दापोलीतील एक जागरूक, युवा शेतकरी – अनिल शिगवण

0
2474

कोकणातील शेतकरी पूर्वी स्वघरापर्यंत चालणाऱ्या पारंपारिक शेतीत अडकला होता. पण आता मागील दशकभरात बाजारपेठेचे महत्त्व जाणून बऱ्यापैकी व्यवसायिक शेतीकडे वळला आहे. कोकणात पर्यटन असल्याने म्हणजेच ग्राहक स्वतः दारी येत असल्यामुळे या व्यवसायिक शेतीला हुरूप आहे. ही व्यावसायिक शेती आता शंभर टक्के सेंद्रिय करणे काळाची, वर्तमानाची आणि मुख्यतः बाजारपेठेची गरज आहे. कारण गावठी मालाला असलेल्या लोक मागणीत लोकांना रासायानिक खत विरहीत पिकवलेला माल अपेक्षित आहे. काही शेतकऱ्यांनी या दृष्टीकोनातून आधीचं पाऊले उचलून शेतीत बदल केले आणि आज ते शंभर टक्के सेंद्रियच्या वाटेवर आहेत. अश्याच शेतकऱ्यांपैकी एक प्रगतशील, प्रयोगशील, शेतिनिष्ठ युवा शेतकरी, ‘श्री. अनिल हरिश्चंद्र शिगवण.’

दापोली तालुक्यातील कुंभवे गावात राहणाऱ्या अनिल शिगवण यांनी २००८ सालापर्यंत बी.ए. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीचा पाठपुरावा करत पुणे-मुंबई गाठण्यापेक्षा, गावातचं राहून शेतीव्यवसाय करावा, असा निर्णय घेतला. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासूनचं त्यांना शेतीची आवड आणि माहिती आहे. घरची शेती अल्प भूमीची, पारंपारिक म्हणून कॉलेजात अकरावीत असतानाचं गरीब विद्यार्थी म्हणून मिळालेल्या बाराशे रुपयांच्या शिष्यवृत्तीतून एक शेळी घेतली आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन चालू केले. घरच्या पारंपारिक शेतीला व्यावसायिक रूप आणण्यासाठी त्यांनी भात, नाचणी, वरी, तीळ, कडधान्ये या पारंपारिक पिकांसोबत कारली, वांगी, मिरची, भेंडी, पडवळ इ. भाजीपाल्यांची पिके घेण्यास सुरुवात केली. या भाजीपाल्याची विक्री कोणताही मध्यस्थ मध्ये न ठेवता ते दापोलीच्या बाजारपेठेत स्वतः करू लागले.

भाजीपाल्याबरोबर बाजारपेठेची आवश्यकता समजून कलिंगड, चिबूड, मसाले इ. प्रकारची पिके घेऊ लागले. शेतीत अनेक बदल करत असताना आणि व्य़ावसायिक नफा प्राप्तः करत असताना रासायनिक खत आणि फवारणीमुळे शेतीची उत्पादनक्षमता कमी होत आहे, पिकांवर रोगराई वाढत आहे, पिकाची रंग, गुणवत्ता, चव यात फरक पडत आहे. असे विविध दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आले. शिवाय आपण ज्या ग्राहकाला माल विकतो त्या ग्राहकाच्या आरोग्यास हा माल हानिकारक आहे, हे कळून चुकले. त्यामुळे त्यानी रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

गावातील जुन्या-जाणत्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी शेतीची पद्धत बदलली. सेंद्रीय शेतीसाठी शेण, लेंडी आवश्यक असते म्हणून त्यांनी गोपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन करत पशुधन वाढवले. लगेचचं रासायनिक कडून सेंद्रीयकडे येणे शक्य नसल्यामुळे आधी पन्नास टक्के शेणखत व पन्नास टक्के रासायनिक खत असा वापर त्यांनी सुरु ठेवला. नंतर हळूहळू रासायनिक खताचे प्रमाण कमी करत आणि सेंद्रीयचे वाढवत ते आता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेणखत आणि पाच ते दहा टक्के रासायनिक खत या प्रमाणावर पोहोचले आहेत. शंभर टक्के सेंद्रीय शेती हा त्यांचा मानस आहे. त्याला अनुसरून आजही ते शेतात वेगवेगळे बदल आणि प्रयोग करीत आहेत. सुरूवातीचे काळात रासायनिक कडून सेंद्रीयकडे वळताना त्यांना उत्पादनात तफावत आढळली; परंतु दोन–तीन वर्षात ही तफावत नष्ट झाली. उलट मालाच्या रंग, चव, गुणवत्तेत बराचसा सकारात्मक बदल आढळून आला. त्यांचे आज शेतीचे क्षेत्र जवळपास पंधरा एकरचे आहे. दोन एकर त्यांची स्वतःची जमीन आहे, इतर मकत्याने म्हणजेच भाडेतत्वावर घेतलेली आहे.

अनिल शिगवण पारंपारिक पद्धतीने शेती करत असले तरी शेतात आवश्यकतेनुसार योग्य तेथे यंत्राचा वापर करतात. त्यांच्याकडे पॉवर विडर, ग्रास कटर, पॉवर ट्रीलर, मळणी यंत्र आणि मालवाहतुकीसाठी वाहने आहेत. शासनाच्या कृषि योजनांचा पाठपुरावा करून त्यापासून उचित लाभ मिळवतात. शेतीतील आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी आणि नवीन कौशल्य प्राप्त करण्यासाठी डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोली मधील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन आणि वेळोवेळी प्रशिक्षण घेतात.

अनिल शिगवण यांना आज प्रगतशील, शेतिनिष्ठ, सेंद्रिय शेती करणारा युवा शेतकरी म्हणून अनेक पुरस्कार प्राप्तः आहेत. त्यांना शेतीसाठी केवळ कुटुंबाकडून नव्हे तर संपूर्ण गावाकडून प्रोत्साहन आणि मदत मिळत आहे. त्यामुळेच शेतीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची त्यांना अडचण भासत नाही. गावातील तरुण मुलांचे ‘खेमेश्वर मित्र मंडळाचे’ त्यांना चांगले सहकार्य आहे. अनिल शिगवण यांच्या शेतमालाला आज दापोलीत मोठी मागणी आहे. साधारणतः दररोज २०० कि. ग्र. भाजीची ते विक्री करतात. विक्रीला आई, वडील, पत्नी ही घरचीच माणसे असतात, आणि गिऱ्हाईकांची जराही फसवणूक न करता स्वतः पिकवलेलीचं भाजी\फळे विकतात. निसर्ग साखळी आणि ग्राहकाचे आरोग्य याबाबत ते अतिशय जागरूक आहेत. त्यासाठीचं त्यांनी रासायनिक शेतीला बगल देऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब केला. इतर शेतकऱ्यांनीही रासायनिक शेती कमी करत करत सेंद्रिय शेती करावी, असे आवाहन अनिल शिगवण करतात.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here