स्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर

0
3681

स्वातंत्र्यसैनिक शिवराम भिकू मुरकर यांचा जन्म दाभोळ, ता.दापोली, जि.रत्नागिरी येथे झाला. त्यांना पाठीवर दोन भाऊ व दोन बहिणी. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी शिवराम मुरकरांवर होती. दाभोळला मत्स्य व्यवसाय व हॉटेलचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी ब्रिटीशविरोधी चळवळीत सहभाग कधी घेतला याची आज कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दुर्दैवाने त्यांच्या जीवनाची संगतवार माहिती सांगणारे देखील कोणी हयात नाही. जी माहिती मिळते ती अतिशय अल्प आणि त्रोटक आहे.

शिवराम मुरकर हे दाभोळ बंदर परिसरात राहत असल्यामुळे आणि त्यांचा व्यवसाय बंदरावरचा असल्यामुळे बाहेरून येणारे संदेश ते इथल्या क्रांतिकारकांपर्यंत, भूमिगतांपर्यंत पोहचवीत असत, असे सांगितले जाते. १९३० ला त्यांना मुंबईला अटक झाली होती. ती अटक ब्रिटीशविरोधी गुप्त कारवाया करीत असल्यामुळे  करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांना जवळपास दोन-अडीच वर्षांची शिक्षा झाली. काही वर्षानंतर ते दाभोळ सोडून कायमचे दापोलीला आले. दापोलीत त्यांनी घर बांधलं आणि एस.टी.ची कॅन्टीन चालवायला घेतली. त्यांना घर बांधण्यासाठी सामान खुद्द ‘बाबूरावजी बेलोसे’ यांनी पुरवलं. मुरकरांचे बाबा फाटकांपासून थेट यशवंतराव चव्हाणांपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे कॅन्टीन बंद करून त्यांनी ‘समता लंच होम’ चालू केले. ते चालवित असताना दुसऱ्या बाजूने त्यांची समाजसेवादेखील चालू होती. दापोलीत शिक्षणासाठी, दवा-औषधासाठी आलेल्या गरजू लोकांची ते राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्था करीत असत.

त्यांच्या गौरवार्थ दिलेली सन्मानपत्रे, ताम्रपट आणि नेहमीच्या वापरातील काही वस्तू मुरकर कुटुंबीयांकडे उपलब्ध आहेत. या थोर देशभक्ताची २३ डिसेंबर १९७७ रोजी प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here