डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली आणि राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड ) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण’ कार्यक्रम दिनांक २२ व २३ डिसेंबर २०२० रोजी श्री विमलेश्वर मंदिर, मुर्डी येथे पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माजी विस्तार शिक्षण संचालक स्वर्गीय डॉ. ए. जी. पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष वरवडेकर – नोडेल ऑफिसर उन्नत भारत अभियान, व्यवस्थापक, कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्र, दापोली यांनी केले.
गांडूळखताची निर्मिती व वापरा बाबतचे सविस्तर मार्गदर्शन डॉ. नरेंद्र प्रसादे – सहाय्यक प्राध्यापक यांनी केले व त्यानंतर पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे कृषि सहाय्यक श्री.गणेश जालगावकर यांनी गांडूळखत बेड तयार कसे करावे? याबाबत प्रात्यक्षिक दाखवले व माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ.शशिकांत सहदेव बागुल – पशुवैद्य (एम. डी. पंचगव्य) यांनी विविध पंचगव्ये तयार करण्यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आपले अभिप्राय मनोगतातून व्यक्त केले.यानंतर याच ठिकाणी दिनांक २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. श्रद्धा हजिरनीस – जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड यांनी सदर योजना व शेतीविषयी असलेल्या इतर योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आली व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला डॉ. श्रीकांत रिठे – वरिष्ठ संशोधन सहाय्यक, मुर्डी गावाचे सरपंच – श्री. किरण सांबरे, मुर्डी गावाच्या उपसरपंच – सौ. अरुणा करळकर, पोलीस पाटील – प्रमोद राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष – शशि पेंडसे, ग्रामपंचायत सदस्य – सौ. विद्या पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.