लोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय

0
1125

दापोली तालुक्यातील गुडघेसारख्या अतिदुर्गम गावात राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर डाॅ. राजा दांडेकर यांना पुढील शिक्षण पूर्ण करताना अतोनात कष्ट करावे लागले. सुमारे चोवीस कुटुंबांत राहून राजा दांडेकर यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ज्यादिवशी डाॅक्टरकीची पदवी पूर्ण केली त्याच दिवशी त्यांनी मनाशी ठाम ठरवले की आपणास एवढ्यापर्यंत शिक्षण घेताना ज्या अनंत अडचणी आल्या, त्या अडचणींचा सामना माझ्या दापोलीतील इतर गोरगरीब विद्यार्थ्यांना करावा लागू नये यासाठी आपण आजपासूनच काहीतरी करायला हवे . राजा दांडेकर यांनी त्याच दिवशी लोकसाधना या संस्थेची रीतसर नोंदणी करून घेतली. त्या काळात डाॅक्टरकी शिकून शहरात खूप चांगल्या प्रकारे रुग्णसेवा करता आली असती, जम बसवता आला असता, पैसाही कमवता आला असता.

पण लग्न होऊन नुकत्याच घरात आलेल्या सहचारिणी रेणू दांडेकर यांच्यासह त्यांनी दापोलीतील चिखलगांवाची वाट धरली. ते साल होते सन १९८२. त्या काळात दापोली ते दाभोळ अशा पट्ट्यात  दाभोळ हे बंदर म्हणून तर दापोली हे तालुक्याचे ठिकाण म्हणून काही प्रमाणात तुरळक सोयीसुविधांनी युक्त होते. मात्र मधल्या साधारण ४६  गावांमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा त्या काळात उपलब्ध नव्हत्या. ना विजेची सुविधा, ना चांगले रस्ते. शिक्षण व आरोग्य तर खूप दूरची गोष्ट.

दाभोळ व दापोली ही दोन ठिकाणे वगळता मधल्या भागात कोठेही त्या काळात माध्यमिक शिक्षण देणारे विद्यालय नव्हते. पुर्वी कोळथरे येथे अशी एक शाळा सुरु होती. मात्र समाजाच्या अनास्थेमुळे ती शाळाही पुर्वीच बंद पडली होती. समाजाचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्यासाठी राजा दांडेकर यांनी शाळा सुरु केली खरी, पण सुरुवातीला परिसरातील विद्यार्थी या शाळेकडे फिरकण्यास धजावत नव्हते. एकतर चौदा वर्षे पूर्ण झाली की येथील मुले थेट मुंबईचा रस्ता धरत असत. तिथे हाताला मिळेल ती नोकरी करून व तीच अखेरपर्यंत टिकवून जगण्याची  त्यांना सवय झाली होती. छोटी मोठी नोकरी करून पैसे कमविण्याच्या वयात असे पुढचे शिकून काय उपयोग अशीच येथील लोकांची धारणा होती. चौदा वर्षांचा मुलगा गावात थोडेफार शिकून मुंबई गाठतो, मिळेल ती नोकरी करतो. पुढे चार पैसे खिशात आले की व्यसनांच्या आहारी जातो. लग्न  बायको, मुले या चक्रात तो पुढे स्वतःची क्रयशक्तीही गमावून बसतो हे पाहून राजा दांडेकर व्यथित झाले.

हे जीवनचक्र थांबविण्यासाठी येथील तरुणाने व्यवसायाभिमुख व कौशल्याधिष्ठीत शिक्षण घ्यायला हवे यासाठी त्यांनी लोकसाधनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले. आपण असे शिक्षण आपल्याच संस्थेतून द्यायचे हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. हे शिक्षण याच परिसरातील स्थानिक मुलांना द्यायचे, महत्वाचे म्हणजे शासनाच्या मार्गदर्शक तत्वांच्या व निकषांच्या चाकोरीत राहूनच असे कौशल्याधिष्ठीत शिक्षण राजा दांडेकर यांनी या शाळेत सुरु केले. चांगल्या गोष्टींना कोणतेही शासन कधीच विरोध करणार नाही यावर राजा दांडेकर यांचा विश्वास होताच. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सर्वच पक्षांमध्ये चांगल्या कामाचे समर्थन करणारी माणसे आहेत याची त्यांना जाणीव होती.

