भासे येथिल स्वर्ग आणिक
जणू स्वर्गातील नंदनवन
फणसापरि रसाळ नाती
ते माझे कोकण…!
कितिक लेणी कितिक शिल्पे
इथे नररत्नांचे कोंदण
कलागुणांचे माहेर वसते
ते माझे कोकण…!!
कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच! निसर्गाचा वरदहस्त लाभलेला एक पुण्यप्रदेश. या भूमीत जन्माला आलेला प्रत्येकजण हा जन्मतःच एखादी उपजत कला सोबत घेऊनच जन्माला येतो. कोकणी भूमीने अशी अनेक नररत्ने संपूर्ण कलाविश्वाला बहाल केली आहेत. याच नितांतसुंदर कोकणातला एक छोटासा प्रदेश म्हणजे दापोली. कला, शिक्षण, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा विविध प्रातांत चमकलेले अनेक हिरे या दापोलीच्या मातीत जन्मले. केवळ कला हा प्रांत विचारात घेतला तरीही कलाजगतावर आपल्या कर्तृत्ववाचा अजरामर ठसा उमटविलेले अनेक कलावंत या दापोलीच्या भूमीत जन्मले. ख्यातनाम कलाकार व कलादिग्दर्शक नितीन देसाई, ख्यातनाम चित्रकार बाळ सूरजन ही या पंक्तीतली काही ठळक नावे. आगदी अलिकडच्या काळात आपल्या अंगी असलेल्या विविध कलारंगानी दापोली प्रांतातील कलांगण सजवणारे, एक उमदे कलाकार म्हणून आपल्या कलाकर्तृत्वाचा अल्पावधीतच ठसा उमटविलेले कलाकार म्हणून दापोली येथील राजू आग्रे याचा उल्लेख करावा लागेल.
दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात लॅब असिस्टंट पदावर कार्यरत असलेले राजू आग्रे दापोलीच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत. चित्रकला, शिल्पकला, लाकडावरील कलाकुसर, बांबू आर्ट, पुठ्ठा आर्ट, पी.ओ.पी. आर्ट, थर्माकोल आर्टच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत दापोली येथील राजू आग्रे यांनी एकाहून एक सरस अशा अनेक कलाकृती साकारल्या आहेत. दापोली येथील प्रसिद्ध दापोलीचा राजा हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध सामाजिक संवेदनांवर प्रकाशझोत टाकून नवे सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे गणेशोत्सव काळात आयोजित करते. या मंडळाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचे सगळे देखावे राजू आग्रे यांच्याच हस्तकौशल्यातून साकारले आहेत. आता हाच एक देखावा बघा ना. आपल्या देशातील अभिजात राष्ट्रीय एकात्मतेचे वास्तव दर्शन घडविणारा हा एक जणू जीवंत देखावा राजू आग्रे यांनीच साकारला आहे. सर्वधर्म समभाव आणि बंधुत्वाचे आत्मिक दर्शन घडविणारा हा चलचित्र देखावा राजू आग्रे यांनी किती छान स्वरुपात साकारला आहे हे पाहताक्षणीच नजरेत भरते. आपल्या हस्तकौशल्यातून त्यांनी जणू या देखाव्यात जीव ओतला आहे. अशाच प्रकारचे अनेक चलचित्र देखावे दरवर्षी सादर करुन राजू आग्रे यांनी आपल्या हस्तकौशल्याने कलारसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. कोकण कृषी विद्यापीठामार्फत आयोजीत होत असलेल्या पालवी महोत्सवात कोकणातील पारंपरिक शेती व फळलागवड यांवर प्रकाशझोत टाकणारे अशाच प्रकारचे अनेक देखावे राजू आग्रे यांनी आतापर्यंत सादर करुन अनेकांची वाहवा मिळविली आहे. आता आपण पाहत असलेले पारंपारिक व आधुनिक शेतीची सांगड घालणारे कृषी प्रकल्प व पद्धती, पाणी अडवा – पाणी जिरवा, डोंगरउतारावरील उपयुक्त पारंपरिक शेती यांसारखे देखावे सादर करुन राजू आग्रे यांनी कोकणातील शेती अधिक ग्लोबल केली आहे. याशिवाय बांबू व नारळ यांपासून त्यांनी अनेक आकर्षक कलाकृती बनविल्या आहेत. अख्ख्या नारळापासून कोरून तयार केलेली गणेशमूर्ती, नारळाच्या सोडणांपासून तयार केलेले खोडकिडा, फळमाशी यांसारख्या कलाकृती, करवंटीपासून तयार केलेल्या विविध नक्षीदार आकारांच्या फुलदाण्या, पक्षी व प्राण्यांच्या प्रतिकृती साकारून त्यांनी दापोलीच्या कला प्रांताला निश्चितपणे अधिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
राजू आग्रे यांना त्यांच्या बालपणापासूनच कलागुणांची आवड असली तरी त्यांनी अतिशय कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सरावातून आपली कला अधिक परिपक्व व दर्जेदार कशी होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे. शालेय जीवनातही विविध कलाविषयक स्पर्धांमध्ये त्यांनी विविध पुरस्कार व प्राविण्य मिळविले आहे. त्यांनी या कलाविष्कारांचे कुठेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नसले तरी त्या त्या कलाप्रकारातील जाणकारांच्या कारागिरीचे बारकाईने निरीक्षण व अभ्यास करून सरावाने त्या त्या कलाप्रकारात प्राविण्य मिळविले आहे. सुरुवातीला मुंबईत असताना मातीपासून गणेशमूर्ती बनविणे, दुकानांच्या नावांचे बोर्ड व पाट्या रंगविणे, दुकानांच्या शटरवर जाहिराती रंगविणे, लग्न किंवा बारशानिमित्त नक्षीदार नावे तयार करणे, गणेशमंडळांचे चित्रदेखावे साकार करणे, नाटक व चित्रपटाच्या सेटवर काम करणे अशा प्रकारच्या अनेक परिश्रमांतून राजू आग्रे यांचे कलागुण दिवसेंदिवस बहरत गेले. आज दापोलीच्या किंबहुना कोकणाच्या कलाक्षेत्रात राजू आग्रे यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो तो यामुळेच.
कोकणातल्या लाल मातीत राजू आग्रे यांच्यासारखे अनेक नैसर्गिक व उपजत कलाकार दडलेले आहेत. नैसर्गिक व भौगोलिक वातावरणामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा, कोकणच्या मातीतल्या अशा काही उपजत कलाकारांच्या कलागुणांचे म्हणावे तसे चीज झाले नाही. मात्र अशा कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप आता आपणच द्यायला हवी. आता आम्ही तशी सुरुवातही केली आहे. कोकणच्या या पुण्यभूमीत दडलेला असा एक एक कोहिनूर हिरा केवळ कोकणच नाही तर अवघ्या जगासमोर आणण्याचा आमचा ध्यास आहे. दापोलीसारख्या प्रसिद्धीच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या प्रांतात राहूनही विविध कलाविष्कार साकार करणाऱ्या या अवलिया कलाकारास तालुका दापोलीचा मानाचा मुजरा!
दर्याची गाज
निसर्गाचा बाज
सुंदरतेने नटली
सौंदर्याची खाण
सृष्टीचे वाण
तुमचे आमचे
मानाचे पान
तालुका दापोली…!!