पावसाच्या पाण्याची शेती | पागोळी वाचवा अभियान

0
1391

आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात कोणतीही घट झालेली नसतानाही निर्माण झालेली पाण्याची टंचाई आणि त्यातूनच उद्भवणाऱ्या पर्यावरणाच्या इतर अनेक समस्यांचं निराकरण होऊन त्या दूर होण्याऐवजी अधिकाधिक गंभीर होत चालल्या आहेत.

सर्वत्र पाण्याची मुबलक प्रमाणातली उपलब्धता हाच जमिनीवरच्या बहुतांश पर्यावरणीय समस्यांवरचा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे पाण्याची समृद्धी हे आपलं प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि असायला हवं. पाणी समृद्धीच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्याअगोदर जमिनीच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या साठ्यांपेक्षा भूगर्भातील भरलेले पाण्याचे साठे आणि भूगर्भामध्ये जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली आठदहा फुटांवर असणारी पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता म्हणजेच पाण्याची खरी समृद्धी आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं.

खूप वर्षांपूर्वीपर्यंत भूगर्भातील हे पाण्याचे साठे पूर्ण क्षमतेने भरलेले होते आणि त्यांचं नियमितपणे पुनर्भरणही होत होतं. त्यामुळेच जमिनीखालच्या पाण्याची जमिनीच्या वरच्या स्तरापर्यंतची पातळी राखण्यात आपण यशस्वी होत होतो. परंतु नंतरच्या काळात हळूहळू विविध कारणांमुळे आपल्याला त्यामध्ये अपयश येत गेलं आणि भूगर्भातील पाण्याची ही पातळी अधिकाधिक खाली जाऊन आपल्या आवाक्याबाहेर गेली. त्याचं पर्यवसान भूगर्भातील पाण्याचे साठे संपुष्टात येण्यामध्ये झालं. आपण स्वीकारलेल्या चुकीच्या विचारसरणीमुळे झाल्या गोष्टींमागच्या कारणांचा आणि त्यावरील उपायांचा शोध न घेता आपण आपलं संपूर्ण लक्ष भूपृष्ठाच्यावर पाणी साठवण्यावर केंद्रित केलं. परंतु पावसाचं पाणी भूपृष्ठावर साठवण्याला काही मूलभूत आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या खूप मर्यादा असून त्या आपली पाण्याची वाढती गरज कदापि पुरी करू शकणार नाही आणि असं करण्यामुळे आपण जमिनीवरच्या पर्यावरणाला विनाशाच्या खाईत लोटत आहोत याचा आपण कधी विचारच केला नाही.

‘पाणी समृद्धी’च्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल चालू करण्याच्या अगोदर पूर्वीच्या काळी कोणकोणत्या कारणांमुळे भूगर्भातील पाण्याचे साठे भरलेले रहात होते, जमिनीचं पुनर्भरण कशाप्रकारे होत होतं आणि कशामुळे पाण्याची पातळी जमिनीच्या वरच्या स्तरात रहात होती हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याकाळी जमिनीचा बराच मोठा पृष्ठभाग हा शेती, झाडंझुडपं आणि जंगलांनी व्यापलेला होता. शेतीने व्यापलेला जमिनीचा खूप मोठा पृष्ठभाग हा नियमितपणे नांगरला जात असल्यामुळे ही नांगरलेली शेतं म्हणजे पावसाचं पाणी जमिनीच्या आतमध्ये जाण्याचे महामार्ग होते. त्याच्या जोडीने झाडं, झुडपं आणि जंगलांनी व्यापलेला जमिनीचा बराच मोठा पृष्ठभाग आणि त्यावरील झाडाझुडपांच्या मुळांच्या अस्तित्वाने सच्छिद्र झालेली ती जमीनदेखील पावसाचं पाणी जमिनीमध्ये जीरवण्याचं एक मोठं साधन होतं. ही शेतं, झाडं झुडपं आणि जंगलांनी व्यापलेल्या खूप मोठ्या भूपृष्ठाच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा जमिनीच्या आतमध्ये जाण्याचा हा प्रवास पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये सातत्याने चालू असायचा. पावसाचं पाणी संथगतीने का होईना परंतु एका ठराविक नैसर्गिक प्रक्रियेने जमिनीच्या या बऱ्याच मोठ्या पृष्ठभागाच्या माध्यमातून या चार महिन्यात सातत्याने जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जिरत असायचं. जमिनीच्या या पुनर्भरण प्रक्रियेमध्ये पाऊस, शेती, झाडं झुडपं, जंगलं यांच्या जोडीने सामान्य माणसाचा मोठा सहभाग असायचा, कारण पावसाचं पाणी जमिनीमध्ये जीरवण्यासाठीची शेती, झाडंझुडपं, जंगलं ही सर्व साधनं त्या काळात सर्वसामान्य माणसांच्या हातात होती आणि या संपूर्ण प्रक्रियेशी केवळ आणि केवळ सर्वसामान्य माणूस निगडित होता.

