अफजल खानाच्या वधानंतर म्हणजे इ.स. १६५९ डिसेंबर १६६० जानेवारीच्या सुमारास दाभोळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. पण ग्रँटडफच्या म्हणण्यानुसार इ.स. १६५१ -५२ मध्ये शिवाजी महाराज वरचेवर महाड मध्ये राहत असत. बाजी शामराज आपले सैन्य घेऊन चारघाटीस राहून महाराजांना पकडण्याची संधी शोधत होता. महाराजांनी त्याला शह देत घाटाच्या पायथ्याशी म्हणजे पोलादपूरच्या जवळ त्यावर हमला चढवला आणि उधळून लावले. याचा अर्थ असा होतो की, शिवाजी महाराज बऱ्याच सैन्यासह आदिलशाहाचे भागात शिरले होते. त्यावेळी त्यांनी दाभोळसुद्धा जिंकले असावे.
दुसरे एक अनुमान – इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांच्या पराभवानंतर हबशा खान हा जुना निजामशाही सरदार रोह ते महाड या कोकणचा सुभेदार झाला. या हबशा खानाने इ.स. १६२८ मध्ये दाभोळ जिंकण्याची मसलत केली होती. तेव्हा १६५१-५२ शिवाजी महाराजांनी या हबशा खानाच्या मदतीने व निजामशाहाचे नावाखाली दाभोळ भाग जिंकून घेतला. महाराजांचे राजकारण धुरंधर होते. ते निजामशाहीच्या नावाखाली अशा गोष्टी करत असत.
अंजनवेलची वहिवाट या यादिनाम्यात इ.स. १६५२ मध्ये शिवाजी महाराजांनी दाभोळ घेतले, असा उल्लेख दोनदा आला आहे. एक दाभोळ ज्यावेळी ताब्यात घेतला तो शक व मुसलमानी वर्ष दिले आहे. दुसरे महाराजांचा अंमल किती वर्षे झाला याची फोड राज्याभिषेकापुर्वी २२ वर्षे व राज्याभिषेकानंतर ६ वर्षे एकून २८ वर्षे अशी दिली आहे. यात शक व मुसलमानी वर्ष तंतोतंत जुळतात.
जरी इ. स. १६५२ पासून दाभोळ महाराजांच्या ताब्यात नव्हते, असे मानले तरी अफजलखान वधापुर्वी इ.स. १६५६ पासून दाभोळ महाराजांच्या ताब्यात होते असे मानण्यास भरपूर जागा आहे. कारण इ.स. १६५५ -५६ मध्ये महाराजांनी मोऱ्यांचे राज्य जिंकले. हे राज्य म्हणजे सावित्री व वाशिष्ठी नद्यांमधील म्हणजे महाड ते चिपळूण हे कोकण, कोयना खोरे म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर ते हेळवाक पर्यंत कोयना काठचा भाग आणि बिरवाडी, महाड, रायगड हा भाग. दाभोळ बंदर व वासोटा किल्ला या भागात येतात. त्यावरून दाभोळ बंदर व वासोटा किल्ला हे १६५६ पासून महाराजांच्या ताब्यात होते. (ग्रँटडफ सुद्धा मोऱ्यांचे कोकण व राज्य म्हणून हाच भाग देतो.) शिवाय ३ एप्रिल १६५७ तारखेचे औरंगजेबाचे महाराजांच्या नावाने फर्मान आहे. त्यात आदिलशहाचा जिंकलेला प्रदेश व दाभोळ बंदर व त्याखालचा मुलुख महाराजांकडे ठेवण्यास संमती दिली आहे. औरंगजेबाने फर्मान देण्यापूर्वी सर्व गोष्टींची शहानिशा केली असणार. त्यामुळे उशिरात उशीरा फर्मानाचे आधी एक वर्ष म्हणजे ५६ च्या उन्हाळ्यापर्यंत मोऱ्यांचे राज्य जिंकले, त्या काळातच दाभोळ पूर्णपणे महाराजांच्या ताब्यात होते असे ठरते.
किंवा, १६५७ साली महाराजांनी निजामशहाचे नावाखाली कल्याण वगैरे घेतले. हबशा खान मारला गेल्यानंतर निजामशाहीचा वारस महाराजांच्या ताब्यात आला व लगेचच महाराजांनी जंजिराच्या सिद्धीचे तळे, घोसाळे घेतले, अशा तऱ्हेने कल्याण भिवंडी ते दाभोळ चिपळूण सर्व कोकण महाराजांच्या ताब्यात होते.
