ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

0
1537

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे थोडेफार पिकेल त्यावरच वर्षभराची गुजराण करणाऱ्या गावात ‘ घरोघरी मातीच्या चुली ‘ अशीच परिस्थिती होती. त्या काळातील परिस्थितीनुरुप गावात इयत्ता चौथीपर्यंतची एकच मराठी शाळा असली तरी गावातील ग्रामस्थ किंवा मुले यांचा शाळेत जाऊन शिक्षण घेण्याकडे अजिबात कल नव्हता. समाजात शिक्षणाची गोडी नव्हती. त्यामुळेच निजानंद यांचे वडील इयत्ता पाचवीत शिकत असतानाच शिक्षणाला ‘ रामराम ‘ करून गावप्रमुख म्हणजेच गावाचे ‘ खोत ‘ बनले. त्याच वर्षी ते त्यांच्या एकत्र कुटुंबाचे ‘ कुटुंब प्रमुख ‘ ही बनले.

Brigadier Nijanand Vishnu Bal - Taluka Dapoli
Brigadier Nijanand Vishnu Bal – Taluka Dapoli

निजानंद यांनी त्यांचे शालेय शिक्षण लाडघर येथील प्राथमिक मराठी शाळेत सुरु केले. त्या काळात घरात वीज नसल्याने त्यांना उंडीच्या तेलाच्या दिव्यावर अभ्यास करावा लागे. महत्वाचे म्हणजे त्या काळात गावात कोठेच वीज पोहोचली नव्हती. दिव्यासाठी तेल आणि हाडांसाठी मसाज व ॲन्टीसेफप्टीक म्हणूनही उंडीच्या तेलाचा वापर तेव्हा सर्वत्र सर्रास होत होता. निजानंद यांना शालेय वयात खेळण्याची विशेष आवड नव्हती. लहानपणापासूनच अवांतर वाचन, पाठांतर व विविध विषयांवर नोंदी करून ठेवण्याचा त्यांना छंद होता. याशिवाय घरकामात मदत, शेत व बागायतीस पाणी लावणे, नारळ व सुपाऱ्या वेचणे यांसारखी कामेही निजानंद यांना करावी लागत. इयत्ता पहिलीत असतानाच निजानंद डाव्या हाताने पाटीवर अक्षरे लिहीत. मात्र त्यांचे डाव्या हाताने लिहीणे शाळेतील ‘ काका मास्तर ‘ ना मान्य नव्हते. डाव्या हाताने लिहीण्याच्या सवयीवरून निजानंद व काका मास्तरांमध्ये वादावादी व्हायची. काका मास्तर म्हणायचे की, उजव्या हातानेच लिहीण्याची सवय लागावयास हवी. मात्र निजानंदांच्या मते, उजव्या व डाव्या हातात फरक काय? याच वादावादीतून पुढे काका मास्तरांनी निजानंद यांच्या वडिलांस सांगितले, ” असा अवखळ व उद्धट मुलगा माझ्या शाळेत नको!” नाइलाजाने मग निजानंद यांची पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आजोळी म्हणजेच मुरुड येथे रवानगी झाली. मुरुड येथील प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर सन १९२३ पासून निजानंद यांनी दापोली येथील आल्फ्रेड गॅडनी हायस्कूल या मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. या शाळेचे मुख्याध्यापक ‘ गॅडनी ‘ हे एक आदर्श शिक्षक होते. शालेय शिक्षण घेत असतानाच निजानंद सत्यशोधक व केसरी ही वृत्तपत्रे नियमित वाचत असत. नंतरच्या काळात त्यांनी बाबू चित्तरंजन दास यांच्या वाङमयाचाही अभ्यास केला. दापोली येथे शिकत असताना शाळेतील ‘ धोंडू मास्तर ‘ यांचे ते आवडते शिष्य होते. पुढे त्यांच्याच सांगण्यावरून निजानंद यांनी पुणे येथील ‘ न्यू इंग्लिश स्कूल ‘ मध्ये प्रवेश घेतला.

पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन कॉलेज येथे शिकत असतानाच निजानंद यांचा स्वातंत्र्य संग्रामातील अनेक रथी- महारथींना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. लो. टिळक, म.गांधी, डाॅ. मुंड्ये, न.चिं. केळकर, अण्णासाहेब कर्वे, भालाकार भोपटकर, विश्वासराव डावरे आदी क्रांतिकारकारकांच्या सडेतोड व निर्भीड विचारांचा निजानंद यांच्या विचारसरणीवर पगडा बसला. पुढे सन १९२९ साली  पुढील सैनिकी शिक्षणाकरीता निजानंद यांना इंग्लंड येथे जाण्याचे वेध लागले. इंग्लंड येथे जातानाच्या बोटीवरील प्रवासात त्यांचा अनेक भारतीय व क्रांतिकारकांशी परिचय झाला. इंग्लंड येथील राॅयल मिलिटरी काॅलेज, सॅन्डस्टर्ट येथे निजानंद यांचे सैनिकी शिक्षण सुरु झाले. सैनिकी शिक्षणात सकाळी परेड, छात्र समूह शिक्षण, सैनिकी पेशाची प्रात्यक्षिके हा अनिवार्य अभ्यासक्रम होता. याशिवाय शिकविलेल्या अभ्यासावर नोटस् काढणे, पहिल्या महायुद्धाचा इतिहास, ऑर्गनायझेशन, संघटन, व्यवस्थापन, अर्थशास्त्र यांसारखे विषयही अभ्यासासाठी होते. सैनिकी शिक्षणाच्या परीक्षेत८० टक्के गुण मिळवून निजानंद २२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्रात्यक्षिक परीक्षेतही त्यांना ६० टक्के गुण मिळाले. इंग्लंड येथील सुमारे अठरा महिन्यांच्या वास्तव्यात संपूर्ण इंग्लंड देश, स्कॉटलंड, आयर्लंड व इतर युरोपीय देशांची भ्रमंती केली. या देशांची जुनी संस्कृती, तिचे अवशेष, पुरातन वस्तू, चर्च, किल्ले पुर्वी होते तसेच जतन करून ठेवण्याची वृत्ती निजानंद यांना खास आवडली. इंग्लंड येथील सैनिकी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर निजानंद भारतात परत आले.