काळाच्या ओघात शेतीचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि जमिनी पडीक झाल्या. नांगरणीअभावी जमिनीमध्ये पावसाचं पाणी जीरवण्याची त्यांची क्षमता कमी झाली. विकासाच्या नावाखाली झाडं झुडपं आणि जंगलांवरदेखील गंडांतर आलं. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनी उजाड झाल्या आणि पावसाचं पाणी शोषून घेणारा मातीचा वरचा थर सैल झाल्यामुळे पावसाच्याच पाण्याने धुऊन गेला. त्यामुळे हळूहळू शेती, झाडं झुडपं आणि जंगलांनी आच्छादलेल्या जमिनीच्या पृष्ठभागाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झालं. पावसाचं पाणी जमिनीमध्ये शिरण्याच्या मार्गांमध्ये लक्षणीयरीत्या घट झाली. काही मार्ग आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे बंद झाले तर काही आपण स्वीकारलेल्या आपल्या नवीन विचारसरणीमुळे विकासाच्या नावाखाली आपण स्वतःच उध्वस्त केले. त्याचा परिणाम म्हणून जमिनीमध्ये जिरणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रमाणात कमालीची घट होऊन जमिनींचं पुनर्भरण थांबलं. शेती, झाडंझुडपं आणि जंगलांच्या नाहीसं होण्याच्या बरोबरीनेच या प्रक्रियेशी निगडित असलेल्या सर्वसामान्य माणसांचा या सगळ्याशी असलेला संबंध संपुष्टात आला. जमीन पुनर्भरणासंबंधातल्या सर्वच गोष्टी त्याच्या आवाक्याबाहेर गेल्या आणि एकट्या दुकट्याने त्या करणं अवघड आणि अशक्य होऊन बसलं. परिणामतः जमीन पुनर्भरणाचे सर्व उपाय हे सरकार आणि नोकरशाही नामक व्यवस्थेच्या हातात गेले. त्याचे परिणाम काय झाले आणि काय होत आहेत ते आपण पाहतोच आहोत.

आता पुन्हा जर आपल्याला भूगर्भातील पाण्याची पातळी पूर्वस्थितीला आणायची असेल तर पुन्हा एकदा सामान्य माणसांनी त्याबद्दल विचार आणि त्यासाठीची कृती करायला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ते कदापि होणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. खरं तर गोष्टी खूप साध्या असतात आणि साध्या साध्या गोष्टींमध्येच खूप मोठं उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता असते. ह्या साध्या सोप्या गोष्टी ओळखण्याची क्षमता सर्वसामान्य माणसांमध्येच असते. ती क्षमता पुन्हा एकदा जागृत करण्याची वेळ आता आली आहे.

