इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात सुलतान महमूद बेगाडा (१४५९ ते १५११) याच्या व्यापाऱ्यांची जहाजे दाभोळ बंदरात लुटल्यामुळे बेगाडाने बहामनी सुलतान महमूद दुसरा याकडे तक्रार केल्यामुळे महमूदशा बहामनीने १४९४ मध्ये दाभोळ वर हल्ला करून बहादूरखान गिलानीचा पाडाव केला. काही ऐतिहासिक संदर्भानुसार बहादूर खान गिलानीचा दाभोळ मधील पाडाव महमूदशा बहामनीने न करता युसुफ आदिलशहाने केला. बहामनी राजवटीत कोतवाल बहादूर खान गिलानी हा अतिशय मुजोर झाला होता. परदेशातून येणारी व गुजरात किंवा मलबारहून मालवाहतूक करणारी जहाजे तो लुटत असे. मात्तबर व्यापाऱ्यांना तो डोईजड झाला होता. त्याचे पारिपत्य करणे आवश्यक होते. शेवटी युसुफ आदिलशहाने गिलानिविरुद्ध मोहीम उघडली व सर्व बाजूंनी त्याची कोंडी करून दाभोळच्या सागरीयुद्धात त्यास जेरीस आणले.

बहामनी राजवट अस्तास येत असताना विजापूरच्या आदिलशाहिचा अंमल वाढू लागला. दाभोळ बंदरात उतरलेल्या युसुफ आदिलखानने गुलबर्ग्याला जाऊन बहामनी राज्याच्या पदरी राहून बिजापूरला ( विजापूर ) स्वतंत्र राज्याची उभारणी केली. दाभोळ हे सागर किनाऱ्यावरील बिजापुरचे महाद्वार होते. दाभोळला तो ‘बाब उल हिंद’ (भारताचे महाद्वार) असे म्हणित असे. आदिलशाही काळात दाभोळ आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध होते. अंजनवेलची वहिवाट या हस्तलिखितानुसार १५ व्या शतकापूर्वी मौजे गुढे तर्फ वलंबे येथे पवार नावाचा मराठा सरदार गढी बांधून या भागावर अंमल करीत होता. इ.स. १५०२ च्या सुमारास मुस्तफाखान या आदिलशाही सरदाराने पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभोळ येथे सुभा स्थापन केला. १५०२ मध्ये रत्नागिरी, राजापूर, कुडाळ व दाभोळचा समावेश करून दाभोळ तर्फची (इलाखा, जिल्हा) निर्मिती झाली. १५०२ मध्ये या प्रदेशात नवीन महसूलधारा पद्धती सुरु करण्यात आली. आदिलशाहीत दाभोळ शहर भरभरटीस आले. अनेक देशाचे व संस्कृतीचे लोक येथे स्थायिक झाले. मुस्लिम सत्ता असल्यामुळे जागोजागी सुंदर मशिदींचे बांधकाम करण्यात आले. १५०३ मध्ये दाभोळच्या धक्क्यावरील माँसाहेबांची मशीद विजापुरी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. १५०३ मध्ये भारतात आलेला इटालिअन प्रवासी वारथेमा दाभोळचे वर्णन एक सुंदर व समृध्द शहर असे करतो.

दाभोळ संपन्नता आणि ऐन समृद्धीच्या काळात असताना व दक्षिणेत विजयानगर, बिजापूर, अहमदनगर व गोवळकोंडा येथे सत्तांतर होत असतानाच कालिकत–केरळमध्ये पोर्तुगिजांनी बाजी मारली. पश्चिम आशिया व युरोप मधील अतिशय सुसंपन्न व्यापार अरबांच्या हातात होता. त्यांना शह देण्याची संधी पोर्तुगिजांना मिळाली. केरळ नंतर त्यांची वक्रदृष्टी गुजरात व कोकण किनाऱ्याकडे वळली. सन १५०७ मध्ये पोर्तुगिजांनी गव्हर्नर फ्रान्सिस्को आल्मेडाचा मुलगा लोरेंझो याच्या अधिपत्त्याखाली पश्चिम किनारपट्टी व्यापारासाठी खुली करण्यास आरमार पाठवले. या आरमारविरुद्ध विजापूर, अहमदनगर, गुजरात वगैरेंच्या सुलतानांनी आघाड्या उघडल्या. इजिप्तचा सुलातनही त्यात सामील झाला. लोरेंझोची आरमारी तारवे दिवजवळ असताना तिथला सुभेदार मलिक अय्याझ याने अचानक हल्ला केला व पोर्तुगिजांना नामोहरम केले.

