टाळसुरे येथील पांडवकालीन लेणी

कोकण प्रांताला भगवान परशुरामाची शापित भूमी असे म्हणतात. मात्र ही भूमी लौकीकदृष्ट्या शापित दिसली तरी अनेक गोष्टींनी समृद्धही आहे. कोकणातील प्रत्येक गाव म्हणजे भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे एकेक पान आहे.

दापोली तालुक्यातील प्रत्येक गावात असे काही प्राचीन संदर्भ आहेत, जे सामाजिक किंवा सांस्कृतिक अनास्थेमुळे अजुनही सर्वांसमोर आलेले नाहीत. दापोली शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या टाळसुरे या गावातील काही पुरातन व ऐतिहासिक संदर्भ शोधण्याचा प्रयत्न टीम तालुका दापोलीच्या वतीने करण्यात आला आहे.

टाळसुरे येथील पांडवकालीन लेणी

श्रीमंत बाजीराव पेशवे यांची पत्नी काशिबाई यांचे माहेर असलेले हे टाळसुरे गाव. या गावात व आजुबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी काही ऐतिहासिक व पांडवकालीन खुणा दडलेल्या आहेत, याविषयी आधीपासूनच माहिती होती. मात्र या खाणाखुणा शोधण्याची आजपर्यंत कोणी म्हणावी तशी तसदी घेतली नव्हती.  वयोवृद्ध नागरिकांनी कथन केल्याप्रमाणे अशा ऐतिहासिक संदर्भांच्या खुणा व अनेक ठिकाणी पुरातन भग्नावशेष आढळून येतात. हा ऐतिहासिक वारसा जगासमोर  आणण्यासाठी त्या-त्या परिसरातील साफसफाई करणे आवश्यक होते. कित्येक वर्षांपासून पडलेला पालापाचोळा, माती, दगड, आणि अतिदुर्गम भाग यामुळे हे एकट्या दुकट्याचे काम नव्हतेच. मात्र www.talukadapoli.com (तालुका दापोली डाॅट काॅमच्या) पुढाकाराने टाळसुरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत व त्यांचे निवडक विद्यार्थी या कामी सहकार्य करण्यास तयार झाले. त्यानंतर संदेश राऊत, त्यांचे विद्यार्थी व स्थानिक इतिहासप्रेमी ग्रामस्थ यांच्या एकत्रित श्रमदानातून व सरपंच श्री प्रभाकर लाले आणि यांच्या सहकार्यातून हे पुरातन भग्नावशेष अगदी बऱ्यापैकी दिसू लागले.

खेर्डी जवळील जोगटेंबा येथे  एक विशाल गुहासदृश लेणी सापडली आहेत. या गुहेच्या वरील बाजूस कातळावर छत्तीस कोरीव खड्डे (मंडप घालण्यासाठी लागतात तशी नेमं) आहेत. या गुहेत आता वीस फुटांपर्यंत आत सहज जाता येते. ही गुहा खूप पुढेपर्यंत गेली असावी. मात्र कालौघात ही गुहा माती, दगडधोंडे व गाळाने पूर्णपणे भरून गेली आहे. पुरातत्त्व खात्याकडून अशा ऐतिहासिक व पुरातन अवशेषांची योग्य दखल घेतली गेली आणि या ठिकाणी आवश्यक खोदकाम व साफसफाई झाली तर या गुहेमध्ये गडप झालेल्या अनेक पुरातन संदर्भांचा अभ्यास व संशोधन करणे शक्य होणार आहे.

टाळसुरे या गावातून इतिहासप्रसिद्ध कोडजाई नदी आजही वाहते. ही नदी अतिप्राचीन व पुरातन आहे. आजही दापोली शहरास याच नदीच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. याच कोडजाई नदीच्या प्रदेशात पुरातन नागरी संस्कृती अतिशय समृद्ध स्वरुपात अस्तित्वात होती असा अंदाज आहे. या कोडजाई नदीच्या प्रदेशात सापडलेली लेणी, गुहा,  पाण्याचे दगडी पाट, वाघबीळे पाहिली की या अंदाजास वास्तविक पुष्टी मिळते. पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात याच कोडजाई नदीच्या प्रदेशात सर्वाधिक काळपर्यंत वस्ती करून होते असे उल्लेख सापडले आहेतच. याच उल्लेखांवरुन असे दिसते की, त्याच काळात या प्रदेशात अशी नागरी संस्कृती विकसित झाली असावी. येथील बोरघर परिसरात अशाच प्रकारचे छोटे पांडव मंदिर आढळून येते तर वयस्कर ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार येथे पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कातळ शिल्प या बद्दल अधिक अभ्यास व संशोधन करणे शक्य होईल.