सन १९३३ मध्ये त्यांची ५ व्या राॅयल मराठा पलटण, वभू येथे नियुक्ती व रवानगी झाली. पुढे  भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकारकांच्या लढ्यास यश आले आणि १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारतास स्वातंत्र्य मिळाले. भारतावरील ब्रिटिश अंमल संपुष्टात आला. मात्र एका बाजूला देशास स्वातंत्र्य मिळाले म्हणून आनंदोत्सव साजरा होत असतानाच दुसर्‍या बाजूला आपल्याच निरपराध बांधवांचे दररोज हजारोंच्या संख्येत शिरकाण होत असल्याचे पाहून निजानंद व्यथित झाले. लुटालूट, बलात्कार, रक्तपात यांसारख्या अनन्वित अत्याचारांस हजारो, लाखो बांधव बळी पडले. याच वेळेस अनेक तथाकथित संस्थानिक भारतीय संघराज्यात सामील होण्यास तयार नव्हते. अशा संस्थानिकांना मोठ्या कौशल्याने एकाच छत्राखाली आणण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुरु केले होते. याचाच एक भाग म्हणून पुढे जम्मू काश्मीर, हैदराबाद व जुनागढ येथील संस्थानिकांवर साम-दाम-दंड यांचा उपयोग करण्याची वेळ आली तेव्हा जुनागढ संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्याच्या मोहीमेत निजानंद यांचा सहभाग होता. जुनागढ येथील बहुसंख्य असलेली प्रजा भारतात सामील झाली. मात्र येथील संस्थानिक राजा पाकिस्तानात निघून गेला. याशिवाय हैदराबाद येथील निजामाला नेस्तनाबूत करून तो प्रदेश भारत सरकारच्या अधिपत्याखाली आणण्याच्या मोहीमेतही ब्रिगेडियर निजानंद बाळ यांचा सहभाग होता. याच मोहीमेत निजानंद यांची ‘ ब्रिगेडियर ‘ म्हणून नेमणूक झाली.

या मोहिमेत फार मोठी कामगिरी व कर्तबगारी केल्याने भारत सरकारने ब्रिगेडियर निजानंद बाळ यांचा फार मोठा सन्मान केला. पुढे बेल्लारी येथे भारत सरकारने एक भव्य क्रीडांगण व स्टेडियम बांधले. सन १९५१ मध्ये भारत सरकारने या स्टेडियमला ‘ ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ ‘ असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. पुढे वयाच्या ४७ व्या वर्षी ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ भारतीय लष्करी सेवेतून निवृत्त झाले. मात्र एका जागी घरात शांत बसून राहणे निजानंद यांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळेच त्यांनी पुढील काळात मुंबई येथील ‘ इंडियन एअरलाईन्स ‘ या कंपनीत ‘ ॲडमिनिस्ट्रेटीव्ह पर्सनल मॅनेजर ‘ म्हणून नोकरी स्वीकारली. सन १९६८ मध्ये निजानंद या कंपनीतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सन १९६९ ते १९७२ या काळात निजानंद यांनी पुणे विश्वविद्यालयात ‘ डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी स्टडीज ‘ या विभागाचा प्रमुख म्हणून काम केले. येथून निवृत्त झाल्यावर पुढे निजानंद बाळ यांनी आकुर्डी, पुणे येथील बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत ‘ ॲडव्हायझर सोशल सर्व्हिसेस ‘ विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहिले. पुढे ‘ ग्रामोद्धार ‘ च्या माध्यमातून ग्रामीण भागात काम करताना निजानंद यांनी ‘ लक्ष्मीनारायण विकास मंडळ ‘ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामसुधारणा, शिक्षण, आरोग्य, शेतीसुधार व संवर्धन, ग्रामोद्योगास चालना देणारे भरीव सामाजिक कार्य केले. पुढे या संस्थेस जोड म्हणून ‘ नरसिंह कृपा ट्रस्ट ‘ स्थापन करून सामाजिक कार्य अधिक व्यापक केले. त्यांच्या भरीव सामाजिक कार्याची, देशसेवेची, सैनिकी सेवेची दखल घेऊन आजही त्यांचे नाव एक थोर ब्रिगेडियर व समाजसेवक म्हणून अग्रक्रमाने व आदराने घेतले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here