेक रुपांत अवतार घेऊन दुष्टांचा संहार केला अशा अनेक आख्यायिका व पुराणकथा आहेत. भगवान श्रीकृष्णाचा मामा असलेल्या कंसाने असाच पृथ्वीतलावर उच्छाद मांडला होता, अधर्म आचरण सुरु केले होते. प्रत्यक्ष स्वतःच्या बहीणीस व तिच्या पतीला त्याने कारागृहात डांबले होते. याच वसुदेव व देवकीच्या पोटी भगवान विष्णू जन्म घेऊन कंसाचा संहार करणार अशी आकाशवाणी झाल्याने कंसाने देवकीची सात ही अपत्ये निर्घृणपणे मारून टाकली होती. आता आठवे अपत्य हे अवतारी अपत्य असले तरी ते कंसाच्या हातून वाचावे यासाठी श्रीकृष्ण जन्मदिवशी पृथ्वीतलावरील सर्वच लोक अन्न पाणी सोडून कृष्णजन्माची वाट पाहत बसले होते. या वाट पाहण्यातच सर्वांना या दिवशी उपवास घडला. त्यामुळे त्यानंतर दरवेळेस या दिवशी उपवास करण्याची प्रथा सुरु झाली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर तो कंसाच्या हाती सापडू नये यासाठी सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र दैवयोगाने श्रीकृष्ण कंसाच्या हाती न लागता रात्री सुखरुप गोकुळात नंद राजाच्या महालात पोचल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वत्र आनंदी-आनंद झाला. दुष्ट कंसाची आता अखेरची घटका भरत आल्याची सर्वांना खात्री वाटली. याच आनंदाप्रीत्यर्थ गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला साजरा केला जातो.

दापोली तालुक्यात गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वत्र असा उपवास केला जातो. दिवसभरात फलाहार घेतला जातो.श्रावण महिन्यात असे अनेक धार्मिक सण साजरे होतात. श्रावण महिन्यातील एकंदरीत वातावरण खूप कुंद व आर्दतायुक्त असते. मानवी आरोग्यास हे वातावरण चांगले नाही. या वातावरणात अपचन, पोटदुखी व इतर संसर्गजन्य आजार वेगाने पसरतात. अशा वातावरणात पोट थोडे रिकामे रहावे, पचनास हलके व शाकाहारी अन्नपदार्थ पोटात जावेत या हेतूनेही अशा सणांच्या व उपवासांच्या प्रथा निर्माण झाल्या असाव्यात. फार प्राचीन काळापासून मानव, देव देवता व निसर्गातील गूढ शक्तींना घाबरत आला आहे. देवाच्या भितीने का होईना, पण माणसे असा आरोग्यवर्धक उपवास करतील ही देखील अशा सणामागील प्रमुख भावना असावी.

दापोलीत अनेक ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा करतात. बऱ्याच गावांमध्ये वाड्यांमध्ये पिढीजात काही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणून तिची विधिवत पूजा करतात. काही मंदिरांमध्ये या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचेही आयोजन केले जाते. दिवसभर गावातील सर्वजण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतात. सर्व भक्तजन पूजेत सहभागी होतात. रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाच्या बालरुपातील मूर्तीस दूध, दही, मध, गंगाजलाने अभिषेक केला जातो. या बालमूर्तीस अंघोळ घालतात. मग हे सर्व तीर्थाच्या पंचामृतात ओततात. बाळकृष्णास अंघोळ घालून व त्याला व्यवस्थित पुसून भरजरी कपडे घालून, दागिने घालून फुला फळांनी सजवलेल्या पाळण्यात घालून पाळणागीत गायनाने भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. गावातील जाणकार व्यक्ति किंवा भजनी बुवा अशा पाळणागीतांचे गायन करतात. नंतर बाळकृष्ण व श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर दही भात, केळी, दूध यांचा नैवेद्य दाखवतात. जन्मोत्सव झाल्यावर सुंठवडा वाटून आनंद साजरा केला जातो.काही ठिकाणी हरीक या धान्याची भाकरी नैवेद्य म्हणून दाखविली जाते.भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकास अशा भाजी भाकरीचा प्रसाद दिला जातो. गावातील प्रत्येक घरातून शिजवलेला नैवेद्य श्रीकृष्णासमोर ठेवून मगच दिवसभराचा उपवास सोडतात. रात्री जन्मोत्सवानंतर सामुहिक आरती व भजनाचे कार्यक्रम होतात. काही ठिकाणी इतर सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. संपूर्ण रात्रभर भगवान श्रीकृष्णासमोर जागरण करून मोठ्या श्रद्धेने हा जन्मोत्सव साजरा केला जातो.

भगवान श्रीकृष्णच्या अनेक बाललीला व रासक्रीडा आजही एक सांस्कृतिक सोहळा म्हणून साजऱ्या केल्या जातात. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा आवडता दहीहंडी कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात साजरा होतो. मातीच्या मटक्यात दूध, दही,केळी,फळे वगैरे घालून पानफुलांनी सजवून मध्यभागी श्रीफळ ठेवून ती हंडी दोरीने उंचावर बांधतात. गावातील व परिसरातील गोविंदा एकत्र जमून, फेर धरत भगवान श्रीकृष्णाची आवडती गाणी गात ही दहीहंडी फोडतात. ” गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा!” व ” हिच्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!!” सारख्या आरोळ्यांनी दहीहंडीचा परिसर दणाणून सोडतात. सर्व गोविंदा फेर धरत गावातल्या प्रत्येक घरासमोरून नाचत व गाणी गात फिरतात. प्रत्येक घरामधून या गोविंदांवर दह्याचा, पाण्याचा वर्षाव केला जातो. गोविंदा दहीहंडीखाली जमून मानवी मनोरा करून दहीहंडी फोडतात. गोविंदांमधील एखाद्या वजनाने हलक्या व छोट्या गोविंदास वरच्या थरावर ठेवतात. हाच बाल गोविंदा हंडीतील नारळ काढून त्या नारळाने हंडी फोडतो. दहीहंडी फोडल्यावर कृष्ण नामाचा जल्लोष व जयजयकार केला जातो. हंडीतील नारळ फोडून, फळे कापून व इतर पदार्थ आणि पोहे घालून सर्वांचा एकत्रित प्रसाद दहीहंडी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना वाटल्यावर या गोपाळकाला उत्सवाची सांगता होते. दापोली तालुक्यातील केळशी येथे दरवर्षी दहीहंडीचा विशेष पारंपारिक व वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम साजरा होतो. एकंदरीत श्रद्धा, समभाव, समता, एकजूटपणा व धार्मिक वृत्ती अशा अनेक गुणांचे बलस्थान असणारा असा भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मुंबईसह संपूर्ण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here