टाळसुरे येथील कातळात अशी  अर्धवट खोदकाम केलेली अपूर्ण अवस्थेत दिसणारी लेणी सापडली आहेत. यांपैकी अनेक लेणी मातीने भरून गेल्याने लेण्यांपर्यंत पोचता येत नाही. या लेण्यांमध्ये प्रवेश करताना बसूनच जावे लागते. येथीलच एका लेण्यामध्ये साफसफाई करताना एक किंचित भग्नावस्थेतील पण खूप रेखीव  दगडी आढळून येते.चार भूजा असलेल्या या मूर्तीच्या भुजांमध्ये तलवार व ढाल यांसारखी शस्त्रे आहेत. येथून काही अंतरावर अशाच प्रकारची भग्नावस्थेतील लेणी आढळली आहेत. या लेण्यांपर्यंत पोचता यावे यासाठी अधिक व आवश्यक खोदकामाची गरज आहे. या लेण्यांचा आतील भाग मोकळा झाल्यास या लेण्यांध्ये तत्कालीन नागरी संस्कृती अधोरेखित करणारे अनेक संदर्भ आढळतील असे वाटते.

 

 आपटी परिसरातील वाघबीळ व लेणी

येथील आपटी परिसरातही अशी लेणी आढळली आहेत. येथे वाघबीळ या नावाने परिचित असलेली एक लांबलचक गुहा आहे. पुर्वीच्या काळात वाघासारख्या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी कातळात व जंगलात अशी वाघबीळे खोदलेली असत. संकटकाळात गुप्त व सुरक्षित मार्ग म्हणुनही अशा बाघबीळांचा वापर होत असे. आपटी येथील अशा प्रकारच्या वाघबीळवजा गुहेत साधारण १५-२० फुटापर्यंत सहज वावर करता येतो मात्र हे वाघबीळ मातीने भरलेले असल्याने या गुहेत जास्त दूरपर्यंत जाणे शक्य होत नाही. येथून जवळच असलेल्या भोमेश्वर मंदिर परिसरातही अशाच प्रकारचे पुरातन संदर्भ व भग्नावशेष आढळले आहेत. या परिसरात भग्नावस्थेतील अनेक दगडी मूर्त्या, ऐतिहासिक ठेवीं बाबतच्या अनास्थेमुळे अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या सर्व मूर्त्या आज भग्नावस्थेत असल्या तरी त्यांची घडणावळ पाहता पुरातन काळात या प्रदेशात अतिशय समृद्ध नागरी वस्ती व मंदिरे असावीत याची खात्री पटते.  या मूर्त्यांची आजची अवस्था पाहता पुरातन वस्तुंबाबतची बेफिकीरी आपल्या पुरातन सांस्कृतिक वारशांचा ऱ्हास करु शकते.

सिंधुसंस्कृतीसारखी नागरी संस्कृती

टाळसुरे परिसरात आढळलेली ही सर्व लेणी कोडजाई नदीच्या प्रदेशात आहेत. टाळसुरे येथील लेणी व भग्नावशेष, दगडी कालवे, पुढे पन्हाळेकाझी येथील लेणी यांमध्ये खूप साधर्म्य आहे. लेण्यांची रचना, प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावरील दगडी कोरीवकाम,  लेण्यांमधील खोल्यांची रचना, दिवाणखाने, भग्नावस्थेतील दगडी मूर्त्या, शयनगृहे दाभोळ येथील चंडीका मंदिरातील अंतर्गत गृहरचना, भुयारे यांमध्ये खुपच साधर्म्य आहे. पुरातन काळात कोडजाई नदीच्या प्रदेशात सिंधु संस्कृतीसारखीच समृद्ध अशी नागरी संस्कृती अस्तित्वात असावी असे वाटते.

अधिक संशोधनाची गरज

टाळसुरे परिसरात आढळलेल्या या पुरातन लेण्यांचा अधिक बारकाईने व शास्त्रशुद्ध अभ्यास व संशोधन होणे आवश्यक आहे. या बाबतीत पुरातत्त्व खात्याने गांभीर्यपूर्वक पावले उचलल्यास एका समृद्ध पुरातन नागरी संस्कृतीचे एक नवे पर्व इतिहासप्रेमींसाठी खुले होईल. या परिसरातील सर्व पुरातन अवशेषांची साफसफाई, आवश्यक खोदकाम व उत्खनन केल्यास येथील पुरातन नागरी संस्कृतीबद्दल अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. शासनाच्या पुरातत्त्व खात्याने टाळसुरे,आपटी, बोरघर परिसरात आढळलेल्या अशा ऐतिहासिक पुरातन भग्नावस्थेतील गुहा, लेणी, कालवे व वाघबीळांचे अधिक संशोधन करुन या भग्नावस्थेतील लेण्यांबद्दलची अधिक माहिती मिळवावयास हवी असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here