स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे

0
3780

स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम गणेश उर्फ बापू मराठे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१७ रोजी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याना तीन भावंडे, एक मोठी बहीण व दोन लहान भाऊ. बापू पाच वर्षाचा असताना त्यांची आई निवर्तली व अकरा वर्षाचे असताना बाबा. मोठ्या बहिणीचं लग्न झाल्या नंतर सर्व जबाबदारी बापूंवर होती. त्यामुळे त्यांचं फारस शिक्षण झालं नाही जेमतेम ३री  पर्यंत ते शिकले.रत्नागिरीतून ते दापोलीला केव्हा आले याची आज कोणतीही माहिती उपलब्ध नाही . पण दापोलीत त्यांचं घर शेत आणि ते शेती व्यवसाय करून त्या घरात राहत होते .

त्यांनी स्वतंत्र चळवळीत सहभाग कधी घेतला याचीही खात्रीशीर माहिती आज उपलब्ध नाही . परंतु ४० ते ४४ पर्यंत ते ब्रिटिशविरोधी कारवाया केल्या म्हणून नाशिकच्या तुरुंगवासात होते. त्यांनतर पुन्हा अटक झाली तेव्हा बेळगावच्या कारागृहात होते. बापूंचं लग्न १९४८ मध्ये झालं  त्यांची पत्नी मालवण वायंगणीची होती. त्या सातवीपर्यंत शिकलेली होत्या. बापूंना एकूण चार मुले झाली.त्यांच्या उदरर्निर्वाहासाठी ते शेती बरोबर पिंजारी काम करत होते. त्यांच्या पिंजणिला एका बाजूला एक लाकडी त्रिकोणी तुकडा होता. जसा सर्व पिंजणाला असतो, परंतु हा त्रिकोण आतून पोकळ होता. त्यामध्ये पत्रक लपवून ती पत्रकं ते भूमिगटांपर्यंत पोहोचवायचे. याशिवाय त्यांच्याकडे एक लाल रंगाची गाय होती. तिचे ताक शिंग मोडलेले होते. त्या शिंगांवर बसतील अशी दोन तीन कृत्रिम शिंगे त्यांनी बसवून घेतली होती. संदेश पोहोचवायचा असल्यास ते या गायीला सात आठ गुरांच्या कळपात घेऊन गुराखी बनून हिंडत असत. भूमिगतांना त्या गाईकडून संदेश मिळालं की, गाईच्या अंगावर काळ्या पांढऱ्या रंगाचे ठिपके दिले जात. भूमिगतांना शोधून त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी बापुना कधीकधी जंगलातच  राहावे लागे.शिदोरी संपलेली असेल फळ धान्य काहीच नसेल तर झाडाची पाने खाऊन दिवस काढीत. क्रांतिवीर बाळा फाटकांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याप्रमाणेच बापू मेलेल्या जनावरांची कातडी सोडविण्याचे काम करीत होते.

१९७० सालच्या आसपास स्वातंत्र सैनिकांसाठी सरकारने पेन्शन चालू केली. तेव्हा बाबा फाटक व लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आग्रहाने बापूंकडून अर्ज भरून घेतला. त्यांना सरकारकडून सन्मानपत्र ,ताम्रपत्र व मानधन मिळाले. पहिली पेन्शन त्यांना मिळाली तेव्हा १८०० रु. पैकी फक्त १०रु. त्यांच्याकडे शिल्लक राहिले, बाकी सर्व पैसे अंगावरील कर्ज उतरविण्यात गेले. बापूंची कौटुंबिक परिस्थिती त्यानंतर सुधारली आणि त्यांची साधारण ७७-७८ साली जालगावात स्वतःच्या मालकीचं घर घेतलं.

बापूंच्या जुन्या घरी बाबा फाटक व शांताबाई फाटक यांची तर वारंवार येजा असायची.स्वातंत्र्य चळवळीची अनेक खलबत त्यांच्या घरी चालायची. अप्पासाहेब पटवर्धन, सामंत गुरुजी आणि अनेक थोरामोठ्यांचा पदस्पर्श त्या वस्तूने अनुभवला.

बापूंना शेतीची पुष्कळ आवड होती. कोणतीही जमीन निकामी होऊ नये सर्व जमीन लागवडी खाली आणावी असे त्यांना वाटायचे. कलाम बांधण्यात तर त्यांचा हातखंडा होता. याशिवाय वाचनाची अतिशय आवड होती. दापोलीतल्या गोखले वाचनालयातील तर त्यांनी असंख्य पुस्तके वाचलेली.

बापू त्यांच्या शेवटच्या काळात बुलढाण्यात आपल्या मुलीपाशी ( विजया आहेर ) राहत होते. त्यांचे निकटवर्तीय श्री. वटे यांच्या घरी चार दिवसांकरिता राहण्यासाठी शेगावला गेले असताना तिथे त्यांचे निधन झाले. १८ डिसेंबर बुधवार १९९६ मार्गशीष शुद्ध नवमीला एक थोर देशभक्त पंचतत्वात विलीन झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here