या नाविक चकमकीत पोर्तुगिजांचा पराभव झाला आणि लोरेंझो मारला गेला. मुलाच्या मृत्यूचे शल्य(पीडा,दु:ख) मनात ठेऊन आल्मेडाने पुढच्याच वर्षी दि. १२ नोव्हेंबर १५०८ रोजी दाभोळवर हल्ला चढवला. एकोणिस जहाजे, तेराशे सैनिक व नौसैनिक आणि चारशे मलबार खलाशींसह तो दाभोळवर चालून आला होता. या आक्रमणात त्याचा दुहेरी उद्देश होता. एक तर भारतीय सत्तांना धडा शिकवणे आणि बिजापूरच्या आर्थिक समृद्धीचा कणा मोडणे. आल्मेडाने हे दोन्ही उद्देश पूर्ण केले. सतत तीन दिवस पद्धतशीरपणे दाभोळची जाळपोळ व लुटमार करण्यात आली. घरे-दारे, इमारती, मशिदींचा विध्वंस करण्यात आला. पोर्तुगिजांनी अनेक स्त्री-पुरुष, वृद्ध-बालकांची निर्दयतेने कत्तल केली. स्वतःचा उद्दामपणा दाखविण्याकरता अल्मेडाने येथील जामा मशिदीत वास्तव्य केले होते. त्याच्या या भयंकर आक्रमणातून जे निसटले ते दाभोळ सोडून पळाले.
आदीलशाहीत वैभवशाली शहर असलेल्या दाभोळची त्याने राखरांगोळी करून टाकली. १५०८ मधील अल्मेडाच्या हल्ल्यापुर्वीच्या एका वर्णनात ‘दाभोळ हे मोठे दखल घेण्यासारखे किनाऱ्यावरील संपन्न शहर असून तेथून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो, येथे भव्य चिरेबंदी वाड्यासारख्या इमारती आहेत. त्यांच्या भोवताली घरे आहेत. येथे भक्कम तटबंदिचा किल्ला (castle) असून किल्ल्यात ५०० तुर्की असलेली ६००० ची शिबंदी (सैनिकांची तुकडी) आहे’ असे वर्णन आढळते.
दाभोळ पाठोपाठ इ.स. १५१० मध्ये पोर्तुगिजांनी गोवा काबीज करून आदिलशाहीला दुसरा धक्का दिला. आदिलशहाने त्वरित तहाची बोलणी चालू केली. पोर्तुगीज जाणून होते की, आदिलशहाकडे दुसरा पर्याय नाही आणि दाभोळ गमावले तर घोड्यांचा पुरवठा होणार नाही. तसेच तो अफाकींच्या (परदेशी मुसलमान) सेवेला मुकेल. तरी शेवट आदिलशहा व पोर्तुगीज यांच्यात करार झाला व करारानुसार गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात राहील आणि आदिलशाहीच्या इतर बंदरांवर पोर्तुगीज हल्ले करणार नाहीत, असे ठरले.
१५०८ साली केलेल्या आल्मेडाच्या विध्वंसासातून दाभोळ शहर हळूहळू सावरले. इ. स. १५१४ मध्ये दाभोळ तटबंदी व तोफांनी संरक्षित शहर होते. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्वीसारखाच भरभराटीचा होता. इ. स. १५१८ साली पोर्तुगीज प्रवासी बारबोसा याने कोकण किनारपट्टीला भेट दिली होती. तो लिहितो, “मक्का, एडन, होर्मुझ इ. ठिकाणांहून मुस्लीम व्यापाऱ्यांची बरीच जहाजे मोठ्या संख्येने अश्व घेऊन येथे येतात. त्याचप्रमाणे खंबायत, दिव व मलबार किनारपट्टीवरून हरतर्हेच्या वस्तू घेऊन जहाजे येथे येतात. येथे बरेच व्यापारी असून काही व्यापारी अतिश्रीमंत आहेत. व्यापारी केवळ मुस्लिम नसून हिंदू धर्मीय देखील आहेत. दाभोळच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणावर तांबे, पारा आणि हिंगुल पाठविले जाते. अंतर्भागातून मोठ्या प्रमाणावर कापड नदीतून आणले जाते. निर्यातीमध्ये गहू, धान्य, तेलबिया व वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्न्यांचा समावेश होतो.” बार्बोसाने केलेल्या या वर्णनावरून दाभोळ बंदराचे महत्व लक्षात येते.