इ. स. १६५९ मध्ये अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा दाभोळ बंदरात त्याची ३ जहाजे भरलेली होती. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजल खानाचा वध केल्यानंतर महाराजांनी खानाची दाभोळ बंदरातील जहाजे लुटण्यासाठी दोरोजीस पाठविले. तो येत आहे, असे समजताच दाभोळचा सुभेदार महमूद शरीफ तिनही गलबतांसहित इंग्रजांच्या आश्रयास राजापूरला गेला. मराठ्यांनी दाभोळ लुटले. इ. स. १६६१ मध्ये महाराजांच्या मावळ्यांनी आदिलशाहीतील दाभोळची जाळपोळ केली. फेब्रुवारी १६६१ मध्ये महाराज, तानाजी मालुसरे, पिलाजी नीलकंठराव सरनाईक, त्र्यंबक भास्कर वगैरे सरदारांना घेऊन दाभोळला आले. त्यांनी दाल्भेश्वराचे दर्शन घेतले. शिवाजी महाराज आले, या भितीने सिद्धी जोहरला मदत करणारा आदिलशाही दाभोळचा जहागीरदार जसवंतराव दळवी आश्रयासाठी शृंगारपूरच्या सूर्यराव सुर्वेकडे पळाला. महाराजांनी दाभोळ ताब्यात घेऊन दोन हजार फौज व अधिकारी नेमून चिपळूणकडे मोर्चा वळविला. १६६१ मध्ये दाभोळ येथील शिर्के – देशमुख यांच्या मुलीशी ‘येसूबाईंशी’ संभाजी राजांचा विवाह झाला.
इ.स. १६६० मध्ये थेवेनॉट हा युरोपिअन प्रवासी दाभोळचे वर्णन जुने ठेंगण्या घरांचे व काही तटबंदी असलेले शहर असे करतो.इ.स. १६७० मध्ये फादर नवराईट म्हणतो की, शिवाजी महाराजांचा येथे भक्कम व सुंदर किल्ला आहे. तर इ.स. १६७० मध्येच ओगिल्बी असे म्हणतो की, “पूर्वी दाभोळ हे खूप प्रसिद्ध गांव होते, लढायांमुळे आता ते बरेच उध्वस्त झाले आहे आणि त्याचा व्यापारही कमी झाला आहे. त्याला प्रवेशासाठी फक्त दक्षिणेकडून नदीकडून मार्ग असून समोरचं दोन युद्ध–बुरुजांवर संरक्षणासाठी चार लोखंडी तोफा तैनात केलेल्या आहेत.” परंतु इ.स. १६६२ च्या दरम्यान दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात असताना महाराजांनी दाभोळच्या व्यापारावर लक्ष दिल्याचे दिसते. त्यांची काही जहाजे दाभोळ व मुंबई येथे व्यापार करीत असत, असे उल्लेख तात्कालीन कागदपत्रात सापडतात. मुंबई बेटावरून लंडनला पाठविण्यात आलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांच्या ताब्यातील राजापूर व दाभोळ ही बंदरे मुंबईच्या व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दाभोळचा व्यापार बऱ्याच प्रमाणात कमी झाला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजे व राजाराम राजे यांनी या सुभ्यावर निरनिराळे सुभेदार पाठविले. १६९७ मध्ये दाभोळची जहागिरी शिर्के कुटुंबाकडे बहाल करण्यात आली. इ.स. १७०० ते १७४४ पर्यंतच्या हबशी आणि मराठ्यांच्या संघर्ष काळात इंग्रजांची वखार होती,असे वर्णन केले जात असे. याच काळात तुळाजी आंग्रे यांनी दाभोळ जिंकून घेतले व हबशांना हाकलून लावले. त्यानंतर १७५६ ला पेशवा व इंग्रज संयुक्त फौजेने विजयदुर्ग किल्ल्यावर तुळाजी आंगरेंचा पराभव केल्यानंतर दाभोळ शहर व बंदरावर पेशव्यांचे नियंत्रण आले. इ.स. १८१८ पर्यंत दाभोळ पुढे पेशव्यांच्याच ताब्यात होते. १८१८ मध्ये कसलाही प्रतिकार न करता ते पेशव्यांकडून ते ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्यात आले.
✅ दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
✅ दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)
✅ दाभोळचा इतिहास भाग 3– सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
संदर्भ :
- गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
- किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
- मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
- लेख डॉ. दाऊद दळवी.
- लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
- लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)