महाराष्ट्राला कीर्तनाची फार मोठी परंपरा आहे. इथल्या जवळपास सर्वच संतांनी भक्तिमार्ग व समाज प्रबोधनासाठी ‘कीर्तनाचा’ अवलंब केला आणि त्यातून नारदीय, वारकरी, रामदासी, हरिदासी, कैकाडी, भरड अशा अनेक कीर्तनाच्या प्रयोगपद्धती जन्माला आल्या. कोकणात आणि पर्यायी दापोलीत यापैकी नारदीय कीर्तन फार प्रचलित आहे. पण मागील चार-पाच दशकांमध्ये भागवतधर्माचा प्रचारप्रसार होऊन वारकरी कीर्तन देखील पुढे आले आहे. सण-उत्सवाप्रसंगी नारदीय अथवा वारकरी कीर्तनाचे आयोजन आवर्जून असते. नारदीय कीर्तनाची माहिती देणारा लेख (https://talukadapoli.com/folk-art/naradiykirtan/)ने आधीच प्रसिध्द केला आहे, त्यामुळे या लेखात केवळ वारकरी कीर्तनाची माहिती आपण सविस्तररित्या घेत आहोत.
हरिकीर्तनाचे मुख्यता दोन प्रकार पडतात. १) हरिदासी कीर्तन २) वारकरी कीर्तन
हरिदासी कीर्तनात वीणा, बाजाची पेटी, तबला ही वाद्ये असून पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग असतात. पूर्वार्धात कीर्तनासाठी घेतलेल्या अभंगाचे वेदांतपर निरूपण व उत्तरार्धात अभंगाला अनुसरून पौराणिक कथानक असते. कीर्तनाचा शेवट आरतीने होतो.
वारकरी कीर्तनात टाळ, मृदूंग, वीणा, पेटी ही वाद्ये असून ‘जय जय रामकृष्णहरी !’ या नामाच्या गजराने कीर्तनाची सुरुवात होते. सुरुवात करताना एक वीणाधारी व बाकीचे टाळकरी असतात. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान’ हा रूपाचा अभंग आणि ‘विठोबा रखुमाई’ हा गजर होतो. या गजरानंतर कीर्तनकार (एकच व्यक्ती) गादीवर येतात आणि पुन्हा ‘जय जय रामकृष्णहरी !’ हा गजर होऊन ‘रूप पाहता लोचनी’ हा रूपाचा अभंग आणि विवेचनासाठी निवडलेला अभंग गायला जातो. या प्रक्रियेला अथवा पद्धतीला ‘कीर्तन मर्यादा’ असे म्हणतात. आणि कीर्तनकार (बुवा) ज्या गादीवर कीर्तनासाठी उभे राहतात त्या गादीला ‘नारदाची गादी’ असे म्हटले जाते. कारण नारदमुनी हे कीर्तन परंपरेचे मूळ पुरुष, आद्य कीर्तनकार मानले जातात. अभंगाचे निरूपण वेदांतपर प्रमाणाद्वारे, सरळार्थ व भावार्थ सांगून केले जाते. अभंग गायला जात असताना पाठीमागचे दोन गवई व समूह टाळकरी कीर्तनकाराला संगत करतात. पूर्वार्ध झाल्यानंतर मध्यांतरात टाळकरी ‘विठोबा रखुमाई’ हे भजन गातात आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ गजर होऊन उत्तरार्धाला सुरुवात होते. उत्तरार्धात अभंगाचे स्पष्टीकरण व शंकासमाधान होऊन मागणी किंवा विनंतीपर अभंगाने कीर्तनाचा शेवट होतो. हा अभंग भैरवी रागात गायला जातो.
वारकरी कीर्तनात विवेचनासाठी केवळ एकच अभंग निवडला जातो. सप्ताह किंवा पाच दिवसांची कीर्तनमाला असेल तर प्रथम दिवशी नामपर, द्वितीय दिवशी संतपरं, तृतीय कीर्तनकार इच्छेनुसार आणि चौथ्या, पाचव्या दिवशी मागणी व काल्याचे कीर्तन केले जाते. नारदीय कीर्तनात जसे समाप्तीच्या कीर्तनाला ‘लळीत’ म्हणतात तसे वारकरी कीर्तनात समाप्तीच्या कीर्तनाला ‘काल्याचे कीर्तन’ म्हटले जाते. कीर्तन हे साधारणतः सहा विषयानुसरून केले जाते. त्यामध्ये
- स्वरूप कीर्तन – वेदांत विषय, तत्त्वज्ञान, जीव शिव ऐक्य, अनेक प्रकारचा तात्विक विचार
- गुण कीर्तन – देवाच्या अनेक गुणांपैकी महत्त्वाच्या सहा गुणांचं वर्णन
( ऐका यश श्री औदार्य। ज्ञान वैराग्य ऐश्वर्य। हे साही गुणवर्य। यासाठी जेथ ।। ज्ञाने. )
- धर्म कीर्तन – धर्म म्हणजे काय? त्याचे महत्त्व व लक्षणे
- लिला कीर्तन – श्रीकृष्ण लिला वर्णन.
- नामसंकीर्तन – नामस्मरण, नामाचे महत्त्व, नामाचे फायदे
- संतकिर्तन – संतांची स्तुती, संतांचे कार्य, संत महात्म्य
दिवसकार्याप्रसंगी ( मृत्यू पश्चात विधी) केले जाणारे कीर्तन सांत्वनपर, उपदेशपर असते. वारकरी कीर्तनात कीर्तनाचा साचा ठरलेला आहे. तो जसाच्या तसा तंतोतंत सर्व ठिकाणी पाळला जातो. त्याशिवाय काही अलिखित नियम आहेत ते देखील काटेकोरपणे पाळले जातात. उदा. कीर्तनकार माळकरी असावा.
महाराष्ट्रात अभंगाची, कीर्तनाची प्रथम सुरुवात संत नामदेव महाराजांनी केली असे मानले जाते. त्यामुळे नामदेव महाराजांना कीर्तनाचे प्रमुख प्रणेते मानण्यात येते. नामदेवांना समकालीन असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकोबारायांपर्यंत म्हणजेच जवळ-जवळ तीनशे वर्ष भागवधर्मातील अनेक संतानी अभंग रचना व कीर्तने केली. तरीही कीर्तनकाराने कीर्तनाला सांप्रदायिक संतांचाच अभंग घ्यावा, असा कोणताही दंडक नाही. केवळ कीर्तन शिक्षण घेताना गुरु अनुग्रह आवश्यक आहे.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कीर्तन शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये आहेत. शासनदेखील याबाबतीत उचित दखल घेत आहे. वर्तमान मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ कीर्तनकारांना सोबत घेऊन स्वच्छतेचा महाजागर हा उपक्रम राबवित आहेत. याकरता प्रत्येक तालुक्यातून ‘तालुका प्रमुख’ नेमून त्याखाली सात सभासद नेमलेले आहेत. प्रत्येक सभासदावर २४ गावांमधल्या प्रचारप्रसाराची जबाबदारी आहे. दापोली तालुक्यातून ‘तालुका प्रमुख’ म्हणून ‘ह.भ.प. श्री. नंदकुमार कालेकर’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला दशावतार नाटक विषयी सविस्तर माहिती देऊ शकाल का ?