आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. डॉक्टर देखील आपल्याला काही आजारांसमोर हतबल झालेले दिसतात. शिवाय काही आजार असे आहेत त्यांची औषधी आधुनिक वैद्यशास्त्राला अजूनही उमगलेली नाही. अशा वेळेस आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागतो. आयुर्वेद ही सुमारे ३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतीमध्ये वनौषधी, आहारविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भार दिला जातो. दापोलीतील बहुसंख्य डॉक्टरदेखील अशा नैसर्गिक उपचारांकरिता आपले रुग्ण खात्रीने ज्यांकडे पाठवतात त्या म्हणजे दापोलीतील गव्हे गावात राहणाऱ्या वैद्य कुणीताई. मंगला जगन्नाथ भावे हे त्यांचे संपूर्ण नाव. गव्हे गाव हेच त्यांचे सासर आणि माहेर. त्यामुळे लहानपणीच गावात त्यांच्या कुमुदिनी नावाचे कुणीताई झाले.
कुणीताईना अजून पाच भावंडे, तीन बहिणी आणि दोन भाऊ. पण घराचा चालू आलेला वैद्य वारसा जोपासला भावे आजींनी म्हणजेच कुणीताईंनी. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जवळपास २७ वर्षे वैद्यशास्त्राचा अभ्यास केला. त्यांचे शालेय शिक्षण जेमतेम झालेले असले तरी त्यांचे वैद्यकीय शास्त्र आणि आहारशास्त्रावरील ज्ञान अफाट आहे. त्यांनी शेती आणि आयुर्वेद याकरिता स्वतःला वाहून घेतले आहे. वडिलांच्या आधी भावे आजींचे चुलत आजोबा वैद्य होते. त्यांना तर औषधी भस्म तयार करण्याचे ज्ञान होते.
भावे आजी जवळपास सर्व आजारांवर औषधे देतात. परंतु रुग्णास समोर पाहिल्याखेरीज, त्याची नाडी परीक्षा केल्याखेरीज त्या औषधे देत नाहीत. कारण एका रोगावर अनेक औषधी असतात आणि रुग्णाची प्रकृती, आहार, प्रतिकारशक्ती समजून घेणे गरजेचे असते. त्या रुग्णांना झाडे, झुडुपे, वेली, गवत यापासून तयार केलेली औषधे देतात. ती कधी पोटात घेण्याची असतात किंवा लेप करून लावण्याची. त्या म्हणतात वनस्पतींची पाच अंगे असतात ( पान, फुल, खोड, मूळ, साल ) व ही पाचही अंगे औषधी असतात. त्यामुळे जवळपास सर्व वनस्पती या औषधी आहेत.
भावे आजींकडे गावोगावचे रुग्ण येतात त्याप्रमाणे अनेक वैद्यकीय महाविद्यालयांची आणि कृषी विद्यापीठातील मुले व शिक्षकदेखील मार्गदर्शनाखातर येतात. आपल्या वैद्य सेवेबद्दल सांगताना त्या म्हणतात “दापोलीत अजून जंगल शिल्लक आहे म्हणून माझी वैद्य सेवा चालू आहे. छाटली जाणारी झाडे आणि फुटणारे डोंगर थांबले नाहीत तर आयुर्वेद हे औषधाला सुध्दा राहणार नाही, एवढे मात्र खरे.”
भावे आजींच्या कार्यांची दखल दापोलीतील अनेक व्यक्ती व संस्थांनी घेतली आणि त्यांचा सन्मान केला. झी 24 तास वाहिनीचे संपादक उदय निरगुडकर यांच्याही हस्ते भावे आजींचा सन्मान झाला. आज भावे आजींसारखी पिढीजात चालत आलेलं ज्ञान अवगत करणारी आणि सेवाभावी माणसे दापोलीत आहेत म्हणून दापोलीचं स्वास्थ्य सुदृढ आहे, असं म्हणायला निश्चितच हरकत नाही.
Visit her Google Map Profile –
Ayurvedic Vaidya – Bhave Aaji
Gave,jalgaon post, taluka dapoli,, District ratnagiri, Dapoli, Maharashtra 415712
094224 43042 https://g.co/kgs/pD8S6H