प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. परंतु धावपळीची दिनचर्या आणि दैनंदिन व्यवहार यात छंद जोपासणे कठीण होऊन जाते. आणि एकच छंद खूप काळ जोपासायचा असेल, तर ते आणखीनचं कठीण होऊन जाते. परंतु काही लोक याला अपवाद असतात. त्यांच्याबाबतीत त्यांनी छंद जोपासला म्हणण्यापेक्षा, त्यांना छंदाने जोपासले, असेच म्हणावे लागते. अश्याच व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे ‘श्री.रविंद्र इंगळे’.
रविंद्र इंगळेंनी जवळपास चाळीस वर्षे किचेन्स आणि लायटरर्सचा संग्रह केला. दहा ते बारा वर्षे वर्तमानपत्रात खगोलशास्रसंबंधीचे येणारे लेख जमविले. ग्लोबल वॉर्मिग -पाणी- कचरा अशा सामाजिक विषयावर छापून येणाऱ्या माहितीची कात्रणे गोळा केली. टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेखाली हस्तकलेतुन विविध वस्तू तयार केल्या. पंचांगाचा अभ्यास करून बारमहिन्याचे एकपानी पॉकेट कॅलेंडर तयार करून नववर्षाच्या प्रथम दिवशी त्याच्या १००० प्रति गेले १९ वर्षे ते दापोलीच्या कार्यालयांतून वाटत आहेत. शिवाय कविता लेखनाचाही त्यांना छंद असून त्यांनी ४०० – ४५० दरम्यान कविता लिहिल्या आहेत.
इंगळेंच्या या बहुछंदाची सुरुवात प्रथम किचेन्स जमविण्यापासून झाली. १९७५-७६ साली दहावीत असताना त्यांच्या मित्राच्या भावाने किचेन्सचा संग्रह केला होता. तो पाहून तसा संग्रह आपण पण करावा अशी इच्छा त्यांना झाली. त्यासाठी त्यांनी मित्राच्या भावाजवळच एक किचेन मागितले; परंतु त्याने देण्यास नकार दिला. त्याच्या त्या नकारामुळे इंगळेंनी किचन संग्रह करण्याची खूण गाठ मनाशी पक्की केली आणि आतापर्यंत ३५०० किचेन्स संग्रह केला. इंगळेंच्या किचेन्स संग्रहाची विशेषता म्हणजे सर्व किचेन्स हे कोणत्यातरी वस्तूची प्रतिकृती आहेत. (उदा. घड्याळ, टाईप रायटर, टेलिफोन, खुर्ची इ.) त्यानंतर त्यांनी लायटर्स जमवायला सुरुवात केली. खंजीर, रणगाडा, मोबाईल अश्या विविध स्वरूपात असणाऱ्या जवळपास ५० दुर्मिळ लायटर्स त्यांच्याजवळ संग्रह आहे.
खगोलशास्रावरील लेख. ते लेख जमवायला प्रथम त्यांच्या मुलाने (श्वेतराज) सुरुवात केली. पुढे इंगळेंनी त्याला तो संग्रह वाढविण्यासाठी मदत केली आणि त्या संग्रहातून एक छोटे पुस्तक तयार केले. त्या पुस्तकाला तत्कालीन एन. के. वराडकर-बेलोसे कॉलेजचे प्रिन्सिपॉल कै. चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी प्रस्तावना लिहलेली. शिवाय थोर लेखक आणि शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना त्या पुस्तकाबद्दल कळवल होतं. नारळीकरांनी इंगळेंच्या छंदासाठी आणि पुस्तकासाठी पत्र लिहून शुभेच्या पाठविल्या होत्या; परंतु आर्थिक अडचणीमुळे इंगळेंना ते पुस्तक प्रकाशित करता आलं नाही.
सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांतून व इतरही शाळांमधून विज्ञान,भूगोलाचे प्रदर्शन होतात. त्या प प्रदर्शनांतून इंगळेंचा संग्रह मांडण्यात येतो. बरेच विद्यार्थी प्रोजेक्ट करता देखील इंगळेशी संपर्क साधतात.
खरतर वस्तू संग्रहाचा छंद जोपासणे हे सामान्य माणसाचे काम नाही कारण त्यात आनंद , समाधान मिळत असले तरी आर्थिक बाजू जमेची लागते. इंगळेंची आर्थिक परिस्थिती आता काही प्रमाणात सुधारली असली तरी पूर्वी फार बिकट होती. तरीसुद्धा त्यांनी जो संग्रह केला आणि तो सांभाळण्यासाठी जी मेहनत घेत आहेत, ती बाब खरोखर कौतुकाची आहे. त्यांचा संग्रह तसा पाहता सामान्य असला तरी एखाद्या छंदामागे वर्षानुवर्षे मग्न होण्याची वृत्ती प्रशंसनीय आणि प्रत्येकाने अंगिकारण्याजोगी आहे. आणि दापोली तालुक्यात म्युझियम हवे असेल, तर ही वृत्ती अत्यावश्यक आहे.