भूगर्भातील पाण्याची पातळी पुन्हा पूर्वीइतकीच वाढवण्यासाठी आपल्यासमोर दोन मार्ग उपलब्ध आहेत. त्यातला पहिला मार्ग म्हणजे, शेती, झाडं झुडपं आणि जंगलांचं प्रमाण पुन्हा पुर्वीइतकंच वाढवून पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये जिरवू शकेल असा जमिनीचा खूप मोठा पृष्ठभाग पुन्हा तयार करणं. त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली बदलून पुन्हा शेती, झाडं झुडपं आणि जंगलांची निर्मिती इत्यादी गोष्टींची कास धरावी लागेल. हे कालचक्राला उलट फिरवण्यासारखं असल्यामुळे जवळपास अशक्य आहे हे स्पष्ट आहे. दुसरं म्हणजे ज्या जमिनींच्या सहाय्याने आपण हे सर्व करण्याचे मनसुबे रचत आहोत त्या जमिनींमधील ओलावा आणि जिवंतपणा नष्ट होऊन त्या जमिनी बऱ्याच काळापासून वाळवंटात रूपांतर होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील वीस ते पंचवीस वर्षात पृथ्वीवरील नव्वद टक्के जमिनींचं वाळवंटात रूपांतर झालेलं असेल हे सत्य जर आपण जाणून घेतलं तर त्यातलं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शेती, झाडं झुडपं आणि जंगलं या तिन्ही स्तरांवर आपण खूप प्रयत्न करत आहोत असं वरकरणी जरी दिसत असलं तरी आपले प्रयत्न आणि त्यांचे परिणाम हे दोन्ही आभासी आणि स्वतःचीच दिशाभूल करणारे आहेत हे परखड सत्य आपल्याला मान्य करावं लागेल. अगोदर जमिनींचं वाळवंटीकरण होण्यासाठी कारणीभूत व्हायचं आणि नंतर त्या वाळवंटात जंगलांची निर्मिती करण्याची स्वप्न पहायची हा अव्यापारेशुव्यापार आपण मागील काही वर्ष करत आहोत. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी राबवल्या जाणाऱ्या सध्याच्या पद्ध्ती आणि प्रक्रिया पाहता ही एक अतिदीर्घकालीन किंवा कदाचित मृगजळसदृश प्रक्रिया असून तेव्हढा वेळ आता आपल्या हातामध्ये राहिलेला नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या जमिनी पुन्हा जिवंत कराव्या लागतील. त्यामुळे हा मार्ग आपल्यासाठी जवळपास बंद असल्यासारखाच आहे.

पावसाचं पाणी जीरवू शकेल असा जमिनीचा मोठा पृष्ठभाग तयार करून त्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी जमिनीमध्ये जिरवणं यापुढे अशक्य आहे हे मान्य केलं तर आपल्याला दुसरा मार्ग शोधणे भाग आहे. आतापर्यंतच्या जमीन पुनर्भरणाच्या प्रक्रियेमध्ये जमिनींचा मोठा पृष्ठभाग, जमिनीची पाणी धारण क्षमता आणि जमिनीमध्ये पाणी जिरण्याचा वेग या तीन महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्या निसर्गतत्वाला धरूनच वागत होत्या. परंतु सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये या तिन गोष्टींमूळेच आपल्या उद्दिष्टाला मर्यादा पडत असल्यामुळे, या तिन्ही गोष्टींवर मात करेल असा मार्ग निवडणे आपल्याला भाग आहे. याचाच अर्थ जमिनीच्या लहानात लहान पृष्ठभागाच्या माध्यमातून जमिनीचा पाणी धारण क्षमतेचा नियम (rule of water absorption capacity of land) आणि जमिनीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगाचा नियम (rule of water percolation or rate of water percolation) या दोन नियमांवर मात करू शकेल असा मार्ग आपण निवडायला हवा.

