श्री देव विश्वकर्मा जन्मोत्सव विशेष

0
976

श्री देव विश्वकर्मा यांना सृष्टीचा पहिला ‘ वास्तुरचनाकार ‘ असे म्हटले जाते. वास्तू व नगर निर्माण क्षेत्रातील सर्वच कारागिरांचे व त्यांच्या समाजाचे श्री विश्वकर्मा हेच आराध्य दैवत व श्रद्धास्थान आहे. पुराणकाळात क्षीरसागरात विश्राम करणाऱ्या श्री विष्णूच्या नाभीकमलामधून सृष्टीचा निर्माता असलेल्या श्री ब्रह्मदेवाचा जन्म झाला. याच ब्रह्मदेवाचा एक पुत्र म्हणजे ‘ धन’. या धनालाही ‘ वास्तुदेव ‘ नावाचा एक पुत्र होता. वास्तुदेव आणि अंगारिका या दांपत्याच्या पोटी श्री विश्वकर्मांचा जन्म झाला असे सांगतात.

पुराणग्रंथांमध्ये श्री विश्वकर्मांचा वारंवार अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. श्री विश्वकर्मा हे एकमुखी, द्विमुखी, त्रिमुखी व चतुर्मुखी असल्याचेही निरनिराळे उल्लेख आढळतात. त्याचप्रमाणे श्री विश्वकर्मा हे द्वीभुज, चतुर्भुज, षड्भुज आणि अष्टभुज असल्याचीही अनेक ठिकाणी नोंद आहे. श्री विश्वकर्मा यांचा जन्मच सृष्टीच्या निर्माण कार्यात महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी झाला होता. श्री विश्वकर्मा यांनीच सत्यलोकातील ‘ स्वर्गलोक ‘, त्रेतायुगातली ‘ लंका ‘, द्वापार युगातील ‘ द्वारका ‘ आणि कलियुगातील ‘ हस्तिनापूर ‘ पांडवांचे ‘ इंद्रप्रस्थ ‘ यांसारख्या प्रसिद्ध नगरांची निर्मिती व रचना केली होती. याशिवाय श्रीकृष्णाच्या ‘ सुदामपुरी ‘ चीही निर्मिती व रचना श्री विश्वकर्मा यांनीच केली होती. भारतातील, किंबहुना जगातील अनेक ऐतिहासिक वास्तू, महाल, चित्रे, शिल्पे आदींच्या निर्मितीत विश्वकर्मा यांचे फार मोठे योगदान आहे. श्री विश्वकर्मा यांचा पुत्र तथा शिष्य मय याने पांडवांसाठी मयसभा बांधली असली तरी त्यासाठीचे मार्गदर्शन व संकल्पना श्री विश्वकर्मा यांचीच होती. श्री विश्वकर्मा यांच्याच मार्गदर्शनाखाली श्री रामाला लंकेत जाण्यासाठी हनुमान, नल व नील यांसारख्या ( नल व नील हे श्री विश्वकर्माचेच अंशतः अवतार होते असे मानतात.) स्थापत्यतज्ञांच्यां देखरेखीखाली ‘ रामसेतू ‘ बांधला गेला. श्री विश्वकर्मा यांनी देवराज इंद्रासाठी दधिची मुनींच्या अस्तींपासून ‘ वज्र ‘ बनविले. पुढे याच वज्राचा वापर करून देवेंद्राने अनेक असुरांचा वध केला. स्वर्गलोकीचे ‘ पुष्पक विमान ‘ व इंद्राचा ‘ विजयरथ ‘ श्री विश्वकर्मा यांनीच बनवला होता.

श्री विश्वकर्मा यांना सौर उर्जेचा वापर करण्याची व त्यावर नियंत्रण ठेवण्याचीही कला अवगत होती. श्री विश्वकर्मा यांनी देवांसाठी तब्बल बाराशेहून अधिक शस्रे व अस्रांची निर्मिती केली होती. याशिवाय देवादिकांसाठी लागणारे अलंकार, सिंहासने महाल, उद्याने, आभुवने, सभामंडप आदींचीही निर्मिती श्री विश्वकर्मा यांनीच केली होती. श्री विश्वकर्मा यांच्या निर्माणकार्यावर खूश होऊन देवेंद्राने त्यांना ‘ देवशिल्पी ‘ हा बहुमान दिला होता. श्री विश्वकर्मा यांनी श्री विष्णूसाठी ‘ सुदर्शन चक्र’ श्री शंकरासाठी ‘ त्रिशूल ‘ यमासाठी ‘ कालदंड ‘, कर्णाची कवचकुंडले यांसारखी प्रभावी शस्रे निर्माण केली. श्री विश्वकर्मा यांनी श्री प्रभू रामचंद्र वनवासात असताना निकर नावाच्या दैत्याचा बिमोड करण्यासाठी ‘ सारंग ‘ नावाचे धनुष्य बनवून श्रीरामांस दिले होते. त्या दैत्याचा वध केल्यावर प्रभू रामचंद्रानी ते धनुष्य अगस्ती ऋषिंस अर्पण केले. पुढे राम – रावण युद्धात अगस्ती ॠषिंनी ते धनुष्य परत श्रीरामांकडे सुपूर्द केले. याच धनुष्याचा वापर करताना प्रभू रामचंद्रांनी रावण, कुंभकर्ण यांचा वध केला. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांस ‘ सारंगधर ‘ असेही नाव पडले. महाभारतातील युद्धकाळात श्री विश्वकर्मा यांनी ‘ दिव्यदृष्टी ‘ नावाचे एक खास यंत्र राजभवनात बसविले होते. या यंत्रामुळेच राजभवनात बसूनही युद्धक्षेत्रातील प्रसंग दिसत होते. श्री विश्वकर्मा यांनी एकूण चौदा ब्रह्मांडांची निर्मिती केली. त्यांमध्ये वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रह्मपुरी, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळातील नागलोकाचा सामावेश आहे. श्री विश्वकर्मा यांनी संपूर्ण चराचरात एक ना अनेक कलाकृती व बांधकामे निर्माण केली. त्यांनी लिहीलेली स्थापत्य संहिता आजही ‘ स्थापत्य प्रकाश ‘ व ‘ स्थापत्य देव ‘ या नावांनी प्रसिद्ध व प्रचलीत आहे. श्री विश्वकर्मा यांनी ‘ विश्वकर्मा वास्तुशास्त्र ‘ नावाचा ग्रंथही लिहीला. आजही हा ग्रंथ वास्तुशास्रज्ञांसाठी ‘ दीपस्तंभ ‘ आहे.