नाही थकायचे, पुढेच जायचे!

राजा दांडेकर यांनी त्यांची मूळ वैद्यकीय सेवा बंद करून लोकसाधनाच्या माध्यमातून शाळेवरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले तेव्हा रेणू दांडेकर यांनी त्यांना समर्थ साथ दिली. रेणू दांडेकर यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरु केले. मात्र राजा दांडेकर यांनी कधीच अध्यापनास हात घातला नाही. ते सुरुवातीपासून ते आतापर्यंत विद्यार्थी म्हणून जगले, जगत आहेत. त्यांच्या मते, स्वतःला विद्यार्थ्यांच्या जागी ठेवून आत्मचिंतन केले तर आपल्या शाळेत कोणत्या गोष्टी असायला हव्यात, कोणत्या पद्धतीचे शिक्षण असायला हवे याचे ज्ञान होते. मी आजन्म विद्यार्थी आणि रेणू आजन्म शिक्षिका हे नाते आम्ही आमच्या घरातही वर्षानुवर्षे तसेच जपले आहे.” असे राजा दांडेकर गंमतीने सांगतात.

चिखलगांव हे खेडे अतिदुर्गम असल्याने येथील गोरगरीब जनतेचे सामाजिक प्रबोधन होण्यास व त्यांना समाजभान येण्यास बराच अवधी लागला. येथील समाजात अनेक व्यसनांनी बसवलेले बस्तान, लोकांची शिक्षणाबद्दलची उदासिनता ही येथील शिक्षणविषयक अनास्थेची प्रमुख कारणे होती. ” आमच्या मुलांना पुढे शिकून काय उपयोग? त्यांना जास्त शिकून काय करायचे आहे?” असे सवाल येथील लोक बेमालूमपणे विचारीत तेव्हा राजा दांडेकर अनेक वेळेस व्यथित होत असत.

मात्र त्यांनी लोकांचे प्रबोधन करणे सोडले नाही. इयत्ता चौथीमधील एक मुलगा एखादा दिवस शाळेत आला तर पुढचे चार पाच दिवस दांडी मारायचा. ज्या दिवशी शाळेत यायचा त्यादिवशी शाळेत मिळणारा आहार बकाबका खायचा. राजा दांडेकर यांनी एके दिवशी त्या मुलाला जवळ बोलावून घेतले. ” का रे बाळा, असे का करतोस, शाळेला दांडी का मारतोस?” असे विचारल्यावर तो मुलगा रडकुंडीस आला. ” आमच्या घरातच गावठी दारुची भट्टी आहे. आई व बाबा दिवसभर ती दारु काढण्याचेच काम करतात. दोघेही भुक लागली, तहान लागली तर त्यातलीच दारू पितात. दोघांनाही दिवसभर पावला पावलाला दारू लागते. घरी मला जेव्हा भूक लागते तेव्हा घरात कधी जेवण नसतेच. मलाही ते दारूच पाजतात. मलाही आता दारू पिल्याशिवाय चैन पडत नाही.” राजा दांडेकर निरुत्तर झाले. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलाला गावठी दारुचे व्यसन लागणे ही खूप गंभीर बाब होती. पुढे अनेक दिवसांच्या समुपदेशनानंतर त्या मुलासहीत कुटुंबाचीही दारु सुटली.

त्या पालकाने त्याची गावठी दारुची भट्टीही कायमची विझवून टाकली. शाळेत नियोजित शिक्षणाबरोबरच राजा दांडेकर यांनी शाळेत विविध मूल्यांचे संस्कार शिक्षणही सुरु केले. राजा दांडेकर सांगतात, ” आम्ही मुलांना सांगतो, घरी गेल्यावर दररोज संध्याकाळी देवापुढे दिवाबत्ती करा. श्लोक म्हणा. घरातील तुमच्याहून वयाने मोठ्या असलेल्या सर्वांना नमस्कार करा. आमच्या शाळेत शिकणारी अशीच एक चिमुरडी मुलगी दररोज संध्याकाळी तिच्या दारुड्या बापाच्या पाया पडायची तेव्हा त्या दारुड्या बापाला राग अनावर व्हायचा. तो तिला खूप ओरडायचा, प्रसंगी मारायचा. पण त्या मुलीने दारुड्या बापाच्या पाया पडणे सोडले नाही. शाळेत मिळणारे संस्कार शिक्षण तसेच होते. मूल्यावर्धित परिणाम दिसेपर्यंत हार मानायची नाही. शेवटी त्या दारुड्या बापाला स्वतःचीच लाज वाटू लागली. पुढे पुढे मुलगी पाया पडत असताना त्याची मान शरमेने खाली जाऊ लागली. परिणाम असा झाला की, त्यानंतर त्या माणसाने दारू सोडली ती कायमची.