इ. स. १५२० मध्ये इस्माईल आदिलशहा ( १५१०-१५३४ ) याने पोर्तुगिजांना त्यांनी जर दाभोळला आयात होणाऱ्या घोड्यांना संरक्षण दिले तर मैत्रीचा तह करण्यात येईल असा प्रस्ताव धाडला. हा प्रस्ताव पोर्तुगिजांनी झिडकारला व त्यानंतर दोन वर्षांनी (१५२२ मध्ये) दाभोळ पुन्हा एकदा लुटले. परंतु या लुटीनंतरही दाभोळ लवकरच सावरले आणि १५४० मध्ये जगातील एक मोठी नगरी म्हणून उदयास आले. जिच्यात संपूर्ण हिंदी महासागरास लागून असलेल्या राष्ट्रांमधील व्यापाऱ्यांनी व जगाच्या सर्व खरीदारांनी फार मोठ्या प्रमाणावर गर्द्दी, वस्तिस्थाने केली होती. त्यानंतर सातच वर्षात या नगरीचे वैभव ओसरून फक्त ४००० रहिवासी, दोन किल्ले आणि काही खंदक तेवढे उरले. त्यावर्षी (१५४७ च्या सुमारास) पोर्तुगिजांनी दाभोळ पुन्हा उध्वस्त केले. इ.स. १५४८ मध्ये बिजापूर आणि पोर्तुगिजांमध्ये तह होऊन पोर्तुगिजांनी दाभोळला गुमास्ता (Factor) पाठवून समुद्राद्वारा प्रवास करणाऱ्या व्यापारी व इतरांना परवाना (Passport) देण्याची व्यवस्था करून दाभोळची भरभराट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोर्तुगिजांनी आदिलशहास सालीना सोन्याचे २००० परदाव (सोन्याची नाणी = १५४ ब्रिटिश पौंड) देण्याचे कबुल केले. १५५४ मध्ये पोर्तुगिजांनी हा करार मोडला आणि १५५४ व १५५७ मध्ये पुन्हा दाभोळ लुटले. या लुटीनंतर दाभोळला सावरण्यास थोडा वेळ लागला. गुजराती इतिहासकार असे नमूद करतात की, इ. स. १५७० मध्ये दाभोळ हे युरोपियन बंदाराप्रमाणे होते. १५७० मध्ये अली आदिलशाह व अहमदनगरचा सुलतान मुर्तझा निजामशहा यांनी पोर्तुगिजांविरुद्ध आघाडी उघडली. कालिकतचा राजा झामोरिन हा सुद्धा त्यांना सामील झाला. पण पोर्तुगिजांच्या लष्करी डावपेचांसमोर व तोफा दारूगोळ्यासमोर आघाडी टिकू शकली नाही. शेवटी नाईलाजाने पोर्तुगिजांबरोबर आदिलशहाला डिसेंबर १९७३ मध्ये तह करावा लागला. त्यानुसार पोर्तुगिजांची एक नाविक तुकडी दाभोळला तैनात करण्यात आली. काही दिवसानंतर या तुकडीतील सोजिरांना भोजनाचे आमिष दाखवून बिजापूरच्या सैन्याने आमंत्रण दिले व त्यांची भयानक कत्तल केली. गोव्याला हे वृत्त कळताच व्हाईसरॉय डॉम दियागो द मेनेझेसने (१५७६-१५७८ ) पुन्हा सूड म्हणून दाभोळचा पुरता विध्वंस केला.
✅ दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
✅ दाभोळचा इतिहास भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)