दापोलीतील प्रगतशील शेतकरी – एकनाथ मोरे

1
4171

आजची स्थिती पहिली तर देशातला शेतकरी उदासीन आहे. बापजाद्यांच मिळालेलं पिढीजात घर आणि शेतजमीन विकून तो शहराची वाट चोखाळताना दिसत आहे. आपल्या दापोली तालुक्यात देखील कित्येक खेडी ओस पडली आहेत. यामागील कारणांचा शोध घेऊ पाहिल्यास यादी खूप लांबलचक होते; पण मुख्यत्वे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की ‘बदलत्या जगाशी एकरूप होणे, इथल्या शेतकऱ्याला तितकेसे जमलेले नाही.’ तो आजही जुन्या, पारंपारिक शेतीमध्ये अडकलेला आहे.

दापोलीतील कुडावळे गावातील ‘श्री. एकनाथ मोरे’ असेच भात, नाचणी, वरी, तीळ अशा पारंपारिक शेतीमध्ये अडकलेले होते. या शेतीतून फारसा नफा मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी जोडधंदा म्हणून भाजीपाला करायचे ठरवले. कारण भाजी ही बाजारपेठेची दैनंदिन गरज आहे व तिचा पिक कालावधीही पारंपारिक पिकांच्या तुलनेत फार कमी आहे. भाजीतून नफा मिळू लागल्यावर त्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग चालू केले. वेगवेगळ्या हंगामात, वेगवेगळी अपारंपरिक पिके कशी घेता येतील याकडे लक्ष पुरविले. सोबतच फळबाग आणि मत्स्यशेती याकडेही लक्ष केंद्रित केले. कृषि अधिकारी व कृषि तज्ज्ञांच्या मदतीने ते शेतात पिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. आज ते शेतात भाज्यांची (पडवळ, वांगी, भेंडी, कोबी, फ्लावर, गाजर, काकडी, इ.)  व फळांची (आंबा, फणस, काजू, चिकू, अननस, इ.)  नाना प्रकारची पिके घेतात. दापोली शेतकरी सेवा संघटनेचे सभासद असल्यामुळे त्यांना दापोलीत शेतमाल विक्रीची हक्काची जागा उपलब्ध आहे. (व्यावसायिक शेतीला बाजारपेठ अभ्यास आणि बाजारपेठेत व्यवसाय करण्यासाठी संघटन पाठबळ आवश्यक आहे म्हणून ते दापोली शेतकरी सेवा संघटनेचे सभासद आहेत.) सेंद्रिय खताची भाजी म्हणून त्यांच्या भाजीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

अपारंपारिक पिकातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असला तरी पारंपारिक पिके घेणे त्यांनी पूर्णपणे बंद केलेले नाही. कारण त्यांच्या मते शेती ही केवळ फायद्या-तोट्याची नसून सकल प्राणिमात्र हिताची असते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात त्या त्या प्रदेशातली पारंपारिक पिके घेतलीच पाहिजेत आणि जे शेती सोडत आहेत त्यांना मोरे आवाहन करीत आहेत की ‘शेती हाच खरा समृद्धीचा मार्ग आहे.’ व ही समृद्धी प्राप्त करायची असेल तर शेतात कष्ट झाले पाहिजेत, प्रयोग झाले पाहिजेत. सध्या ते पर्यटनाला चालू व्यवसायाशी कशाप्रकारे जोडता येईल? याच्या चिंतनात आहेत. त्यांचे अनुकरण करणाऱ्यांनीही शेतीत चांगली प्रगती साधली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतीच्या सर्वोत्कृष्ठ अशा ‘शेतीनिष्ठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here