यासाठी जमिनीच्या लहानात लहान पृष्ठभागाचा वापर करून त्या पृष्ठभागाच्या माध्यमातून जमिनीच्या आणि इमारतींच्या मोठ्या पृष्ठभागावर पडणारं आणि नंतर जमिनीवरून वाहून जाणारं पावसाचं पाणी एका जागी गोळा करून ते जमिनीचा पाणी धारण क्षमतेचा नियम (rule of water absorption capacity of land) आणि जमिनीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगाचा नियम (rule of water percolation), या दोन्ही नियमांवर मात करून नेहमीपेक्षा खूप जास्त वेगाने जमिनीमध्ये जिरवण्याची पद्धत आपल्याला वापरावी लागेल. ही पद्धत कोणती, तिचा कशाप्रकारे वापर करून जमिनीमध्ये पाणी जिरण्याची ही प्रक्रिया वेगवान करायची आणि लहानमोठ्या इमारती तसंच जमिनीच्या खूप मोठ्या म्हणजे काही हजार चौरस मीटर पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पडणारं पावसाचं पाणी जमिनीच्या केवळ एक चौरस मीटर पृष्ठभागाच्या माध्यमातून आत्यंतिक वेगाने जमिनीमध्ये कसं जिरवायचं याचीच माहिती “पागोळी वाचवा अभियान” आपल्याला देतं.

[इमारतींवर तसंच जमिनीच्या खूप मोठ्या पृष्ठभागावर पडणाऱ्या आणि वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला गोळा करून जमिनीच्या केवळ एक चौरस मीटर जागेच्या माध्यमातून एकही थेंब इकडे तिकडे वाहून न जाऊ देता मोठ्या वेगाने भूगर्भात सोडण्याच्या या पद्धतीलाच आपण “पावसाच्या पाण्याची शेती” (rainwater farming) म्हणूया. निसर्गाच्या ‘ जमीन पाणी धारण क्षमतेचा नियम (rule of water absorption capacity of land)’ आणि ‘जमिनीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगाचा नियम ( rule of water percolation)’ या दोन नियमांना छेद देणारी किंवा त्यावर मात करणारी ही पद्धत किंवा व्यवस्था निसर्गाच्याच ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम’ (law of universal gravitation) आणि ‘पाण्याच्या समपातळीचा नियम (rule of water level)’ या साध्या सोप्या निसर्गनियमांवर आधारित आहे. जमिनीच्या पोटात जाणाऱ्या पाण्याला पृष्ठभागावर येऊन इतरत्र वाहण्यास प्रतिबंध केला तर ते कोंडलं जाऊन गुरुत्वाकर्षणाने जमिनीच्या वर वर येणाऱ्या पाण्याचा प्रवास वेगाने भूगर्भातील पाण्याच्या पातळीच्या दिशेने सुरू होतो.]

“घराच्या किंवा इमारतीच्या छपरावर तसंच पर्वत, डोंगर, टेकड्या आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पडणारं आणि एरव्ही वाहून जाणारं पावसाचं पाणी गोळा करून किंवा दिशादर्शीत करून, त्याच्या इतरत्र वाहण्याला प्रतिबंधित करून ते पाणी एक घनमीटर म्हणजे एक मीटर × एक मीटर × एक मीटर (लांबी, रुंदी, खोली) आकाराच्या, आतून पूर्णपणे मोकळा असलेल्या आणि केवळ जमिनीच्यावर चहुबाजूंच्या सीमा एक फूट उंचीच्या वीट बांधकामाने बंदिस्त केलेल्या खड्ड्यामध्ये बांधकामाच्या वरून जमिनीमध्ये जिरण्यासाठी सोडणं” या केवळ एका वाक्यात मावेल अशी ही पद्धत किंवा व्यवस्था आहे. ही एक अत्यंत साधी, सोपी, अल्पखर्चीक, तंत्रज्ञान विरहित आणि एकट्या माणसालाही सहजपणे त्याच्या घरात आणि शिवारात आमलात आणता येईल अशी परंतु अत्यंत प्रभावी अशी पद्धत किंवा व्यवस्था आहे.