श्री विश्वकर्मा यांना मनु (लोहार), मय(सुतार), त्वष्टा(कासार), शिल्पी(शिल्पकार) आणि दैवज्ञ(सोनार) असे पाच पुत्र होते. आज या पाच पुत्रांचे पाच समाज असून या पाचही समाजांना एकत्रित ‘ विश्वकर्मा ‘ समाज म्हणून संबोधले जाते. याशिवाय श्री विश्वकर्मा यांना सिद्धी, बुद्धी, संज्ञा, पद्य आणि उर्जस्वती अशा पाच कन्याही होत्या. श्री विश्वकर्मांचे पाचही पुत्र आता विश्वकर्मा समाजाचे प्रतिनिधित्व करतात.


भारतभरात विविध ठिकाणी श्री विश्वकर्माची मंदिरे दिसतात. भारतातील दिल्ली शहरात श्री विश्वकर्माची सर्वाधिक मंदिरे आहेत. दिल्लीतील पहाडगंज येथील श्री विश्वकर्मा मंदिर पुरातन असल्याचे सांगितले जाते. हे श्री विश्वकर्मा मंदिर पांडवांनी बांधल्याचेही उल्लेख आढळतात. याशिवाय राजस्थान येथील जोधपूर येथेही श्री विश्वकर्माचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील श्री विश्वकर्माची मूर्ती पंचमुखी आहे. सन १९३० मध्ये बांधलेले झारखंडमधील रांची येथील श्री विश्वकर्मा मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर एका संताने बांधले असून या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर मात्र हा संत बेपत्ता झाला. त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही असे म्हणतात. मुंबईतील कांदीवली, मीरा रोड, आणि मुंबई जवळील कोपरखैरणे येथेही श्री विश्वकर्माची मंदिरे आहेत. पुरातन काळापासून विवाह, यज्ञ, गृहप्रवेश यांसारख्या शुभकार्यात नेहमीच श्री विश्वकर्माची पूजा करण्याची प्रथा आहे.


दापोली तालुक्यातील अनेक गावांत विश्वकर्मा समाजाची वस्ती फार पुर्वीपासून आहे. प्रामुख्याने दापोली तालुक्यातील कुंभवे,हर्णे -सुतार वाडी, गव्हे,सडवे, मौजे दापोली,गिम्हवणे, जालगांव, साखळोली, वणौशी तर्फ नातू या गावांमध्ये विश्वकर्मा समाज बहुसंख्य आहे. यांपैकी काही ठिकाणची श्री विश्वकर्मा मंदिरे पुरातन आहेत तर काही ठिकाणी अगदी अलीकडील काळात बांधलेली मंदिरे आहेत. दरवर्षी माघ शुद्ध त्रयोदशीस श्री विश्वकर्मा मंदिरात श्री विश्वकर्मा जन्मोत्सव किंवा श्री विश्वकर्मा जन्मदिन सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. विश्वकर्मा समाजाबरोबरच इतर समाजाचे लोकही फार मोठ्या श्रद्धेने श्री विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होतात.


औद्योगिक क्षेत्रात कितीही यांत्रिक प्रगति झाली, कारागिरांची अनेक कामे यंत्रे करु लागली तरी आजही समाज व नगर रचनेत व निर्मितीत विश्वकर्मा समाजाचे महत्व व योगदान अनन्यसाधारण असेच आहे. कालौघात कारागिरांच्या व्याख्या व संकल्पना बदलल्या असल्या तरी विश्वकर्मा समाजाखेरीज व कारागिरांखेरीज कोणतीही नवनिर्मिती होऊ शकणार नाही हे वास्तव आहे. विश्वकर्मा समाज फार पुर्वीपासूनच अनेक कलांमध्ये पारंगत आहे. नवनिर्मितीबरोबरच संगीत, वाद्य, गायन, शिल्प, चित्र, आदी कलांमध्येही या समाजाचे योगदान नेहमीच फार मोठे राहिले आहे. पुर्वी पारंपारिक हत्यारे व अवजारे वापरून आपले कौशल्य दाखविताना अनेक कलाकृती निर्माण करणारा हा विश्वकर्मा समाज आजच्या काळात विविध यंत्रांचाही सराईतपणे वापर करू लागला आहे. श्री विश्वकर्मा हे केवळ विश्वकर्मा समाजाचेच श्रद्धास्थान नसून ते समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाचे आराध्य दैवत आहे यात शंका नाही. आजच्या आधुनिक व यांत्रिक काळातही विश्वकर्मा समाज पुर्वीच्याच सहभागाने समाजाच्या नवनिर्मितीत त्याचे योगदान देत आहे, यापुढेही देत राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here