पालकाची अशी मानसिकता बदलल्यावर त्याने त्या मुलीला चांगले शिकवले. आज तीच मुलगी मोठी झाली आहे. लग्न होऊन शेजारच्याच गावात सासरी गेली आहे. शाळेत आरोग्यसेविकेचे योग्य शिक्षण व प्रशिक्षण घेऊन आतापर्यंत तिने चिखलगांव परिसरात कोणत्याही डाॅक्टरांच्या मदतीशिवाय सुमारे दीडशेहून अधिक यशस्वी बाळतंपणे केली आहेत. अजुनही ती हे काम करत आहे. लोकसाधना संस्थेचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की, या संस्थेत शिकून गेलेला विद्यार्थी नोकरीच्या मागे धावणार नाही.

‘नोकर बनण्यासाठी शिकू नका तर मालक बनण्यासाठी शिका ‘ हेच बोधवाक्य घेऊन संस्था काम करते. मुलींना जास्त शिकवून काय फायदा असे आधी म्हणणारे पालक आता येथे शिकून स्वतःच्या पायांवर उभे राहिलेल्या अशा मुलींचे कौतुक करतात. या संस्थेत शिकलेली मुलगी स्वावलंबी होऊनच सासरी गेली पाहिजे. सासरच्या घरात तिचे ठळक अस्तित्व जाणवले पाहिजे. वेळ पडली तर सासरचा संसाराचा गाडा हाकण्याची तिच्यात हिंमत व कार्यक्षमता आली पाहिजे या दृष्टिकोनातून संस्था इयत्ता दहावीनंतर  मुलींसाठी आरोग्य सेविका, शिवणकाम, कम्प्युटर टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण देते. आज येथे शिकून गेलेल्या अनेक मुली त्यांच्या पायांवर उभ्या आहेत. याच परिसरात शिवणकाम करून, वैद्यकीय सुश्रुषा करून संसार चालवित आहेत.

आमची संस्था होण्याआधी या परिसरात महिलांना तसे स्वतःचे अस्तित्व नव्हतेच. एखाद्या कामानिमित्त एखाद्या पालकाच्या घरी जाणे झाल्यावर ” घरात कोण आहे?” असे विचारल्यावर आतून त्या घरातल्या बाईचे उत्तर येई, ” कोणीही नाही!” म्हणजे एखादी बाई स्वतः घरात असली तरी तिला स्वतःला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते इतके दुर्दैवी चित्र तेव्हाचे होते. आज संस्थेच्या माध्यमातून हे चित्र निश्चितपणे बदलले आहे.

दहा बोटे, दहा कौशल्ये!

या संस्थेत शिकून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या दहा बोटांमध्ये दहा कौशल्ये आत्मसात करून बाहेर पडला पाहिजे हे लोकसाधना संस्थेचे तत्त्व आहे. राजा दांडेकर यांनी सुरुवातीपासूनच हे तत्त्व काटेकोरपणे पाळले आहे. राजा दांडेकर यांनी इयत्ता पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत व व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यास सुरुवात केली. पुढे दहावीपासून ‘ डिप्लोमा इन बेसिक टेक्नॉलॉजी ‘ या जोड विषयांतर्गत विविध कौशल्याधिष्ठीत विषयांचे शासकीय मान्यतेचे प्रशिक्षण  येथे दिले जाते. आरोग्यसेविका, वीजतंत्री, प्लंबिंग, संगणक तंत्रज्ञान,  शिवणकाम, सुतारकाम, गवंडीकाम, बागकाम, फळ व अन्नप्रक्रिया, वेल्डिंग,  कृषी व दुग्ध उत्पादन, पेंटींग, वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रिक उपकरणांची दुरुस्ती यांसारखे  कौशल्याधिष्ठीत व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेऊन येथून प्रत्येक विद्यार्थी बाहेर पडतो. या शाळेत इयत्ता बारावीपर्यंत शिकून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात बारावीचे बोर्डाचे सर्टिफिकेट व त्या सोबत संस्थेचे कौशल्याधिष्ठीत विषयात डिप्लोमा पूर्ण केल्याचे शासनमान्य व शासनाचा शिक्का असलेले सर्टिफिकेट असते. हे चित्र इतर कोठेही पहावयास मिळत नाही.