“पावसाच्या पाण्याची शेती” (rainwater farming) ही एक व्यवस्था आहे. “एका माणसाने, केवळ एकच कृती, संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच करण्याची” अशी ही दीर्घकाळ टिकणारी व्यवस्था आहे. घर आणि जमीन असणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाने “पागोळी वाचवा अभियान” सांगत असलेली ही ‘पावसाच्या पाण्याची शेती (rainwater farming)’ करण्यासाठी त्याच्या संपूर्ण आयुष्यात जर एकदाच अशी व्यवस्था निर्माण केली तर आपल्या भूगर्भातील रिकामे झालेले पाण्याचे साठे पुन्हा भरण्यास आणि भूगर्भातील पाण्याची कायमस्वरूपी पातळी जमिनीच्या वरच्या स्तरापर्यंत येऊन स्थिरावायला आणि आपल्याला अभिप्रेत असलेली पाण्याची समृद्धी आपल्या जमिनीच्या खाली दोन हातांवर यायला अधिक वेळ लागणार नाही.

पुन्हा पूर्वीसारखी पाण्याची समृद्धी आपल्याला हवी असेल तर आपल्याला शेतात बियाणं पेरल्यासारखं पावसाचं पाणी जमिनीमध्ये पेरावं लागणार आहे. पावसाचं पाणी आपण जमिनीत पेरलं तरच आपल्याला आवश्यक असलेलं पाणी भविष्यात धान्याच्या वेगाने आणि धान्याच्याच प्रमाणात उगवणार आहे. पाण्याच्या समृद्धीचं आपलं उद्दिष्ट वेगाने साध्य करायचं असेल तर, “पावसाच्या पाण्याच्या शेती”चं (rainwater farming) हे नवीन साधं, सोपं साधन सर्वसामान्य माणसांनी इतर कुणाही बाह्य शक्ती किंवा व्यवस्थांवर अवलंबून न राहता पुन्हा एकदा स्वतःच्या हातात घ्यायला हवं. स्वतःच्या घराच्या छपरावर आणि स्वतःच्या आवारात, शिवारात आणि गावात पडणारं पावसाचं पाणी इतरत्र कुठेही वाहू न देता त्या पाण्याला वर सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी तयार केलेल्या एक चौरस मीटर क्षेत्रफळाच्या खड्डयांमध्ये पेरायला हवं.

“पावसाच्या पाण्याची शेती (rainwater farming)” हे एक अत्यंत प्रभावी तंत्र असून त्यामध्ये भूगर्भातील पाण्याचे साठे वेगाने वाढण्याबरोबरच, पाणीटंचाई संपणं, जमिनींमधील ओलावा कायमस्वरूपी वाढणे, जमिनींमधील जीवसृष्टीचं पुनर्जीवित होणं, वाळवंटीकरणाकडे झुकलेल्या जमिनी पुनर्जीवित होणं, गावातील नद्या, नाले गाळमुक्त होऊन बारमाही वहायला सुरवात होणं, पुनर्जीवित झालेल्या जमिनीमध्ये झाडं झुडपं आणि जंगलांची आपोआप निर्मिती सुरू होणं, जमिनीचं तापमान कमी होणं, जमिनींची (मातीची) धूप थांबणं, धरणं, तलाव इत्यादींची ताकद वाढणं, पिकपद्धतीवर हुकूमत मिळणं, अवकाळी पावसापासूनच्या पीक नुकसानिवर नियंत्रण मिळणं, दुष्काळ आणि अवर्षण दोन्हीपासून संरक्षण मिळणं, महापूरासारख्या गोष्टींवर नियंत्रण मिळणं, कारखानदारीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणं, पाणी या विषयासाठी नियमितपणे होणाऱ्या वाढत्या खर्चाला आळा बसणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात पाण्यासाठी होऊ पाहणारा मानवी संघर्ष टळणं आणि मानवी भविष्य सुरक्षित होणं अशाप्रकारचे अनेक फायदे लपलेले आहेत. यापुढे पाणी ही “समस्या” न राहता खऱ्या अर्थाने “जीवन” व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला “पागोळी वाचवा अभियान” सांगत असलेल्या “पावसाच्या पाण्याची शेती” (rainwater farming) या नवीन संकल्पनेची कास धरण्याची आवश्यकता आहे.

 

सुनिल प्रसादे.
पागोळी वाचवा अभियान,
दापोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here