आल्फ्रेड गॅडने

4
5212

‘आल्फ्रेड गॅडने’ हे नाव दापोलीच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, प. पू साने गुरुजी ही नररत्ने ज्या शाळेत शिकली, त्या शाळेची संस्थापना रेव्हरंड म्हटल्या जाणाऱ्या ‘आल्फ्रेड गॅडनेनीं’ केली. गॅडने दापोलीत आल्यानंतर शेवटपर्यंत दापोलीतच राहिले आणि जवळपास ४८ वर्ष त्यांनी स्थापन केलेल्या शाळेचे ते मुख्याध्यापक होते. फेब्रुवारी १८७८ साली एक स्कॉटिश मिशनरी म्हणून ते दापोलीत आले. त्याआधी मुंबईमध्ये S.P.G. (Society for Propagation of Gospel) या मिशनरी संस्थेचे काम करीत होते. Gospel म्हणजे ख्रिस्ती धर्माचे तत्वज्ञान. तेथे त्यांची पत्नी ‘एलिना’ ही देखील महिला मिशनरी म्हणून काम करीत होती. एलिनाने मुंबईत मुलींसाठी Normal school म्हणून शाळा स्थापन केली होती. नॉर्मल स्कूल म्हणजे शिक्षकांना अध्यापनाविषयी प्रशिक्षण देणारी संस्था. तर गॅडनेनीं मुंबईत अनाथ मुले सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली होती. १८७६ साली त्यांच्याकडे तेरा मुले होती तर १८७७ मध्ये ही संख्या वाढून पंचवीसपर्यंत गेली होती. गॅडने दापोलीत आले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि ३० अनाथ मुले होती.

दापोलीत आल्यानंतर गॅडनेंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जागेचा प्रश्न, रोजच्या सोयीसुविधांचा अभाव, मिशनरी म्हणून स्थानिकांचा विरोध, मदतीस असलेले स्वकीय ख्रिश्चन सुद्धा फार थोडेच. तरी त्यांनी संयमाने कार्य चालू ठेवले. सुरुवातीला ते भाड्याच्या जागेत राहत होते. थोड्या दिवसांनी त्यांना बॉम्बे सरकारकडून चर्चच्या जवळचे दोन भूखंड प्राप्त झाले. एकात मुलांची शाळा आणि दुसऱ्यात मुलींची शाळा व मिशनचे कार्यालय अशी तरतूद होती. गॅडनेनीं इंग्लंडला केलेल्या पत्रव्यवहारातून मुलामुलींची शाळा बांधण्यासाठी व चालवण्यासाठी लागणारा खर्च, शाळेतून दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थी यांबद्दल सविस्तर लिहिले आहे.

मुलांच्या शाळेत सकाळपासून रात्रीपर्यंत वर्ग चालत असत. मुलींच्या शाळेत अनाथ ख्रिश्चन मुलींसाठी टीचर ट्रेनिंग आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग चालत असे. काही दिवसाने मिशनमार्फत शाळा आणि वस्तीगृहासाठी उंच टेकडीची जागा देण्यात आली. तेथे १८७९ मध्ये गॅडनेनीं आजची ‘आल्फ्रेड गॅडने’ नावाने प्रसिद्ध असलेली शाळा उभारली, वस्तीगृह बांधले, आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फळझाडे लावली आणि आमराई तयार केली. १९८५ पर्यंत गॅडनेंना त्यांच्या कार्यात पत्नी एलिनाने भरपूर सोबत केली. त्यानंतर ती वारंवारच्या आजारपणाला कंटाळून काही काळासाठी इंग्लंडला गेली. परत आल्यानंतर मिशनचा कारभार तिने पुन्हा हाताशी घेतला आणि गॅडनेंना मदत करू लागली. नंतर तीन वर्षांनी काही कौटुंबिक कारणास्तव एलिना कायमची इंग्लंडला निघून गेली आणि गॅडने एकटेच दापोलीत राहिले.

गॅडनेंनी मिशनचे धर्मप्रसारचे काम दापोलीत केले; पण त्यांना अपेक्षित यश लाभले नाही. त्यमुळे त्यांनी संपूर्ण आयुष्य शाळेसाठी वाहून घेतले. शाळा मिशनरी असली तरी धार्मिक सक्ती केली नाही. १९२८ साली धर्मप्रसाराचे कार्य होत नाही म्हणून मिशनने शाळा बंद करण्याचे ठरवले. पुढे दापोली शिक्षण संस्थेने ही शाळा चालू ठेवली आणि आल्फ्रेड गॅडनेचं शाळेचे मुख्याध्यापक होते. २३ डिसेंबर १९२८ ला त्यांचे निधन होईपर्यंत तेच शाळेचे मुख्याध्यापक होते. दापोलीच्या कोकंबा आळीत त्यांचे दुर्लक्षित थडगे आहे. त्या थडग्यावर सुंदर असा संदेश कोरलेला आहे. तो संदेश आहे, येशू म्हणाला जो कोणी तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे.

गॅडनेंबद्दल दापोलीत आजही चांगले, वाईट मोठ्या प्रमाणावर बोलले जाते. ते उंच, धिप्पाड, रुबाबदार होते, घोड्यावरून किंवा घोडागाडीतून ते दापोलीत फिरायचे, उत्तम मराठी आणि संस्कृत बोलायचे अशा अनेक त्यांच्या वर्णन कथा दापोलीत रूढ आहेत. द्वारकानाथ लेलेंनी बाबा फाटकांवर लिहलेल्या ‘एकला चलो रे’ या पुस्तकात देखील आल्फ्रेड गॅडनेंचे वर्णन आहे. पण त्यांची ठळक ओळख होईल असा त्यांचा एकही फोटो उपलब्ध नाही. केवळ एक तैलचित्र आहे. पण तेही त्यांच्या वास्तविक रूपाशी तंतोतंत जुळणारे नाही.

आल्फ्रेड गॅडने दापोलीला मिशनरी म्हणून आले होते; पण त्यांनी शिक्षणाचे महान असे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे दापोलीलाच नव्हे, तर संपूर्ण भारताला फायदा झाला. आजही गॅडनेंच्या ए.जी.( आल्फ्रेड गॅडने) हायस्कूलमध्ये शिकून मुले समृद्ध होत आहेत, लौकिक प्राप्त करीत आहेत. दापोलीकरांचे आयुष्य घडवण्यात तर या शाळेचा फार मोठा वाटा आहे.

 

 

4 COMMENTS

  1. There is a need to maintain and upkeep his last Place. as well as the missionary church he started he was associated with. For sake of posterity, our heritage and patrimony needs to be retained and maintained.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here