या संस्थेत शिकून गेलेल्या सर्व युवकांनी नोकरीच्या मागे न लागता गावातच त्यांचे स्वतःचे व्यवसाय उभे केले आहेत. अशा तरुणांचा एक गट परीसरात दरवर्षी किमान चाळीस घरांचे बांधकाम करतो. अगदी जोथा बांधण्यापासून ते घराचे बांधकाम करण्यापर्यंत, लाईट फिटींग, प्लंबिंग, पेंटींग, बाग अशी सर्व कामे हेच युवक करून काम पूर्ण झाल्यावर मालकाच्या हातात घराची चावी देतात हे लोकसाधना संस्थेचे यश आहे. या सर्व युवकांकडे त्यांच्या कामाचे अधिकृत परवाने आहेत हे इथे नमूद करावेसे वाटते. प्रत्येक शाळा ही काजव्यांचे झाड असते. काजवे स्वयंप्रकाशी असतात पण त्यांनाच माहित नसते की आपण स्वयंप्रकाशी आहोत. शाळेतही मुलांच्या रुपात असे स्वयंप्रकाशी काजवे असतात. त्यांना त्यांच्यातल्या स्वयंप्रकाशाची जाणीव शाळेने करुन द्यावयास हवी. अशी जाणीव करून देणारी शाळा व असे सर्व विद्यार्थ्यी पुढे त्यांच्या आयुष्यात निश्चितपणाने यशस्वी होतात. राजा दांडेकर यांनी मुलांमधील अशाच सुप्त गुणांचा व कौशल्यांचा अभ्यास करून व त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यास कौशल्याधिष्ठीत शिक्षण देऊन अशा अनेक मुलांचे जीवन यशस्वी केले आहे. अर्थातच हे व्रत अजून थांबलेले नाही.

झोळी हीच शिदोरी

   गेली सुमारे छत्तीस वर्षे हे जानदानाचे अविरत कार्य लोकसाधना संस्थेने चिखलगांव येथे सुरु ठेवले आहे. परिसरातील गोरगरीबांच्या हजारो मुलांनी या संस्थेत शिकून आपले आयुष्य अधिक सुकर केले आहे. याच शाळेत शिकलेले अनेकजण या संस्थेत कर्मचारी व सदस्य म्हणुनही कार्यरत आहेत. या संस्थेतील संपूर्ण अध्यापक वर्ग याच संस्थेत शिकलेला व याच परिसरातील आहे. गेली छत्तीस वर्षे अतिशय माफक शुल्क आकारुन संस्था विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शालेय व कौशल्याधिष्ठीत शिक्षण देते. राजा दांडेकर सांगतात, ‘ दरदिवशी केवळ सतरा रुपयांच्या शुल्कात येथे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण, दोन वेळेस नास्ता दिला जातो. अतिशय माफक शुल्क आकारून मुलांची येथील वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते. प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारे साहित्य,  प्रयोगशाळा, वीज, पंखे या सर्व सुविधांचा विद्यार्थी आवश्यकतेनुसार हवा तेवढा वापर करु शकतात. अर्थातच अशा सर्व सुविधांच्या खर्चाचा ताळमेळ विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कात बसविणे केवळ अशक्य आहे. यासाठी संस्थेचे कार्य व काम करण्याची पद्धत बघून अनेक दानशूर व्यक्ती दरवर्षी संस्थेस सढळ हातांनी मदत करतात. ज्ञानगंगेचा हा व्रतस्थ भगीरथ छत्तीस वर्षांपुर्वी येथे आला नसता तर या संपूर्ण परिसराचे शैक्षणिक चित्र आजही कदाचित वेगळे व वेदनादायी असते यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here