दापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर

0
2639

दापोली तालुक्यातील कोळबांद्रे या गावात माड – पोफळी, बारमाही  वाहणारी नदी, विरळ लोकवस्ती यांच्या साक्षीने वसलेलं स्वयंभू श्री भगवान शंकराचं ‘डिगेश्वर मंदिर’. हे एक प्राचीन देवस्थान असून पूर्वी या मंदिराच्या जागेत शेती केली जात असे. हि शेती दाभोळ मधील श्री. लोखंडे यांची असल्याने ते या ठिकाणी शेती करीत असायचे. एकदा या जमिनीत नांगरणी सुरु असताना नांगराचा फाळ जमिनित एका ढिगामध्ये खोलवर रुतून बसला. ज्या ठिकाणी फाळ रुतला गेला तिथून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. हा प्रवाह वाहत जाऊन नजिकच्या तळीला जाऊन मिळाला व त्या तळीतील पाणी कधीही आटलेले नाही. ज्या ढिगात नांगराचा फाळ रुतला व प्रवाह सुरु झाला अगदी तिथेच शंकराची पिंडी वर आली. हि चमत्कारिक गोष्ट संपूर्ण गावात पसरली. काही दिवसातच या पिंडीची मंत्रपठण करून शास्त्रोक्त पध्दतीने स्थापना करण्यात आली त्याचसोबत सन १८११ साली मंदिराची स्थापना करण्यात आली. हि शंकराची पिंडी एका ढिगातून वर आल्याने ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला असावा व त्यामुळेच या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले;अशी आख्यायिका गावकरी सांगतात. काही काळानंतर गावकऱ्यांनी इतर देव देवतांच्या म्हणजे गणपती, नंदी, चंडीका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाईदेवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी इत्यादी देवदेवतांची स्थापना करण्यात आली. डिगेश्वरासह सर्व देवदेवतांची पूजा गावाचे ‘पाटील’ करत होते परंतु इथे शंकराची स्वयंभू पिंडी असल्याने शंकराच्या पिंडीची स्थापना करण्यासाठी लिंगायत ब्राह्मण असतात असे तेथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे येथे मंत्रपठण, होमहवन करून , मुर्त्यांचे शुद्धीकरण करून तेव्हापासून ते आजपर्यंत गुरवच पूजा करीत आहेत. हा गुरुवांचा पूजेचा कालावधी एक एक वर्षाचा असतो. दुसऱ्या वर्षी दुसरा गुरव पूजा करतो आणि डिगेश्वराच्या गाभाऱ्यात फक्त गुरुवांनाच प्रवेश दिला जातो, असे गावकरी सांगतात. या मंदिराचे अध्यक्ष म्हणून श्री. कृष्णा बेर्डे कार्यरत आहेत.

हे देवस्थान ब्रिटीश काळातील असून पूर्वी ह्या मंदिराच्या भिंती पूर्णतः मातीच्या होत्या. काही काळानंतर म्हणजे सोमवार दिनांक २५/५/२०१५ रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला. या डिगेश्वराच्या बाजूला दोन मंदिरे असून इतर स्थापित देव देवतांचे उत्सवही साजरे होतात. महाशिवरात्रीला डिगेश्वरावर दुधाचा अभिषेक वाहिला जातो. रात्री लहान मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात तसेच भजन, कीर्तन सादर होत असते. नवरात्रीत चंडीका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाई देवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी या देवींचे उत्सव साजरे होत असतात. दर तीन वर्षांनी अधिक महिन्यात देवी कोटेश्वरी – कोळबांद्रे व देवी कोटेश्वरी – सडवली या दोन देव्यांच्या पालख्यांचे मिलन सडवली – कोळबांद्रे येथील नदीवर होते. याचे कारण कोळबांद्रे येथील कोटेश्वरी देवी व सडवली येथील कोटेश्वरी देवी या एकमेकींच्या सख्या भगिनी आहेत, अशी आख्यायिका आहे. फुलांचा हार करून पालख्या सजवतात, देवींना रूपे चढवली जातात, दोन्ही गावचे मानकरी पालखीसह नदीवर जातात. देवींची खणा नारळाने ओटी भरली जाते, गुरव नैवेद्य दाखवतात, नदीच्या काठावर पालख्यांचे नाचवणे – खेळवणे होते. हे सर्व उत्सव कोळबांद्रे गावातील बारा वाड्यांतील ग्रामस्थ साजरे करतात.

  हे मंदिर गावाच्या मध्यभागी असून या मंदिराला असलेले नक्षीदार घुमट, मंदिरासमोर असलेले डोळे दिपवून टाकणारे त्रिपुर यामुळे या मंदिराभोवतीचे वातावरण अजूनच तेजमय झाले आहे.

संदर्भ

) श्री. कृष्णा बेर्डे , अध्यक्षश्री डिगेश्वर मंदिर

) श्री.मुरलीधर गुरव , कोळबांद्रे

) श्री. जानू लोखंडे , मानकरी ; कोळबांद्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here