आगोम हे नाव दापोलीत आणि महाराष्ट्रात चांगलेच प्रचलित आहे. केशरंजना गुटिकेच्या जाहिरातीतून आगोमची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. दापोली तालुक्यात (कोळथरे गावात) सुरु झालेल्या छोट्याश्या औषधालयाचे एका मोठ्या नामांकित औषध कंपनीत झालेले रुपांतरण म्हणजे दापोलीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद व कौतुकाची बाब आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. यामागे तत्त्व, चिकाटी, जिद्द आणि अपार कष्ट होते. ते ज्या व्यक्तीचे होते, ती कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे आगोमचे जनक ‘कै. श्रीकृष्ण गोपाळ महाजन’ उर्फ ‘मामा महाजन’.
मामांना वैद्यकीचा वारसा प्राप्त होता तो त्यांच्या आईकडून. म्हणूनच त्यांनी आईच्या नावाची आद्याक्षरे घेऊन आपल्या व्यवसायाचे नाव ‘आगोम’ (आनंदी गोपाळ महाजन) असे ठेवले. आगोमची व्यवसायाला सुरुवात झाली १९७७ पासून. त्यावेळी देशात आणीबाणी जाहीर झाली होती. या आणीबाणीमुळेच मामा औषधी व्यवसायाकडे वळले. कसे? ते सविस्तरपणे पुढे येईलच. पण इथे मामांचं एक वाक्य आवश्यक आहे, जे ते व्यवसायाबद्दल बोलताना लोकांना आवर्जून सांगत असत, “माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली, ती इंदिरा गांधींच्या कृपेने.”
खरे पाहता मामांच्या व्यवसायाची सुरुवात खूप आधीचं झाली होती. १९५६ साली त्यांनी ‘घरचा वैद्य’ ही आयुर्वेदिक औषधोपचारांची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली होती. पण सामाजिक आणि राजकीय जीवनात अधिकाधिक व्यस्त असल्यामुळे मामांचे व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. १९७७ साली पुन्हा नव्याने आरंभ केला, तेव्हा मामांचे वय ५५ वर्षांचे होते. तोपर्यंत गावात मोफत औषधोपचार करणे आणि चुकून-माकून कोणी विकत घेतले तर विकणे, अश्या स्वरूपात व्यवसाय चालू होता.
१९७५ च्या आधीची मामांची कारकीर्द किंवा ओळख म्हणजे रा. स्व. संघाचे निष्ठावंत प्रचारक, सेवाभावी सामाजिक कार्यकर्ता, प्रगतशील शेतकरी, शैक्षणिक चळवळीचा पुरस्कर्ता आणि ग्रामपंचायत सरपंच अशी होती. संघकार्याची सुरुवात मामांनी महाविद्यालयीन जीवनापासुन केली. त्यावेळी मामा मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकत होते. संघाच्या विचारसरणीने भारीत होऊन मामा तृतीय वर्ष पूर्ण न करताच संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले. त्यावेळी प्रचारकांना अतिशय खडतर जीवन जगावे लागे. पण मामा त्यासाठी तयार होते. १९४८ साली गांधींच्या निधनानंतर संघावर बंदी आली. मामा आपल्या जन्मगावी परत आले. संघप्रचारक म्हणून त्यांना सरकारने तुरुंगात धाडले. कारागृहात असताना डॉक्टर देवडीकरांनी कोकणच्या सुपीक जमिनीची महती डोक्यात भरवली आणि मामांना जन्मभूमीचा उद्धार करण्याचे ध्येय गवसले. तुरुंगवास भोगून आल्यानंतर मामांनी गावात इंग्रजी शाळा नसल्याने पहिलीचा वर्ग सुरु केला. मराठी पाचवी शिकलेली मुले या वर्गाला येऊ लागली. मामा तन्मयतेने त्यांना शिकवीत असत. याचाच परिणाम म्हणून दुसऱ्या वर्षाला ‘व्हिलेज अपलीस्ट सोसायटी’ च्या तर्फे इंग्रजी शाळेचे पहिली, दुसरी व तिसरीचे वर्ग सुरु झाले. दोन खोल्यांच्या दुमजली इमारतीत इंग्रजीचे अध्ययन सुरु झाले. ही शाळा साधारण चार ते पाच वर्षे चालली. इंग्रजी एकदम आठवीत सुरु करण्याच्या शासकीय धोरणमुळे पहिली, दुसरी व तिसरी म्हणजेच पाचवी सहावी व सातवीची शाळा बंद पडली. प्रयत्नवादी मामांच्या कार्यावर पाणी फिरले. पण शाळेमुळे मामांची गावऱ्यांबरोबर जवळीक वाढली. मामांची बहीण गावातच मनोहरांकडे दिलेली. तिचा मुलगा राजाही मामांच्या कार्यात समरस झाला होता. तो मामा म्हणत असे म्हणून सारा गाव हळूहळू त्यांना मामा म्हणू लागला.
