इयत्ता आठवीत असताना १०० हून अधिक शालेय बुद्धिबळ स्पर्धांतून भाग घेणारी आणि इयत्ता नववीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बाजी मारणारी दापोलीतील बुद्धिबळपटू ‘तन्सिका मनोहर मिसाळ’. तन्सिका ही दापोलीतील उदयनगर भागात राहणारे ‘श्री. मनोहर मिसाळ’ आणि ‘सौ. ममता मिसाळ’ यांची सुकन्या. घरात बुद्धिबळाची कसलीही परंपरा नसताना सुध्दा तिने या क्रिडाक्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.
ती दापोलीतील ‘आर.आर.वैद्य’ या इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी. घरी आईसोबत आणि वर्गातील मित्रमैत्रिणीसोबत बुद्धिबळ खेळणाऱ्या तन्सिकाने २००६ साली रत्नागिरी शहरातील अभ्युदय मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये बालगटात प्रथम क्रमांक पटकावला आणि तिची दैदिप्यमान कामगिरी करत पुढे वाटचाल चालू झाली. त्या स्पर्धेत एकूण ७५ स्पर्धक होते. त्या स्पर्धकांमध्ये तन्सिका ही सगळ्यात लहान वयाची खेळाडू होती. त्यावेळेस तिचे वय अवघे नऊ वर्षांचे होते. त्या स्पर्धेसाठी तिला दापोलीतील प्रशिक्षक श्री.विनायक माने यांचे मार्गदर्शन लाभलेले.
पुढे २००७ मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत बारा वर्षाखालील गटात तिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यावेळी तिला चिपळूणचे श्री.प्रविण सावर्डेकर यांचे मार्गदर्शन होते. दापोलीत उत्तम प्रशिक्षिकांचा अभाव असल्यामुळे आणि तन्सिकासारख्या उत्तम खेळाडूचे मार्गदर्शन होणे आवश्यक असल्यामुळे ते चिपळूणहून तिला प्रशिक्षिण देण्यासाठी यायचे. दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन व जिल्हा क्रिडा कार्यालय,रत्नागिरी शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलीच्या वयोगटात तान्सिकाने ६ पैकी ६ गुणांसह जेतेपदाबरोबरच दक्षिण महाराष्ट्राच्या संघात स्थान व संघाचे नेतृत्व पटकावले. सदर स्पर्धा युं.इ.स्कूलच्या “गुरुदक्षिणा”सभागृह चिपळूण येथे पार पडल्या होत्या. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे शालेय वयवर्ष १४,१७,१९ वर्षाखालील मुलेमुली मिळून २१० खेळाडू यात सहभागी होते. १४ वर्षाखालील मुलींच्या विभागीय स्पर्धेचे विजेतेपद व संघ नेतृत्व मिळवणारी तन्सिका ही पहिलीच शालेय खेळाडू होती. पुढे राज्य स्तरावर खेळण्याची संधी तिला मिळाली, तेव्हा तिने पहिल्याच प्रयत्नात १३ क्रमांक पटकावला होता. दक्षिण महाराष्ट्राचे नेतृत्व करताना विभागीय स्पर्धेत तिने तीन रेटिंग प्राप्त खेळाडूना चेकमेट केले होते. २००९ मध्ये मंगलोर येथे झालेल्या तिसऱ्या ऑल इंडिया ओपन फेडरेशन चेस टुर्नामेंट मध्ये देदिप्यमान कामगिरी केल्यानंतर तिने राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून १५०३ क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले. त्यावेळेस असे नामांकन मिळविणारी ती जिल्ह्यातील एकमेव महिला बुद्धिबळपटू होती. २०१० मध्ये तन्सिकाचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र शालेय विद्यार्थिनींच्या समूहाने गोव्यातील मडगाव येथील १७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले. तेव्हा त्यांची निवड श्रीलंका व सिंगापूर येथील आंतराष्ट्रीय स्पर्धेकरिता झाली.
सिंगापूर येथे झालेल्या युथ चेस चँपियनशीप स्पर्धेत तिने फ्रेना जेनेली माई या स्पर्धेतील द्वितीय अव्वल,सीडेड फिलिपाईन्सच्या बुद्धीबलपटूला चेकमेट करण्याची किमया साधली होती; परंतु तिला नूर हबीला अझमान हिशम या मलेशियाच्या बुद्धीबळपटूकडून हार पत्करावी लागली. तरी स्पर्धेत तिने आठवा क्रमांक प्राप्त केला व तिच्या रेटिंग मध्ये १५ गुणांची वाढ झाली. तिचे १५२६ पॉईंटवरचे जागतिक रेटिंग १५४१ झाले. त्यावेळेस भारताच्या अग्रमानांकित बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचे रेटिंग २७०० च्या आसपास होते. त्यामुळे तन्सिकाची कामगिरी विलक्षण मानली जात होती. तिच्या या परदेश द्दौऱ्यासाठी तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव, दापोली अर्बन बँक, भारती शिपयार्ड, आशापुरा मायनिंग, किशोर देसाई, सुरेश भुवड, प्रदीप जाधव यांनी आर्थिक मदत केलेली. त्यामुळे तन्सिकला अंतराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळाली. या जागतिक स्पर्धेसाठी सोलापूरचे श्री.सुमुख गायकवाड व मुंबई गुरु द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले सरांचे मार्गदर्शन तिला लाभले. सिंगापूरला जाताना तन्सिकाला अनेक अडचणी आल्या. पासपोर्ट मिळायला उशीर झाल्याने ती पहिल्या फेरीच्या जेमतेम तासभर आधी तेथे पोहचली. मात्र स्वीस लीग पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत तिने ८ व्या फेरीत स्पर्धेतील नामांकित खेळाडू फ्रेना जेनेली हिला पराजीत करून खळबळ उडवून दिली होती. अंतिम फेरीत मात्र तिचा अनुभव थोडासा कमी पडला.
इयत्ता नववीमध्येच असताना अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत भरारी घेणाऱ्या तन्सिकाने दहावीत मात्र अभ्यासाकडे लक्ष वळविले आणि खेळाइतकीच अभ्यासात देखील हुशार असल्यामुळे ९४% गुण प्राप्त करून शाळेत पहिली आली. सध्या ती न्यू कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये आर्किटेकच्या शेवटच्या वर्षाला आहे, हे शेवटचे वर्ष पूर्ण होताच ती पुन्हा बुद्धिबळाकडे लक्ष केंद्रित करील, असे तिच्या पालकांकडून सांगितले जाते. परंतु खंताची बाब ही आहे की, तन्सिका मागोमाग एवढी मोठी पातळी गाठणारा एकही बुद्धिबळपटू दापोलीत तयार झाला नाही.