मामांनी कोळथरला असताना शाळेबरोबरच शेतीकडे लक्ष दिले. प्रथम कुळांकडे असलेल्या जमिनी कुळांना देऊन टाकल्या. स्वतः हाती नांगर घेतला आणि शेती केली. नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागा जोपासल्या. आंब्याचे पिक येईल; पण ती फळे विकली कशी जातील? या प्रश्नातून कँनिंगचे शिक्षण घेतले आणि व्यवसाय सुरु केला. मामांचे कर्तुत्व पाहून मामांचे आतेभाऊ श्री. बाबा आघारकर यांनी त्यांना कऱ्हाटीला ( पुणे ) शिक्षक म्हणून नेले, तेथेही शाळेत शिकवण्याबरोबर बोर्डिंग चालवणे, शेती करणे, धरणे बांधणे असे नाना उद्योग मामांनी केले. शिवाय अनेक वनस्पतींचे गुणधर्म अभ्यासून आयुर्वेदातील ज्ञान वाढवले. तेथे काही वर्षे काम केल्यावर मामा जन्मगावी परत आले.
दरम्यान जालगावच्या दांडेकरांच्या मुलीशी लग्न करून मामा प्रापंचीक झाले. १९५५ पर्यंत मामा गावात व्यवस्थित स्थिरावले. देशात परकीय सत्ता जाऊन कॉंग्रेसची सत्ता आलेली. गावात काही पुढाऱ्यांचा सत्तेच्या जीवावर धुमाकूळ सुरु झाला होता. मामांनी प्रथम मजूरांच्या मजुरी प्रश्नावरून प्रतिष्ठीत पुढाऱ्यांना आव्हान दिले. संघर्ष वाढला; पण मामा अखेर विजयी ठरले. मामांच्या कार्याची आणि सामर्थ्याची ओळख लोकांना झाली. पुढे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून मामा सरपंच म्हणून निवडून आले. १२ वर्षे मामा गावाचे सरपंच होते. या बारा वर्षात मामांनी गावासाठी अनेक विकासाची कामे केली. त्यामुळे तालुक्यात मामांचा दबदबा वाढला. संघाच्या कामाबरोबरचं जनसंघ या राजकीय पक्षाचा प्रभावही मामांनी तालुक्यात वाढवला. दापोली अर्बन बँक, खरेदी-विक्री संघ, पंचायत समितीवर निवडून जाऊन मामांनी लोकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न निकालात काढले.
राजकीय व सामाजिक रंगमंचावर ठसा उमटवित असतानाच मामांनी गावातील मुलामुलींसाठी माध्यमिक शाळा काढली. १९५९ ला ८ वी चा वर्ग सुरु झाला. पण सरकारी अनुदान नाही, देणगी स्वरूप कोणतेही आर्थिक सहाय्य नाही, शाळेत पूर्णवेळेचे शिक्षक नाहीत अशा नाना अडचणी होत्या. मामांनी स्वकर्तुत्वाने त्यावर मात केली. पण पुढे शासनाची सरासरी हजेरी अट आड आली. पुरेशी विधार्थी संख्या गावात किंवा पंचक्रोशीत नसल्यामुळे मामांनी तालुकाभर फिरून तीन विद्यार्थी आणले आणि आपल्या राहत्या घरीच ‘विद्यार्थी आश्रम’ सुरु केला. हळूहळू आश्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. ९ वी, १०वी, ११,वी चे वर्ग सुरु झाले. देणगीदार व गावकऱ्यांच्या मदतीने शाळेची इमारत उभी राहिली. शाळेची शिस्त, एस.एस.सी.चे उत्तम निकाल व उत्तम शिक्षण यामुळे शाळेची व आश्रमाची ख्याती गावाबाहेर गेली. मुंबई, पुणे व अन्य शहरांमध्ये पसरली. आश्रमाकडे विध्यार्थ्यांचा पूर लोटला. तीन वरून विध्यार्थी संख्या शंभरवर पोहचली. पुढे १९६६ मध्ये मामांना ‘भारत संरक्षण कायद्याखाली’ अटक झाली आणि तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यावर मामांनी शाळा व आश्रमाचे कार्य अजून जोषाने चालवले. शाळा अनुदानित झाली. सर्व कामे सुरळीत व आदर्श पद्धतीने चालू लागली. मामांनी अपार घेतलेल्या कष्टाचा परिणाम पुढे-पुढे त्यांच्या तब्येतीवर दिसू लागला. मामांची तब्येत खालावली, तेंव्हा त्यांनी सर्व राजकीय, सामाजिक बाबीमधून निवृत्त होवून शाळा व आश्रम ग्रामस्थांवर सोपिवला. शाळेचे कर्ज मात्र स्वत;च्या अंगावर घेतले. मामांशिवाय शाळा चालविणे ग्रामस्थांना जमले नाही. त्यामुळे १९७४ च्या जूनपासून शाळा अखेर बंद पडली. १९८४ साली बाबूराव जाधवांच्या नेतृत्वाखाली आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी शाळा व आश्रम पुन्हा सुरू केला. सध्या शाळा व आश्रमाचा कार्यभार श्री.बाबूराव जाधव आणि मामांचे चि. श्री दीपक महाजन सांभाळीत आहेत. दीपक महाजन संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.
मामांनी राजकीय सामाजिक जीवनातून संन्यास घेतला, तेवढ्यातच आणीबाणी लागू झाली. पुन्हा तुरुंगवास नको म्हणून मामा भूमिगत झाले आणि मुंबईला गेले. मुंबईत चरितार्थ चालविण्यासाठी मिळकत असणे गरजेचे होते. शिवाय गावावरून वारंवार पैसे मागणे योग्य नव्हते. म्हणून मामांनी मुंबईत औषधे विकण्यास सुरुवात केली. आयुर्वेदिक वनस्पतींपासून सूक्ष्म पद्धतीने ( आगम पद्धतीने ) विकसित केलेली औषधे मामा लोकांना देऊ लागले. पण मुंबईसारख्या महानगरीत या छोट्याशा वैद्याला कितपत थारा मिळणार? तरी मामा डगमगले नाहीत. मामांनी घरोघरी जाऊन औषधे विकायला सुरुवात केली. मामांचा दिवस सकाळी ४.३० ला सुरु व्हायचा तो रात्री ८.३० पर्यंत चालायचा. ‘एक क्षणही वाया घालवायचा नाही’ या उद्दिष्टाने मामा १६ तास काम करायचे. मामांच्या या प्रयत्नांना त्यांचे मित्र, स्नेही, नातेवाईक, ओळखीचे लोक यांनी आपापल्या परीने हातभार लावला आणि आगोमच्या यशाचा पाया रचला गेला.
मामांची औषधे गुणकारी होती ती तयार करतानाचं तीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच ‘आगम पद्धतीने’ सिद्ध केली होती.
१) औषधे दुष्परिणामरहित असली पाहिजेत.
२) कोणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतः ला घेता आली पाहिजेत.
३) परवडतील इतकी स्वस्त असली पाहिजेत.
या तीन तत्त्वांमुळे आगोमची पायाभरणी मजबूत झाली आणि मामांच्या औषधांचा खप वाढला, पण मामा तिथेच थांबले नाहीत. मामांची झेप ‘आगम पद्धतीला’ जी वैदिक काळापासून आहे तिला जगमान्यता मिळवून द्यायची होती. औषधे दुकानांतून विकली जावीत म्हणून मामांनी नानापरी चे प्रयत्न केले, मार्केटींग समजून घेतले, बरीच वणवण केल्यावरती एक दुकानदार व होलसेलर ‘न खपल्यास सर्व औषधे परत देण्याच्या बोलीवर’ औषधे ठेवण्यास तयार झाला. औषधाला ग्राहक मिळावेत म्हणून मामांनी दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके, दैनिके यातून बटवा, आगोम तैलार्क, सुषमा मलम, महिलामृत, चपला एक ना अनेक औषधांच्या विविध प्रकारे जाहिराती केल्या; पण म्हणावे तसे यश त्यांना आले नाही. एक दिवस अचानक त्यांना केशरंजना गुटिकेची जाहिरात करण्याचे सुचले आणि व्यवसायाचा सारा नूर पालटला. आगोमची उन्नती झाली एक-दोन करता असंख्य दुकानात केशरंजना दिसू लागले. लोकसत्ताच्या पहिल्या पानावर जाहिरात झळकू लागली. हळूहळू रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. आगोमने प्रगतीचे गगन गाठले. १९९२ साली आगोमचा सर्व कारभार मुलांहाती सोपवून मामा निवृत्त झाले. परंतु १९६४ पासून लायसेन्ससाठीची सुरु झालेली शासनाबरोबरची मामांची लढाई अविरत चालू होती. २००६ साली आगोमला लायसन्स प्राप्त झाले . तेव्हा मात्र मामा हयात नव्हते. १५ सप्टेंबर २००० रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी मामांनी अखेरचा श्वास घेतला आणि अनंतात विलीन झाले.
मामांच्या पश्चात त्यांचे पाच मुलगे व दोन मुली यांपैकी माधव, दीपक व रामदास मामांची मूल्ये व तत्त्वे जशीच्या तशी जोपासून ‘आगोम’ सांभाळीत आहेत. इतर मामांच्या संस्काराप्रमाणे विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगती करीत आहेत. आगोमचा संपूर्ण व्यवसाय आज कोळथऱ्यातून चालतो. ग्रामविकासाच्या दृष्टीने मामांनी आगोमची मुख्य शाखा मुंबई न ठेवता कायम कोळथरेच ठेवली. आगोमच्या औषधांना आज महाराष्ट्रात आणि परदेशात चांगला खप आहे. त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग, व्यवसाय उभारणारे कर्तृत्ववान लोक गावागावात तयार होणे गरजेचे आहे. त्यातूनच रोजगार निर्मिती वाढेल आणि कोकणातील पर्यायी राज्याराज्यांतील स्थलांतर थांबेल. अंतिमतः देशविकास हीच मामांची इच्छा होती.